Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
एसडीआरएफमधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी
एक हजार ५६६ कोटी रुपयांची अग्रीम रक्कम जारी करण्याला गृह मंत्रालयाची मान्यता
·
स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं
आवाहन
·
आज नरकचतुर्दशी; घरोघरी अभ्यंगस्नानाचा सोहळा
·
मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या
एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा
आणि
·
नांदेड जिल्ह्यात नाम फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या समन्वयानं
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप
****
२०२५-२६
या वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल - एसडीआरएफमधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून
महाराष्ट्रासाठी एक हजार ५६६ कोटी ४० लाख रुपयांची अग्रीम रक्कम जारी करण्याला गृह
मंत्रालयानं मंजूरी दिली आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित नागरीकांना
तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यासाठी
३८४ कोटी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी देण्यात आली.
यावर्षी, केंद्र सरकारने
यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत २७ राज्यांसाठी १३ हजार सहाशे ३ कोटी
२० लाख, केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत १५ राज्यांसाठी
२ हजार एकशे एकोणनव्वद कोटी २८ लाख रुपये जारी केले आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं आणि
१४० कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं आहे. सणांच्या वेळी
खरेदी केलेली स्वदेशी उत्पादनं नागरीकांनी सामाजिक माध्यमांवर शेअर करावी, असं त्यांनी
म्हटलं आहे. MyGovIndia च्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधानांनी, लोकांना ते स्वदेशी असल्याचं अभिमानाने
सांगण्याचं आवाहन केलं.
****
भगवान श्री
राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी अयोध्येत शरयू नदीच्या किनाऱ्यावर काल
भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. राम की पौडी इथल्या ५६ घाटांवर २६ लाखांपेक्षा जास्त
दिवे प्रज्वलित करण्यात आले. लाखो दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक
आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघाली.
**
दिपावलीच्या
पर्वात आज नरकचतुर्दशी साजरी होत आहे. आज पहाटे घरोघरी अभ्यंगस्नानाचा सोहळा पार पडला.
नरक चतुर्दशीनिमित्त धाराशिव इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे चरणतिर्थ, श्री भवानीमातेला
अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान आणि अभिषेक, धुपारती आदी कार्यक्रम पार पडले.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन् आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी
दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
****
दिवाळीत
ध्वनी तसंच वायू प्रदुषण करणारे फटाके फोडू नयेत, असं आवाहन भारतीय
वैद्यकीय संघटनेतर्फे करण्यात आलं आहे. संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष
डॉ. अनुपम टाकळकर यासंदर्भात म्हणाले:
बाईट
– डॉ. अनुपम टाकळकर
****
नुकत्याच
लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर
पडली असून, यंदा ग्राहक उपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. छत्रपती
संभाजीनगर इथले व्यावसायिक ज्ञानेश्वर जाधव यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणाऱ्या
ग्राहकांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले...
बाईट
– ज्ञानेश्वर जाधव
****
महायुतीचं
सरकार येताच ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली तसंच ओबीसींच्या प्रगतीसाठी विविध योजना
सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाज्योती अर्थात महात्मा
ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनशीलेचं
अनावरण काल नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. राज्य सरकारने ओबीसीसाठी सुरू केलेल्या पंजाबराव देशमुख भत्ता योजना,
प्रशिक्षणाच्या योजना, स्वयंरोजगाराच्या योजनांचा
उल्लेख त्यांनी केला.
****
राज्यातल्या
मतदार याद्या सदोष असून, यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या
वतीनं येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना भवनात काल
सर्व विरोधी पक्षांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यातल्या
मतदार याद्या निर्दोष करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली होती, मात्र आयोग ऐकत नसेल तर त्यांना रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल,
असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
****
मतदार यादीतल्या
त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असं महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगाव इथं आयोजित पक्षाच्या
पदाधिकारी मेळाव्यात काल ते बोलत होते. निवडणूक आयोगानं मतदार याद्यांसंदर्भात राजकीय
पक्षांचं समाधान करावं असं ते म्हणाले.
****
सहायक प्राध्यापक
पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नेट परीक्षा
३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातल्या विविध परीक्षा केंद्रांवर
होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची
अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल,
याची यादी परीक्षेच्या १० दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली
जाईल.
****
नांदेड
जिल्ह्यात नाम फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या समन्वयानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना
बियाणांचं वाटप करण्यात आलं. यात हरभरा सहाशे क्विंटल तर ज्वारीच्या १६० क्विंटल बियाणांचा
समावेश आहे. जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात काल जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांच्या हस्ते या बियाणांचं वाटप करण्यात आलं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात
झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, इतर शासकीय
संस्थानीही या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदत करावी, असं आवाहन कर्डिले यांनी यावेळी केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या
शिंदखेडा तालुक्यात डाबली धांदरणे इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी
गावात फेरी काढून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला. शाळेच्या
विद्यार्थी, शिक्षकांनी गोळा केलेला पाच हजार १३० रुपयांचा निधी
धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात
आला.
****
क्रिकेट
ऑस्ट्रेलियानं
भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला कालचा पहिला सामना जिंकून आघाडी
घेतली आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं डकवर्थ लुईसच्या नियमांनुसार
सात गडी राखून विजय नोंदवला. पावसाचा सतत व्यत्यय आल्यानं सामना २६ षटकांचा खेळवण्यात
आला. भारतीय संघ २६ षटकांत १३६ धावाच करू शकला. विराट कोहली शून्य, रोहित शर्मा
आठ, कर्णधार शुभमन गील दहा तर श्रेयस अय्यर अकरा धावांवर बाद
झाले. के. एल. राहुलनं सर्वाधिक ३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं २९ चेंडू शिल्लक
असतानाच हे लक्ष्य पार केलं.
****
महिला क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत काल इंदूर इथं झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून अवघ्या चार
धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २८९ धावांचं आव्हान दिलं
होतं, मात्र भारतीय संघ ५० षटकात २८४ धावाच करु शकला. या विजयामुळे इंग्लंडचा
संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे. भारताला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी आगामी न्यूझीलंड
आणि बांग्लादेश सोबतचे सामने जिंकणं आवश्यक आहे.
****
गुवाहाटी
इथं बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला
उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तिला काल अंतिम फेरीच्या सामन्यात थायलंडच्या दुसऱ्या
मानांकित अन्यापत प्रीचसाककडून ७-१५, १२-१५ असा पराभव पत्करावा लागला.
****
नांदेड
जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा मंडळ, नांदेड-वाघाळा शहर महापालिका
आणि नागरी सांस्कृतिक समितीनं शहरातल्या बंदाघाट इथं आजपासून तीन दिवस दिवाळी पहाट
उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या गायनानं आज या महोत्सवाला
सुरुवात झाली.
****
परभणी जिल्ह्यात
पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे इथं येत्या गुरुवारी भाऊबीजेनिमित्त भेटी लागी
जीवा हा माहेरवाशीणींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
दिवाळीनिमित्त
प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगाराकडून
जादा बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment