Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 October
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाईपासून
वंचित ठेवलं जाणार नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश, शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा
लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणं, मजुरांची टंचाई दूर करणं आणि वेळेची बचत साधणं हा असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय
भरणे यांनी म्हटलं आहे.
कृषी यांत्रिकीकरण तसंच विविध योजनांच्या अनुषंगाने
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काल जवळपास १००० अनुदानित ट्रॅक्टरचं वितरण कृषीमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी
मंजूर निधीच्या आधारे 'प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार १ लाख ९६ हजार ५०
लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ८९ हजार ७५३ अर्ज प्रक्रियेत असून
८ हजार २५१ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. तसंच ५५६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
७११ लाख रुपयांचं अनुदान थेट वर्ग करण्यात आलं असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितलं.
****
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता विशेष
बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात
आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा
शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे आठ
हजार १३९ कोटी रुपये इतक्या रकमेचं अर्थसहाय्य वितरित करण्याचे शासन निर्णय जारी झाले
आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मिळून ३४६ कोटी
३१ लाख ७० हजार रुपये देण्यात येतील.
****
लातूरच्या देवणी तालुक्यातील धनेगांव इथे आत्महत्याग्रस्त
शेतकरी कूंटुबातील सदस्य तसंच अतिवृष्टीमूळे बाधित शेतकऱ्यांना नाम फांऊडेशनच्या वतीने
बियाणांची मदत करण्यात आली. फाऊंडेशनचे प्रमुख ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते मकंरद अनासपुरे यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रातिनिधिक
स्वरुपात महाबीज कंपनीच्या जॉकी ९२१८ या बियाणाच्या ३० किलो बॅगचं वाटप केलं.
****
कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी गुजरातमध्ये बेस्तु
अर्थात नवीन वर्ष सुरू होतं. त्यानिमित्ताने गुजराती बांधवांमध्ये नववर्षाचा उत्साह
दिसून येत आहे. या निमित्त तसंच साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्यानिमित्त
सोनं, चांदीची आभूषणं तसंच
विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल
आचार्य देवव्रत यांनी सर्वांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
अशियाई युवा कबड्डी स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष आणि
महिला संघांनी काल विजय मिळवले. बहारिनमध्ये मनामा इथं सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये
भारताच्या महिला संघाने इराणवर ५९-२६ असा विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या शर्यतीत जागा
मिळवली आहे. पुरुष कबड्डी संघाने पाकिस्तानच्या कबड्डी संघावर ८१-२६ अशी मात केली.
****
यंदाची फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर
ते १७ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचं अधिकृत चिन्हं
आणि गाणं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काल एका सोहळ्यात प्रकाशित
केलं. दलेर मेहंदी यांनी हे गाणं गायलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या
तीव्र धक्क्याने निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते.
राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या काळात, चाळीसगाव विधानसभेचं प्रतिनिधित्व
केलं होतं. आमदारकीपूर्वी त्यांनी, चाळीसगाव नगरपरिषदेचे, नगराध्यक्ष म्हणूनही, काम पाहिलं होतं. राजकीय वर्तुळात त्यांची एक, अभ्यासू नेते म्हणून, ओळख होती.
****
यंदा नवरात्रीपासून आतापर्यंत खरेदीत गेल्यावर्षीच्या
तुलनेत २५ टक्के वाढ झाल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या पाहणीत समोर आलं आहे. या कालावधीत पाच लाख
४० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची विक्री झाल्याचं
संघटनेच्या सर्वेक्षणात आढळून आलं. जीएसटी कपातीमुळे विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचं
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७२ टक्के व्यापाऱ्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ ऑक्टोबर ला आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी सांवाद साधणार आहेत. या
कार्यक्रमाचा हा १२७ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी १८००-११- ७८०० या टोल-फ्री क्रमांकावर, तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा My Gov ॲपवर नागरीकांना येत्या २४ तारखेपर्यंत
त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील.
****
No comments:
Post a Comment