Sunday, 19 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अयोध्यानगरी विक्रमी दीपोत्सवासाठी सज्ज

·      चांद्रयान-२ नं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला

·      धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय झाल्याचा अंदाज

आणि

·      पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

****

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी अयोध्येमध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावर भव्य दीपोत्सव साजरा होत आहे. यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जात आहे. या संदर्भातला विश्वविक्रम याद्वारे नोंदवण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालत आहे. यावर्षी, एकविसशे वेदाचार्य शरयू नदीच्या काठावर होणाऱ्या या महाआरतीत श्लोकांचं पठण करण्याचा विश्वविक्रमही नोंदवत आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा सुरू आहे.

****

चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या हाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. चांद्रयान-२ नं टिपलेल्या नोंदींमुळं चंद्राचं बाह्य क्षेत्र, चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल, असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. चांद्रयान-२ चं निरीक्षण चंद्रावरच्या वातावरणाबाबत वैज्ञानिक समज वाढवेल, तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमा आणि चंद्रावर मानवाच्या अधिवासाच्या योजनेत महत्वाची भूमिका बजावेल असं यात म्हटलं आहे. २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-२ नं, २० ऑगस्ट २०१९ रोजी, चंद्राभोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता, तरी ते पूर्णपणे कार्यरत असून ते चंद्राच्या कक्षेत कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुका आणि आठ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांवर निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले निरीक्षक बारकाईनं लक्ष ठेऊन आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या अंतर्गत समान संधी प्रदान करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगानं १२१ सर्वसाधारण निरीक्षक आणि १८ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ सर्वसाधारण निरीक्षक आणि २० पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसंच, सुरू असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी आठ सर्वसाधारण आणि आठ पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं या निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बारकाईनं पाहण्याचं आणि निवडणुका पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळं सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून, यंदा ग्राहक उपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून, गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तूंबरोबर वाहन खरेदीमध्येही तेजी दिसून आली. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून, हॉलमार्क- प्रमाणित हलक्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करामध्ये सुधारणा केल्यानं सध्या बाजारात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले व्यावसायिक ज्ञानेश्वर जाधव यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाल्याची माहिती आकाशवाणीला दिली. ते म्हणाले

बाईट – ज्ञानेश्वर जाधव

****

राज्यातल्या विरोधी पक्षांतर्फे येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये कथित सदोष मतदार यांद्यांविरुद्ध मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मतदार याद्या सदोष असून यात मोठ्याप्रमाणात बनावट मतदार नोंदी असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.

****

ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं डकवर्थ लुईसच्या नियमांनुसार सात गडी राखून विजय नोंदवला. सामन्यात पावसाचा सतत व्यत्यय आल्यानं सामना २६ षटकांचा करण्यात आला होता, भारतीय संघ २६ षटकांत १३६ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताच्या डावाला प्रारंभीच धक्के दिले. त्यात विराट कोहली शून्य तर रोहित शर्मा आठ आणि कर्णधार शुभमन गील दहा तर श्रेयर अय्यर अकरा धावांवर बाद झाले. के. एल. राहुलनं सर्वाधिक ३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिशेन ओवेन, मॅथ्यू कुहेनमन आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मिचेल मार्शच्या ५२ चेंडुंतील नाबाद ४६ धावा आणि जोश फिलीपच्या २९ चेंडुंतील ३७ धावांमुळं ऑस्ट्रेलिया संघानं २९ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदुर इथं इंग्लंड संघानं भारताविरुद्ध शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा ४६ व्या षटकांत पाच बाद २५४ धावा केल्या आहेत. हिदर नाईटचं शतक तसंच एमी जोन्सच्या ५६ धावा यात प्रमुख आहेत. सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत दोन सामन्यांत पराभूत झाल्यामुळं भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

गुवाहाटी इथं बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तिला आज अंतिम फेरीच्या सामन्यात थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यापत प्रीचसाककडून ७-१५, १२-१५ असा पराभव पत्करावा लागला.

****

नांदेड जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा मंडळ, नांदेड-वाघाळा शहर महापालिका आणि नागरी सांस्कृतिक समितीनं शहरातील बंदाघाट येथे उद्यापासून तीन दिवस दिवाळी पहाट उपक्रम ठेवला आहे. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनानं उद्या पहाटे साडेपाच वाजता याचा प्रारंभ होणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचा मिलाप असलेला कार्यक्रम सादर होणार आहे तर रात्री साडेआठ वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम होईल, असं संयोजकांनी कळवलं आहे.

****

वाशिम इथं समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातात दोन विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. हे पर्यटक म्यानमारहून जगन्नाथ पुरीच्या दर्शनासाठी आले होते. वाहन चालकाचं नियंत्रण सुटून वाहन महामार्गाच्या कठड्यावर आदळून हा अपघात झाला. जखमींवर वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात नाम फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या समन्वयानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप करण्यात आलं. यात हरभरा सहाशे क्विंटल तर ज्वारी पिकाच्या १६० क्विंटल बियाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या बियाणांचं वाटप करण्यात आलं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, इतर शासकीय संस्थानीही या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केलं.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात डाबली धांदरणे इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर ग्रस्तांसाठी निधी गोळा केला. शाळेच्या विद्यार्थी, शिक्षकांनी गोळा केलेला पाच हजार १३० रुपयांचा निधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्याकडे सुपूर्द केला.

****

दिवाळीत ध्वनी, वायू प्रदुषण करणारे फटाके फोडू नयेत, असं आवाहन भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे करण्यात आलं आहे.

****

No comments: