Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 October 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या
महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. सिंबॉयसिस कौशल्य
विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ, तसंच डीआरडीओ इथं एक
महत्त्वाची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील.
नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस एमके-वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या
टप्प्याचं उद्घाटन, तसंच ओझर मिनी स्मार्ट
टाऊनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
****
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी
आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी
मंजुरी दिली आहे. निवृत्तीवेतन न मिळणाऱ्या
वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विनाउत्पन्न विधवा पत्नीला, माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात
येणारं दरमहा चार हजार रुपये अनुदान आता आठ हजार रुपये करण्यात आलं आहे. मुलांच्या
शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून
हा निर्णय लागू होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र
प्रदेशला भेट देणार आहेत. नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या भ्रमरम्बा मल्लिकार्जुन
स्वामी वरला देवस्थालना भेट देऊन ते पूजा
करणार आहेत. त्यानंतर कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन
आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल.
****
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय
जनता पक्षानं १८ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली. या निवडणुकीत भाजप १०१ जागांवर
लढवणार असून, सगळे उदेमवार घोषित झाले
आहेत.
****
मुंबई विद्यापीठातल्या डॉ. बाबासाहेब
आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन केलं जात आहे. काल
नवी दिल्ली इथं मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या
डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार
यावेळी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक
न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक
आणि धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील. शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातल्या धोरणांचा
वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणं, कौशल्य विकासासंबंधी
उपयुक्त योजना सूचवणं तसंच शिक्षणातील प्रवेश, गुणवत्ता आणि समावेशकता यावरही विशेष भर या केंद्राच्या
माध्यमातून दिला जाणार आहे.
****
देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने 'सरदार@150 युनिटी मार्च' या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा
शुभारंभ ३१ ऑक्टोबरला होणार आहे. या मोहिमेत
राज्यातल्या जास्तीत - जास्त युवकांनी सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा आणि युवक कल्याण
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. यासंदर्भात त्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत
माहिती दिली.
****
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
नाशिकमध्ये आयोजित नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे उद्घाटन काल माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार
शिंदे यांच्या हस्ते झालं. नारायण सुर्वे यांच्या साहित्यातून समाजप्रबोधन करतानाच
गरिबांना जगण्याचं बळ मिळालं, असं शिंदे यावेळी म्हणाले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ
विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे हे होते.
****
लातूरमध्ये विलासराव देशमुख फाउंडेशन तर्फे आयोजित ‘महिला उद्योजिका
व्हीडीएफ बाजार’ चं उद्घाटन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते झालं. या दोन दिवस
चालणाऱ्या बाजारात जिल्ह्यातल्या बचतगटाच्या महिलांनी तयार केलेले विविध साहित्य विक्रीसाठी
उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा बाजार महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ
ठरतो.
****
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक
यांनी काल जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा
घेतला. खरडून गेलेल्या शेतजमिनींसंदर्भात कृषी तज्ज्ञांकडून एक महिन्याच्या आत अहवाल
मागवावा, सातबारावर नोंद नसलेल्या विहीरींचं
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी, असे निर्देशही सरनाईक यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यातल्या सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांनी
पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, यासाठी काल जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत एक ठराव संमत झाल्याची माहिती, आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी दिली.
****
अंमली पदार्थ पुरवणाऱ्या परराज्यातल्या
टोळीला काल छत्रपती संभाजीनगर इथं जेरबंद करण्यात आलं. अटक केलेल्या चार आरोपींकडून
नशेकरता वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या १८ हजार ३६० बाटल्यांसह ७७ लाख ४४ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या
जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता
वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा, असे निर्देश छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत
होते.
****
No comments:
Post a Comment