Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
ब्रम्होस क्षेपणास्त्र हे
भारताच्या तिन्ही संरक्षणादलाचा कणा असून अद्ययावत मार्गदर्शक प्रणाली या क्षेपणास्त्रात
असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ इथल्या
ब्रह्मोस अंतराळ विभागात निर्मित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला आज राजनाथ
सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. ब्रम्होस क्षेपणास्त्र हे भारतीय संरक्षणदलासाठी
एक विश्वासाचं प्रतिक असल्याचे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले. लखनऊमध्ये
स्थित ब्रम्होस युनिट हे क्षेपणास्त्र प्रणाली निर्मिती ते अंतिम चाचणीपर्यंतची संपूर्ण
स्वदेशी सुविधा असलेलं पहिलं केंद्र आहे.
****
आसाममध्ये आज सकाळी भूकंपाचे
सौम्य धक्के जाणवले. कछार जिल्ह्यात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता भूकंप मापकावर
२ पूर्णांक ७ इतकी नोंदवली गेली. दरम्यान पाकिस्तानमध्येही आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.
****
अमृतसर-बिहार गरीब रथ जलदगती
रेल्वेला अमृतसरहून सहरसाकडे जातांना सरहिंदजवळ आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत गाडीचे
तीन सामान्य डबे पूर्णपणे जळून खाक झाले, मात्र या दुर्घटनेत कुठलीही
जीवितहानी झाली नाही, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून तपास सुरू असल्याचं
रेल्वे सूत्रांनी सांगितलं.
****
देश लवकरच नक्षलवाद आणि माओवादी
हिंसाचारापासून पूर्णपणे मुक्त होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
काल नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक शिखर परिषदेत ते बोलत होते. गेल्या ११ वर्षांत
माओवादी दहशतवादाचा सामना करण्यात मोठी प्रगती झाली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
माओवादी दहशतवाद हा देशातील
तरुणांवरील एक गंभीर अन्याय आहे. गेल्या दशकात हजारो नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग
सोडून आत्मसमर्पण केले आहे तसंच गेल्या ७५ तासांत ३०३ जणांनी आत्मसमर्पण केल्याचं ते
म्हणाले. सरकार दिशाभूल झालेल्या तरुणांना योग्य मार्गावर परत आणण्यासाठी अत्यंत संवेदनशीलतेने
काम करत असून याचा परिणाम म्हणून १२५ जिल्ह्यांपैकी फक्त ११ जिल्हे नक्षल प्रभावित
आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांच्या हस्ते येत्या २७ ऑक्टोबरला मुंबईच्या माझगाव डॉक गोदीमध्ये खोल समुद्रात मासेमारी
करण्यास सक्षम अत्याधुनिक नौकेचं उद्घघाटन होणार आहे. या नौकेची लांबी १८ ते २२ मीटर
असून ६०० अश्वशक्ती इतकी इंजिन क्षमता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संवाद प्रणालीसह
सुसज्ज अशी ही बोट मासेमारी उत्पादनात वाढ करण्यासाठी तसंच मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणातील
महत्त्वाचा टप्पा आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर
महीन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना
८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, ही मदत दिवाळीपूर्वी
शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या असल्याची माहीती
जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा
तपशील जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या
आहेत.
****
क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालय
तसंच कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं, फिट इंडिया या उपक्रमांतर्गत
'आयर्न व्हील्स ऑफ युनिटी' नावानं दोन देशव्यापी सायकलिंग मोहिमा आयोजित करण्यात
आल्या आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
१५०व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबरपासून या मोहिमा
सुरु होतील. राष्ट्रीय एकता, शारीरिक तंदुरुस्ती आणि लवचिक भारताची भावना देशभरात पोहोचवणं
हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
****
अभिनेता अक्षय कुमार यांना
त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेच्या अधिकारांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं तातडीनं अंतरिम
संरक्षण दिलं आहे. अक्षय कुमारचे नाव, आवाज आणि प्रतिमा त्यांच्या
परवानगीशिवाय वापरता येणार नाही, असे निर्देश न्यायमूर्ती आरिफ एस. यांच्या पीठानं सुनावणीदरम्यान
दिले आहेत.
****
पुढील पिढीतील वस्तू आणि सेवा
कर-जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांना आणि व्यवसायांना दिलासा मिळाला आहे. नवीन कर प्रणालीमुळे
जुने चार कर स्तर सोपे झाले आहेत. नव्या ५ आणि १८ टक्के कर स्तरामुळे जीएसटी दर कमी
झाले आहेत. यामुळे औद्योगिक आणि घरगुती उत्पादनांची मागणी वाढत असून अर्थव्यवस्थेला
चालना मिळत असल्याचं पुणे इथले आउटर कंट्रोल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक उल्हास एस.
जोशी यांनी म्हटलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब
तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक दीपोत्सव
साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं तसंच
मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात, याबाबत शिक्षकांनी माहिती
देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.
****
चंद्रपुरात आज स्नेहांकित
दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाचा
आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. पार्श्वगायिका सई टेंभेकर
यांनी आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी हिंदी आणि मराठी गाण्यांची
मेजवानी चंद्रपुरकरांना अनुभवायला मिळाली.
****
No comments:
Post a Comment