Thursday, 9 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत व्यापार, संरक्षण आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत-ब्रिटन संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या व्यापक आर्थिक आणि व्यापार कराराबद्दल पंतप्रधान म्हणाले

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यानंतर दोन्ही पंतप्रधान सीईओ फोरमला उपस्थित राहणार असून, भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार कराराद्वारे सादर केलेल्या संधींबद्दल, व्यवसाय आणि उद्योग तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या सहाव्या आवृत्तीतही सहभागी होणार आहेत.

****

नवी दिल्लीत आज आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या परिसंवादात सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी, न्यायाधिकरणाच्या कार्याची प्रशंसा केली आणि न्यायदान प्रणालीतील सुधारणा, संरचनात्मक आणि प्रक्रियात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. न्यायालयं आणि न्यायाधिकरणांनी वाजवी आणि सुसंगत कारणांसह निर्णय घेतल्यास कायदा योग्य चौकटीत विकसित होतो, विसंगत किंवा विरोधी निर्णयांचा तांत्रिक क्षेत्रांमध्ये, विशेषतः करक्षेत्रात, नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं सरन्यायाधीश गवई म्हणाले. या परिसंवादातून न्यायालयीन प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

****

कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या श्रीसन फार्मसी कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना मध्य प्रदेश विशेष तपास पथक आणि तामिळनाडू पोलिसांनी आज चेन्नईतल्या कोडंबक्कम इथं अटक केली. कोल्ड्रिफ सिरपमुळे मध्य प्रदेशात २१ बालकांचा मृत्यू झाला. रंगनाथन यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि इतर कायद्यांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, बालरोगतज्ञांनी कफ सिरपचा तर्कसंगत वापर करण्याचं आवाहन शर्मा यांनी केलं आहे.

****

ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अनेक जिल्ह्यांमधल्या जागा निश्चितीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जागा अद्याप निश्चित केलेली नाही, त्यांनी तातडीनं प्रस्ताव सादर करावेत, जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी मोजणी शुल्क माफ करावं, अशा सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १०६ पाणथळ क्षेत्रांचं राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे. राज्यातलं पाणथळ क्षेत्र अधिसूचित करण्याच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.

****

आगामी निवडणुकांसाठी बीड नगर पालिकेची वॉर्ड निहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. नगरपालिकेतले २६ पैकी १३ वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत-कुरुंदा मार्गावरील उघडी नदीजवळ टिपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. सतीश स्वामी आणि शिवानंद जानकवडे अशी मृतांची नावं असून, त्यांना नांदेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं आभिनंदन केलं आहे. हा पुरस्कार जिंकणारे बैजू पाटील हे पहिले भारतीय छायाचित्रकार आहेत.

****

महिला क्रिकेटमध्ये, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे. दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतीय संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

****

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शून्य अपघाती मृत्यू जिल्हा या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल घेतलेल्या बैठकीत दिले आहेत.

****

No comments: