Tuesday, 7 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत महिला शांतता आणि सुरक्षा यावरच्या खुल्या चर्चेत भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारलं. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरिश यांनी जम्मू काश्मीरसंदर्भात पाकिस्तानकडून पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या निराधार वक्तव्यांचं खंडन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला पोलीस सल्लागार आणि पोलीस विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. किरण बेदी यांचं उदाहरण देऊन महिला शांती सैनिकांमध्ये भारताची भूमिका अग्रगण्य राहिल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी जम्मू काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तान अपप्रचार करणारं वक्तव्य करत असतं, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला शांती सैनिक या शांततेच्या दूत आहेत, हे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं वक्तव्यही हरीश यांनी अधोरेखित केलं.

****

रामायण या महाकाव्याचे रचयेता आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदी कवी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणानं भगवान श्रीरामांची आणि आदर्श जीवनमूल्यांची प्रेरक कथा सांगितली, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमाद्वारे वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचीन काळापासून महर्षि वाल्मिकी यांच्या सात्विक आणि आदर्श विचारांचा सखोल प्रभाव आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. सुमारे १९ हजार ६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. हे विमानतळ देशातला सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे. मुंबई मेट्रो लाईन-३ च्या फेज 2 बीचं उद्घाटन, त्याचबरोबर ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरसाठी मुंबई वन-इंडियाच्या पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचं अनावरण देखील पंतप्रधान करणार आहेत. हे अॅप प्रवाशांना अनेक सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरमध्ये एकात्मिक मोबाइल तिकीट आणि अखंड मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसह अनेक फायदे देतं.

महाराष्ट्रातल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या अल्पकालीन रोजगारक्षमता कार्यक्रमाचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते होईल. कौशल्य विकासाचा हा कार्यक्रम ४०० सरकारी तंत्रज्ञान संस्था आणि १५० सरकारी तांत्रिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुरू केला जाईल.

परवा गुरुवारी पंतप्रधान मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्यासह मुंबईत सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांशी ते संवाद साधतील.

दरम्यान, सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते होत आहे.

****

नवी दिल्लीत आज देशातल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रामधल्या संधींवर आधारित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी डिफेन्स एक्झिम पोर्टल’चंही उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे संरक्षण उत्पादनातील आयात- निर्यात परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होतील, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डेथॉन २०२५ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पना घेऊन या उपक्रमात नोंदणी करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं केलं आहे. आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासाठी तरुण नवोन्मेषकांना प्रोत्साहन देणं, हे या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना व्हीबीबी डॉट एम आय सी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

****

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ८०व्या महासभेत आयोजित १२व्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत महाराष्ट्राचे सचिन चौधरी सहभागी झाले होते. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात केलेल्या भाषणात त्यांनी जागतिक समानता, सामाजिक न्याय, मानवाधिकार, दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि प्राथमिक सुखसोयी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. सुमारे १८९ देशांमधले युवक या परिषदेत सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरु असल्यानं या मार्गावरील वाहतुक येत्या १८ तारखेपर्यंत दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहनं कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा मार्गाने वळवण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रिधारा वाडी, मुरंबा, वांगी शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याठिकाणी काही प्रमाणात पाणी ओसरत आहे. मात्र शेती पिकांचं नुकसान झालं तर पुरात शेतातली माती खरडून गेली. झिरोफाटा - पूर्णा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

****

No comments: