Wednesday, 8 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

दूरसंचार क्षेत्रात देशाचं यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाची ताकद दर्शवतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आज ९व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. एकेकाळी 2G मध्ये अडचणींचा सामना करणाऱ्या या देशात आता जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात 5G कव्हरेज आहे, देशातली डिजिटल कनेक्टिव्हिटी आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

इंडिया मोबाइल काँग्रेस कार्यक्रम केवळ मोबाइल आणि टेलिकॉमपुरता मर्यादित नाही, तर काही वर्षांत तो आशियातला सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच बनल्याचं पंतप्रधान म्हणाले. गुंतवणूक, नवोपक्रम आणि मेक इन इंडियासाठी ही सर्वोत्तम वेळ असून, भारत आता जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दूरसंचार आणि 5G बाजार बनला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन तसंच मुंबई मेट्रो लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पणही ते करणार आहेत. त्यानंतर मुंबई वन, या भारतातल्या पहिल्या एकात्मिक मोबिलिटी ॲप, तसंच राज्यातल्या अल्पकालीन रोजगार अभ्यासक्रमांची सुरुवातही त्यांच्या हस्ते होईल. 

 

 

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीशी जोडला जाईल आणि त्यातून रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील, असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

****

ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्मर यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत.

****

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने धैर्य आणि शौर्य दाखवल्याचं प्रतिपादन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केलं. भारतीय हवाई दलाच्या ९३व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम आज गाझियाबाद इथल्या हिंडन हवाई तळावर पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, हवाई दलाच्या स्थापना दिनानिमित्त हवाई दल प्रमुखांसह संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शूर हवाई योद्ध्यांना पुष्पांजली अर्पण केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हवाई योद्धे, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना हवाई दल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हवाई दलानं आपल्या सामर्थ्यानं प्रत्येक आव्हानाला तोंड देत देशाचा गौरव वाढवल्याचं, त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धाडसी हवाई योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. भारतीय हवाई दल शौर्य, शिस्त आणि अचूकतेचं प्रतीक आहे, त्यांनी आपल्या आकाशाचं अगदी आव्हानात्मक परिस्थितीतही रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

जम्मूमधली श्री वैष्णव देवी यात्रा आजपासून पुन्हा सुरु झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि त्रिकुटा पर्वतरांगेत भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून यात्रा बंद ठेवण्यात आली होती.

****

कफ सिरप घेतल्यामुळे आजारी पडलेल्या मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा आणि सिवनी जिल्ह्यातल्या नागपुराच्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या लहान मुलांची मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी भेट घेतली. या औषधाच्या सेवनामुळे २० मुलांचा मृत्यू झाला, तर पाच जणांवर नागपूरच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ज्या डॉक्टरने औषध लिहून दिलं होतं त्याला अटक करण्यात आली असून, सरकार सखोल चौकशी करत असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं.

****

No comments: