Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
गडचिरोलीत ६१ तर छत्तीसगढमध्ये २७ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, मार्च २०२६
पर्यंत नक्षलवादाचं संपूर्ण उच्चाटन करण्याकडे वाटचाल
·
सोलापूर-मुंबई विमानसेवेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत शुभारंभ
·
जालना आणि हिंगोलीसह अमरावती विभागातल्या अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांसाठी ४८० कोटी पन्नास लाख रुपये निधी वितरणास मंजुरी
·
मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीचं पुन्हा निवडणूक
आयोगाला निवेदन
आणि
·
मराठवाड्यात लातूर, धाराशिव,
बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना
आज पावसाचा यलो अलर्ट
****
गडचिरोलीतले
६१ नक्षलवादी विद्रोहाचा मार्ग सोडून काल समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. यामध्ये
सीपीआय माओवादी पोलिट ब्युरो सदस्य मल्लौजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याचा
समावेश आहे. राज्य सरकारने या नक्षलवाद्यांवर पाच कोटी २४ लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं
होतं. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत, तसंच नक्षलपिडीत
कुटुंबांना प्रोत्साहन निधीचे धनादेश देऊन मुख्य प्रवाहात त्यांचं स्वागत करण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. केंद्र आणि
राज्य सरकारांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नक्षलवादी चळवळ आता शेवटच्या टप्प्यात आहे.
मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं उद्दीष्ट महाराष्ट्राने
आधीच पूर्ण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं, ते म्हणाले,
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय
गृहमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भूपतीनं गेल्या महिन्यात शस्त्र सोडण्याचे
संकेत दिले होते, देशातल्या इतर नक्षलवाद्यांनी त्याच्या या भूमिकेला
पाठिंबा दिला आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ५० लाख रुपये बक्षीस असलेल्या २७ नक्षलवाद्यांनी
काल आत्मसमर्पण केलं. यात १० महिला आणि १७ पुरुषांचा समावेश आहे.
या वर्षी
आतापर्यंत एक हजार ६३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला.
८३६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर सरचिटणीस आणि आठ पॉलिट ब्युरो सदस्यांसह
३१२ नक्षलवादी चकमकीत ठार झाले. मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याच्या दिशेनं
वाटचाल सुरु असून सध्या देशात फक्त तीन जिल्हे नक्षलग्रस्त आहेत तर अकरा जिल्ह्यांमध्ये
नक्षलवादी चळवळीचं अस्तित्व असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
सोलापूर-मुंबई
विमानसेवेचा काल सोलापूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ
करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
सोलापूर जिल्ह्यातल्या पूरगस्त कुटुंबियांना दिवाळी किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेले १५ हजार किट भरलेले सात ट्रक यावेळी हिरवा झेंडा दाखवून
रवाना करण्यात आले.
****
ऑगस्ट आणि
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पोटी अकोला, बुलढाणा,
वाशिम, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी ४८०
कोटी पन्नास लाख रुपये निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णय
काल जारी झाला. हा निधी थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक
खात्यात जमा करावा, तसंच लाभार्थी आणि मदत निधी याचा तपशील जिल्हा
प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची सूचना आली आहे.
****
राज्यातल्या
मतदार याद्या दुरुस्त करून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी
महाविकास आघाडीने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाकडे या मागणीचं निवेदन
सादर करतांना, मतदार यादीतल्या अनेक कथित त्रुटी पुराव्यासहित
आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार
परिषदेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय
वडेट्टीवार, यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
****
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आपल्या पीएफ खात्यातली रक्कम लग्न, घर खरेदी
यासारख्या कारणासाठी पहिल्या वर्षातही काढता येणार आहे. विशेष संकटाच्या परिस्थिती
पीएफमधली शिल्लक रक्कम वर्षातून दोन वेळा काढता येईल अशी माहिती केंद्रीय श्रम आणि
रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. नोकरी सुटल्यावर कर्मचाऱ्यांना ७५ टक्के रक्कम
त्वरित तर, उर्वरित रक्कम एक वर्ष झाल्यावर काढता येणार आहे.
****
२०३० मधल्या
राष्ट्रकूल स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद इथं होणार आहेत. भारतानं यासंदर्भात सादर
केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रकूल संघटनेनं मान्यता दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी सांगितलं.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने 'ज्ञानतीर्थ
युवक महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. १२ तारखेपासून सुरू झालेल्या या
महोत्सवाचा काल समारोप झाला, कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या
हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. लातूर इथल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या
संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळालं.
****
१५ ऑक्टोबर
हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण
मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयाने बळीरामपूर ग्रामपंचायत
कार्यालयात प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हात धुण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं.
****
माजी राष्ट्रपती
'मिसाईल मॅन' भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची
जयंती काल वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. वाचनातून सृजनशीलता, निर्माण होऊन नवी प्रेरणा
मिळते, म्हणून प्रत्येकाने दररोज किमान एक तास वाचनासाठी द्यावा,
असं आवाहन स्वामी यांनी केलं.
**
धाराशिव
जिल्ह्यात तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळेत डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला
अभिवादन करून वाचन दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
परभणी जिल्ह्यात
पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथल्या जिल्हा परिषद शाळेत वाचन स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
****
वारकरी
साहित्य परिषदेनं मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी विशेष
उपक्रम हाती घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठलमहाराज पाटील यांनी या
उपक्रमाबाबत आकाशवाणीला माहिती दिली...
बाईट
- हरिभक्त परायण विठ्ठलमहाराज पाटील
****
लातूर जिल्ह्यातल्या
औसा इथं अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मदतीचे
धनादेश देण्यात आले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून
ही मदत देण्यात आली.
****
धाराशिवचे
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे
झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. खरडून गेलेल्या शेतजमिनींसंदर्भात कृषी तज्ज्ञांकडून
एक महिन्याच्या आत अहवाल मागवावा, सातबारावर नोंद नसलेल्या विहीरींचं नुकसान
झालेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी, असे निर्देशही
सरनाईक यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यातल्या
सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या
शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, यासाठी काल जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत एक ठराव संमत झाल्याची माहिती, आमदार राणाजगजितसिंह पाटील
यांनी दिली. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थ
पुरवणाऱ्या परराज्यातल्या टोळीला काल छत्रपती संभाजीनगर इथं जेरबंद करण्यात आलं. अटक
केलेल्या चार आरोपींकडून नशेकरता वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या १८ हजार ३६० बाटल्यांसह
७७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
छत्रपती
संभाजीनगर शहर परिसरात काल संध्याकाळनंतर अचानक पाऊस आल्यानं, नागरीकांची
तारांबळ उडाली.
बीड जिल्ह्यात
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरु करण्यात
आला आहे. धरणातून सध्या तीन हजार ४९४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात आज
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या अनेक जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment