Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 October
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून पहिल्या टप्प्यातील
मतदानासाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू होणार आहे. काल अर्ज भरण्याची प्रक्रिया
पूर्ण झाली असून कालपर्यंत १ हजार ६९८ उमेदवारांनी अर्ज भरले. बिहारमध्ये सहा नोव्हेंबरला
पहिल्या टप्प्यासाठी १८ जिल्ह्यांतील १२१ जागांसाठी मतदान होणार आहे.
****
आजपासून दिवाळीला सुरुवात झाली असून देशात धनत्रयोदशीचे
पावन पर्व साजरे होत आहे. या शुभ दिवशी
धन्वंतरी, कुबेर आणि माता लक्ष्मीची
पुजा केली जाते. तसंच सोन्याचांदीची खरेदीही केली जाते.
****
धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला
शुभेच्छा दिल्या आहेत. या पावन पर्वानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशा शब्दात
त्यांनी देशबांधवांप्रती भावना व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय
जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी धनत्रयोदशीनिमित्त जनतेला उन्नती आणि
चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण
बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आदि कर्मयोगी अभियानावरच्या राष्ट्रीय
परिषदेला त्यांनी काल संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा
जनभागीदारी अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि आदि कर्मयोगी अभियानात
सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाशा इथं दिवाळी प्रकाश पर्वानिमित्त
तापी आरती सेवा समितीच्या वतीनं तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात महाआरती आणि ११ हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली.
यावेळी हा परिसर दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून गेला. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी
तापी आरती सुरु करण्यात आली आहे. दिप सोहळ्यासाठी
आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत
भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
अलिबाग इथले पत्रकार हर्षद
कशाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार जयंत पाटील यांना अलिबागच्या न्यायालयानं
दोषी ठरवून पाच हजार रुपयाची नुकसान भरपाई आणि एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र
लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकात वार्तांकन करण्यासाठी
हर्षद कशाळकर मतदान केंद्रात गेले असता तिथं जयंत पाटील यांनी कशाळकर यांच्या कानशिलात
लगावली होती, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा वर्ष खटला चालला, त्याचा निकाल काल लागला.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर
महिन्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी २९२ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी
महायुती सरकारने १८९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून त्याचे वितरणही सुरू झालं असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पात्र
शेतकऱ्यांना ९० कोटी रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
पीकविमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
****
अकोला इथं कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव
कार्यक्रमांतर्गत वणी रंभापूर गावात विद्यार्थ्यांनी ‘फार्म टू फूड’ या संकल्पनेवर
आधारित प्रात्यक्षिकं सादर केली. शेतीतील उत्पादनांचं मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न
मिळविण्याचे मार्ग दाखवणे हा यामागचा उद्देश आहे, या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ प्रक्रिया उद्योगाचं
महत्त्व स्पष्ट करण्यासोबतच ग्रामीण महिलांना लघुउद्योगातून स्वावलंबनासाठी मार्गदर्शन
मिळालं.
****
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या विक्रमगड
बांबू उद्योग प्रोड्यूसर कोआपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या महिला कामगारांनी बांबूपासून
पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार करण्यावर भर दिला आहे. या पर्यावरणपूरक आकाश कंदीलाना
भारतासह परदेशात ही पसंती मिळत आहे. महिलांनी यंदा ५ हजारांपेक्षा जास्त आकाश कंदील
तयार केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
डेन्मार्क इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या दुहेरी बॅटमिंटन
स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत पोहचले
आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीचा जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी
यांच्याशी सामना होईल. ६५ मिनिटं चाललेल्या सामन्यात उपांत्यपुर्व सामन्यात बीडब्ल्यूएफ
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी रियान अर्दियांतो
आणि रहमत हिदायत यांचा पराभव केला. पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन
पराभूत झाला असून त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथं आज
आणि उद्या “जागर संविधानाचा” या कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संविधानावर
आधारित विविध सादरीकरण होणार आहे.
****
राज्यात आज आणि उद्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं
वर्तवली आहे. तर विदर्भात या काळात हवामान कोरडं राहील.
****
No comments:
Post a Comment