Tuesday, 7 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर

·      खरडलेल्या शेतजमिनींसाठी हेक्टरी साडे तीन लाख तर रबी हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपये मदत

·      कुणबी नोंदीसाठी ओबीसी प्रमाणपत्र वाटपाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

·      फिनटेक कंपन्यांनी मूलभूत क्षेत्रावर भर देण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून आवाहन 

आणि

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या एकंदर ६८ लाख ६९ हजार ७५३ हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं असून २९ जिल्ह्यांमधल्या २५३ तालुक्यांत दोन हजार ५९ मंडळांतल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असून, कोरडवाहू, हंगामी बागायती तसंच बागायती शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विहिरी, पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी, तसंच घरं, गोठे, दुकानं, जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर रोख नुकसानभरपाई, तर तीन लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या तरतुदी लागू करून त्यानुसार कार्यवाहीचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. तीन हेक्टर मर्यादेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, रबी हंगामासाठी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपये मदत देत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवाळीपूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. या मदतीपासून कोणताही घटक वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली, तर शेतकऱ्यांना उभारी देत, सक्षम करण्यासाठी जे जे उपाय करावे लागतील, ते करणार असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

****

या मदतीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले युवा शेतकरी यज्ञेश कातबने यांनी समाधान व्यक्त करत, सरकारचे आभार मानले.

बाईट - यज्ञेश कातबने, शेतकरी

****

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.

राज्याच्या रत्नं तसंच दागिने धोरणाला आज मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळेल.

नागरी भागातील सांडपाणी प्रक्रिया धोरणालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यातल्या ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हे धोरण राबवण्यात येणार आहे.

तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या व्हीजेएनटी प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसंच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा आणि विद्यानिकेतन आश्रमशाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ९८० आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

****

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सदर याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं, असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आजच्या सुनावणीत दिले. गेल्या दोन सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला आहे.

****

फिनटेक कंपन्यांनी उत्पन्न वाढ, अभिनव उत्पादनं, जोखीम व्यवस्थापन या मूलभूत क्षेत्रावर भर द्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या आज मुंबईत सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करताना बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो, मात्र तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून नव्हे, तर थेट लाभ हस्तांतरण योजनेप्रमाणे, जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं सीतारामन यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यांतील चार महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. यामध्ये राज्यातील गोंदिया-डोंगरगड या ८४ किलोमीटरच्या तसंच भुसावळ-वर्धा या ३१४ किलोमीटर अंतराच्या मार्गांचा समावेश आहे. भुसावळ वर्धा प्रकल्पाबाबत वैष्णव यांनी माहिती दिली.

बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तथा रेल्वेमंत्री

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील. मुंबई मेट्रो-३ चं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ‘मुंबई वन’, या भारताच्या पहिल्या एकात्मिक मोबिलिटी ॲपचं, तसंच अल्पकालीन रोजगारक्षम उपक्रमाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील. हा उपक्रम राज्यातली चारशे तंत्रनिकेतन महाविद्यालयं तसंच दीडशे शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमधे राबवला जाणार आहे. 

****

२०२७ मध्ये नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ-घृष्णेश्वर, पैठण, तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं फेर सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत बोलत होते. आठ हजार ७१९ कोटी रुपयांचा हा आराखडा अधिक व्यापक, सूक्ष्म नियोजन युक्त व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक, तज्ज्ञ व्यक्ति यांची मतं विचारात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर द्यावा अशा सूचना स्वामी यांनी दिल्या.

****

धनगर समाजाच्या वतीनं आज बीड जिल्ह्यात गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणात समावेश करण्याच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या एका तरुणाचा मृतदेह कार्यालयासमोर ठेवून हे आंदोलन करण्यात आलं. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

****

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं आज मूक मोर्चा काढण्यात आला. तीन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

****

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले.

****

मुंबईतल्या इंदू मिल इथं उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज आढावा घेतला. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं, शिरसाट यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातील सात माजी जिल्हा परिषद सदस्य, सहा पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष आणि अनेक सरपंचांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वाचं स्वागत केलं.

****

जालन्यात महावितरणच्या अत्याधुनिक स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरीचा प्रकार समोर आला आहे. अशा ६६ ग्राहकांवर कारवाई करत, जवळपास नऊ लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

****

हवामान

राज्यात आज छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह संपूर्ण खानदेश आणि विदर्भ तसंच कोकणातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments: