Thursday, 9 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

 

·      राष्ट्रविकासाला गती देण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      इज ऑफ डूइंग बिजनेसमधून गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवण्याला शासनाचं प्राधान्य-ब्रिटिश शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती

·      पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

·      शेतकरी कुटुंबांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा ‘हात मदतीचा’उपक्रम

आणि

·      महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना ****

देशाच्या विकासाला गती देण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व सार्वजनिक वाहतुक सेवेचं तिकीट देणाऱ्या ‘मुंबई वन’, या देशातल्या पहिल्या मोबिलिटी ॲपचं, लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नवयुगीन आणि पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीला त्यांच्या च्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी केलेल्या भाषणांत पंतप्रधानांनी, गेल्या अकरा वर्षात विकसित भारताचा संकल्प तडीस नेण्यासाठी विकास कामांचा वेग वाढल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट- पंतप्रधान नरेंद मोदी

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नवी मुंबईच्या या विमानतळावर दोन टर्मिनल असून, ते भुयारी बोगद्यांनी जोडलेले आहेत. विमानतळावर दोन स्वतंत्र धावपट्ट्या असून प्रत्येक धावपट्टीसाठी स्वतंत्र टॅक्सीवे देण्यात आले आहेत. या विमानतळामुळे शेतकरी, मत्स्योत्पादक तसंच लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादनं पाठवणं सुलभ होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट- पंतप्रधान नरेंद मोदी

 वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणेमुळे यंदा नवरात्रात विक्रमी उलाढाल झाली, आपलं सरकार असेच निर्णय यापुढेही घेत राहील, असं सांगतानाच, नागरिकांना स्वदेशी धोरणाचा अवलंब करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे पंतप्रधान मोदी यांनी दिलेली भेट असून, याच ठिकाणी देशातलं पहिलं ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार असल्याचं, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान पाठीशी आहेत, त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमीपूजन केलं होतं, याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली, तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

****

दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत राजभवनात द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी उद्योजकांशीही चर्चा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्यवहार करणंही आता याच माध्यमातून शक्य होणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

****

इज ऑफ डूइंग बिसनेस धोरणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडवण्याचं शासनाचं धोरण असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ब्रिटिश शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. राज्यात गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत त्यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहन उद्योग केंद्र होत असून, नागपूर सोलर मॉड्युल उत्पादन केंद्र, तर पुणे हे उद्योगांचं प्रमुख केंद्र असल्याचं सांगत, गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ब्रिटिश शिष्टमंडळातल्या सदस्यांनीही महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्राबद्दल समाधान व्यक्त करत एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला.

****

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. पुरामुळे कागदपत्रं, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून, शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं.

****

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला अधिकृत नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या १२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये अपेक्षित असल्यामुळे ही सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाइतकीच मदत देण्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. पवार यांच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुणे इथल्या अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे. उद्योजक बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते लवकरच दिवाळी फूड पॅकेट, आनंदी धनादेशाचे वाटप करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त तसंच अतिवृष्टीबाधीत शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान हा उपक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. या उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...

या उपक्रमांतर्गत ११ तारखेला पात्र कुटुंबाकडून अर्ज भरुन घेतले जाणार असून, प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. १३ ऑक्टोबरला कामकाजाचा आढावा घेऊन, अपूर्ण कामं पूर्ण केली जातील. तर १४ तसंच १५ ऑक्टोबरला प्रत्येक तहसील कार्यालयात एका साध्या कार्यक्रमात पात्र कुटुंबांना मदतीचे धनादेश दिले जातील. निकषांत न बसणाऱ्या गरजू कुटुंबांना स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचं, याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.

****

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई पुरेशा प्रमाणात मिळावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमाफी, पिक विम्याचे निकष शिथील करणं, आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तहसील कार्यालयासमोरही पक्षाच्या वतीनं काल धरणे आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

राज्यातल्या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित जाळे, संचलन आणि देखरेख करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं उपजिल्हा रुग्णालय उभाण्यासाठी आबिटकर यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं आमदार विलास भुमरे यांनी सांगितलं. पैठण तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता या रुग्णालयाची आवश्यकता त्यांनी वर्तवली.

****

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांना या संदर्भात येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती किंवा सूचना दाखल करता येणार आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मौजे तामलवाडी इथं एका खत कारखान्याचा परवाना कृषी विभागानं निलंबित केला आहे. "तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल" असं या कारखान्याचं नाव असून, इथं बनावट खत निर्मिती होत असल्याच्या माहितीवरून भरारी पथकानं ही कारवाई केली.

****

महिला क्रिकेटमध्ये, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...