Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिन्ही
सैन्यांमधील असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले, असे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय नौदलाला हिंदी महासागराचा 'संरक्षक' असे त्यांनी
संबोधले आणि जगातील सर्वात मोठ्या संरक्षण निर्यातदारांमध्ये भारताचा समावेश करणे हे
आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा
कायम ठेवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवा आणि कारवारच्या किनारपट्टीवर INS विक्रांतवरील
नौदल जवानांसोबत दिवाळी साजरी केली. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारताच्या
सशस्त्र दलांची क्षमता दर्शवते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नौदलाच्या जवानांसोबत दिवाळीचा
पवित्र सण साजरा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. माझ्यासाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरला
आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
****
गृहमंत्री अमित शहा यांनी
सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे
अमित शहा यांनी देशवासीयांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना
केली.
****
लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर
शेअर बाजारात उद्या विशेष दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात
जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शेअर बाजार उद्या दुपारी पावणे दोन वाजता सुरू होईल आणि
दुपारी पावणे तीन वाजता बंद होईल. यावर्षीपासून मुहूर्ताच्या ट्रेडिंगची वेळ दिवसा
करण्यात आली आहे. याआधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मुहूर्ताचे ट्रेडिंग केले
जात असे. मात्र, सायंकाळी घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे अनेक नागरिकांना या मुहूर्ताच्या
ट्रेडिंगपासून वंचित राहावे लागत असे. हे लक्षात घेऊन शेअर बाजाराच्या मुहूर्ताच्या
ट्रेडिंगची वेळ यावर्षीपासून बदलण्यात आली आहे.
****
सणासुदीच्या या काळात नागरिक
आपल्या मित्रपरिवार आणि निकटवर्तीयांना त्यांच्या सुरक्षित आणि सुगम प्रवासासाठी फास्ट
टॅगचा वार्षिक परवाना उपहार स्वरुपात देऊ शकणार आहेत. हा वार्षिक परवाना भारतीय राष्ट्रीय
राजमार्ग प्राधिकरणचा मोबाईल ॲप - राजमार्ग यात्राच्या माध्यमातून खरेदी करता येणार
आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. खाजगी वाहनांसाठी एक वर्षासाठी या परवान्याचं
शुल्क ३ हजार रुपये इतकं असून हा परवाना देशभरातल्या १ हजारांहून अधीक टोलनाक्यांवर
मान्य असणार आहे.
****
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन
योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या १४ गावातील शेतकऱ्यांना
कर्जमाफी मिळाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झाले आहेत. आमदार रमेश
बोरनारे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर पालखेड गावातील
शेतकरी बांधवांनी त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला.
या कार्यक्रमात आमदार बोरनारे
यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत ५०० असंघटित कामगार
महिलांना गृहउपयोगी भांडी संचाचं वाटप करण्यात आलं आणि गावातील असंघटित कामगारांच्या
मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख १० हजार रुपये शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
****
बीड जिल्ह्यातील मांजरा धरणाच्या
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेऊन आज धरणाचे २ दरवाजे उघडून त्यातून एकोणपन्नास
पूर्णांक अट्ठेचाळीस दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये
येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार
असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन मांजरा धरण प्रशासनाने
केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या ६ हजार ४७० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे
विकास महामंडळाच्या नियामक बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मान्यतेनंतर आता
हा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे कार्यकारी
संचालक संतोष तिरमनवार यांनी दिली आहे.
****
भंडारा जिल्ह्यातील लाखनी
शहरामध्ये ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या माध्यमातून पर्यावरण पूरक दिवाळी साजरा करण्याचा
संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरात निसर्ग वाचविण्याचा संदेश
देत रांगोळी काढली. तर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर रांगोळी चित्र काढत पर्यावरण
समतोल ठेवण्याचे संदेश दिला. काही विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी
विघटन होणाऱ्या वस्तूपासून आकाश कंदील तयार केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणाचे
रक्षण करण्याचा संकल्प घेतला आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली.
****
No comments:
Post a Comment