Friday, 17 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी तेराशे छपन्न कोटी रुपये मदत वितरणास मान्यता-मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांचा समावेश

·      नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप- संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचं प्रतिपादन

·      छत्तीसगडमध्ये ११० महिलांसह २०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

आणि

·      सवत्स धेनू पूजनाने दीपोत्सवाला प्रारंभ

****

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे छपन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये मदत वितरीत करण्याला मान्यता देण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठीच्या मदतीचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. या जिल्ह्यांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८२ हेक्टर नुकसानापोटी ही रक्कम देण्यात येणार आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यासाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार, लातूर जिल्ह्यासाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार, परभणी जिल्ह्यासाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार तर नांदेड जिल्ह्यासाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसंच पशुधनाचं आणि घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना जिल्हास्तरावरूनच मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

हा निधी शेतकऱ्यांना विना अडथळा प्राप्त व्हावा, यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. ते म्हणाले

बाईट - विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीच्या काळातही काम करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर इथं बोलत होते. राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर पुन्हा टीका केली आहे.

अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळं हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं आज दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे, बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली.

****

नुकसान भरपाईच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

****

मराठी विज्ञान परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षीचा डॉक्टर अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार, तिरुअनंतपुरमच्या डॉक्टर टेस्सी थॉमस यांना, तर डॉक्टर रा.वि.साठे जीवनगौरव पुरस्कार वेल्लोरच्या डॉक्टर गगनदीप कांग यांना जाहीर झाला आहे. दोन लाख एक्कावन हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप असून, मराठी विज्ञान परिषदेच्या साठाव्या वार्षिक अधिवेशनात ते प्रदान केले जाणार आहेत.

****

नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. नाशिक इथं तयार झालेलं पहिलं, तेजस, हे लढाऊ विमान आज संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत वायुदलाला सोपवण्यात आलं, त्यावेळी केलेल्या संबोधनात संरक्षणमंत्री म्हणाले

बाईट - संरक्षण मंत्री राजनाथसिंह

 

ओझरमधल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. तेजस एमके - वन ए हे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टची उन्नत आवृत्ती असून, यात अत्याधुनिक रडार, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, आणि हवेत असतानाच इंधन भरण्याची क्षमता आहे. हे विमान ताशी दोन हजार २०० किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतं.

****

वायू दलातल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं, त्यातूनच देशाच्या रक्षणासाठी वायूदल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं वायूदल प्रमुख ए. पी. सिंग यांनी म्हटलं आहे. नागपुरात वायू दलाच्या कमांडर परिषदेत ते बोलत होते. तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकासया विषयावर ही दोन दिवसीय परिषद पार पडली.

****

छत्तीसगडमध्ये आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या मध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष आहेत. त्यांनी १९ एके-४७ रायफली आणि १७ SLR रायफलींसह एकंदर १५३ शस्त्र पोलिसांकडे जमा केली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षाचे होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

****

आज वसुबारस. सवत्स धेनू अर्थात गायवासराच्या पूजेनं दिवाळीला आजपासून प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखा मेहनती पशू देणाऱ्या गायीप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत आज सायंकाळी सवत्स धेनू पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्या धनत्रयोदशीचा साजरा होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या तीन तालुक्यांतल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचं वाटप केलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. या मदतीमध्ये फराळाचं पाकीट आणि किराणा साहित्य तसंच रब्बी हंगामासाठी बियाणं, यांचा समावेश आहे. या कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत, तसंच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या योजनांचा लाभही देण्यात आला.

****

बीड इथल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं दिवाळीनिमित्त उद्या धनत्रयोदशीला सकाळी बालकलावंताची सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केलं आहे.

****

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं घेराव घातला. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासननिर्णयानुसार किती प्रमाणपत्र मिळाली, असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी विचारल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने येत्या वीस ते पंचवीस तारखेदरम्यान दिवाळीची सुटी जाहीर केली आहे. उद्या म्हणजे १८ तारखेला तिसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करून विद्यापीठाचं कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या कोक गावात अतिसार रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवल्या आहेत. राज्य आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज कोक गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला, तसंच यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले.

****

अहिल्यानगर इथे पार पडलेल्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूनं चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सतरा वर्षाखालील मिश्र दुहेरी गटात छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडेनं नागपूरच्या दितीशा सोमकुवारच्या साथीनं स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवलं आहे.

****

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथे शासनातर्फे उद्या आणि परवा “जागर संविधानाचा” या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोलीतल्या शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संविधानावर आधारित विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

हवामान

राज्यात आज कोल्हापूर आणि नाशिकसह कोकणातल्या काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments: