Friday, 10 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात जागतिक गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं, पंतप्रधानांचं आवाहन

·      तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

·      जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

·      छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात, आयुक्तांकडून पाहणी

आणि

·      महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचा भारतावर विजय 

****

भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना संबोधित करतांना, मोदी यांनी, पायाभूत सुविधा तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. भारत आणि ब्रिटनची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फिन्टेकच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले...

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांच्यात काल प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाली. या बैठकीत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या पुनर्स्थापनेसाठी अटीशर्तीवर स्वाक्षरी झाली असून, यामुळे भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला चालना मिळेल, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळी क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठीच्या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. गहू आणि तांदूळ उत्पादनाप्रमाणेच देश आता डाळी उत्पादनातही स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्पादकता वाढवणं, पीक वैविध्याला प्रोत्साहन देणं तसंच सिंचन आणि साठवणूक सुधारणं ही या योजनेची उद्दीष्टं असल्याची माहिती चौहान यांनी दिली.

****

तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल केला. या साठ दिवसांच्या राष्ट्रीय मोहिमेचं उद्दिष्ट मुलांना, तरुणांना तंबाखू सेवन टाळण्यासाठी शिक्षित करणं तसंच तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देणं, हे आहे. यावेळी अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना "तंबाखूला नकार द्या" अशी शपथ दिली. तसंच ही मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या...

बाईट- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

****

भारतातलं डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं. जर्मनीत बार्बाडोस इथं सुरु असलेल्या अडुसष्टाव्या राष्ट्रकुल संसदीय संघटना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल परिवर्तनाद्वारे लोकशाही वाढवणं आणि डिजिटल दरी दूर करणं' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यशाळेत ऑनलाइन सहभाग घेत, मार्गदर्शन केलं.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये, असे निर्देश, निवडणूक आयोगानं दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर आयोगाने बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफीत अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास, त्यावर तशी नोंद करणं बंधनकारक असेल, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. 

****

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे. या यादीतली नावे महा एसईसी वोटर लिस्ट डॉट इन या संकेतस्थळावर मतदारांना पाहता येल. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. एक जुलै २०२५ रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी वीज महावितरण कंपनीच्या सात कर्मचारी संघटनांनी कालपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. संपकाळात वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये याकरता व्यवस्थापनानं यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या आंदोलनाबाबत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम - मेस्मा लागू केला आहे. संपकाळात अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही तक्रारी असल्यास १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं महावितरणनं कळवलं आहे.

****

पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या १९ ठिकाणांवर छापे टाकले. बुधवारी मध्यरात्रीपासून ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे जप्त केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. २०२३ मधील प्रकरणी, आरोपींच्या चौकशी मधून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहिम राबवली जात असल्याचं एटीएस कडून सांगण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी काल पैठण इथं जायकवाडीला भेट देऊन नक्षत्रवाडीपर्यंत सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी आणि जॅकवेलच्या कामाची सखोल पाहणी केली. छत्रपती संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे काम अंतिम टप्प्यात जलदगतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे. जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार असून, राज्यभरातल्या सुमारे पन्नास हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.

****

मुंबई मेट्रो तीन चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा काल प्रवाशांसाठी खुला झाला. त्यामुळे आता प्रवाशांना आरे जे व्ही एल आर या उपनगरातल्या मेट्रो स्थानकापासून ते कफ परेडपर्यंत प्रवास करता येणार आहे.

****

ई - बसच्या प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध असेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. २० दिवसांच्या दोन्ही बाजूचे प्रवास भाडे आकारून मासिक पास दिला जाईल. हा पास वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील, असं सरनाईक यांनी सांगितलं.

****

महिला क्रिकेटमध्ये, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काल विशाखापट्टणम् इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तीन खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी दिलेलं २५२ धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४९व्या षटकात पूर्ण केलं. या स्पर्धेत भारत सध्या चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना आजपासून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून महिनाभर मानसिक आरोग्य सेवा यावर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केलं

****

शेतकऱ्यांना पिकविम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पिकविमा कंपनीने समन्वयाने कामं करण्याच्या सूचना, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्या. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप आणि निधी मागणीसंदर्भात काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला, यावेळी एकही तक्रार येणार नाही याची विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश बोर्डीकर यांनी दिले.

****

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाच्यावतीने काल मूक मोर्चा काढण्यात आला. लाल फिती लावून वकीलांनी आपला निषेध नोंदवला.

****

लातूर शहरात महानगरपालिकेच्यावतीने “एक विदयार्थी- एक वृक्ष” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभाग तर्फे शहरातल्या साडे तीनशे शाळांमधल्या प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांला एक वृक्ष, अशा जवळपास एक लाख वीस हजार वृक्षांचं आयुक्त मानसी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.

****

 

No comments: