Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज भाऊबीजेनिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ बहिणींमधल्या स्नेह आणि विश्वासाचं प्रतीक असलेल्या भाऊबीजेचा
सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, या नात्याची वीण आणखीन घट्ट व्हावी, अशी कामना पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली
आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमावरील
संदेशात भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत मेरा
बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या
कार्यकर्त्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. बिहार विधानसभा
निवडणुकीत भाजप आणि एनडीए चा विजय सुनिश्चित करण्यासाठी पक्षाचे सदस्य आणि कार्यकर्ते
अभूतपूर्व उर्जा आणि समर्पणाने कार्यरत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी
अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
****
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येक
घटकाला, विशेषतः सर्वात असुरक्षित आणि उपेक्षितांना
समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी केलं. केरळमधील तिरुअनंतपूरम इथं राजभवनात माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या
अर्धपुतळ्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
****
भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद
कालपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंग आज या परिषदेला संबोधित
करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत
विचारविनिमय होणार आहे. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या
सुरक्षास्थितीचा आढावा घेतील.
****
केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक, प्रक्रिया करणारे, मिश्रण करणारे, पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या
प्रत्येक संबंधिताला नोंदणी करणं बंधनकारक केलं गेलं आहे. यासोबतच या सर्व भागधारकांना
उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला, त्यांच्या उत्पादनांची आणि साठ्याची माहिती देणंही अनिवार्य
केलं आहे. यामुळे खाद्यतेल क्षेत्राशी संबंधीत अचूक आकडेवारी संकलित करणं, साठ्यावर देखरेख ठेवणं आणि याआधारे धोरणांची आखणी करताना
मदत होणार असल्याचं विभागानं म्हटलं आहे.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या
शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रेला आज सुरवात झाली. कुकडेल इथल्या सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही सरदार सन्मान यात्रा सुरु झाली. २८
ऑक्टोंबर पर्यत नंदुरबार जिल्ह्यातल्या १२० हुन अधिक गाव-खेड्यांमध्ये भ्रमंती करुन
ही यात्रा एकता स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणार आहे.
****
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली
असून भारतीय संघाचा आज मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी
हा सामना अतिशय महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सुपर-फोर फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
आजच्या सामन्यातून चौथ्या स्थानावरील संघ ठरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांचे गुण
समान असून सरस धावगतीत भारत न्यूझीलंडपेक्षा पुढं आहे.
****
अॅडलेड इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला फलंदाजीसाठी
आमंत्रित केलं. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन
गिल ९ धावा करुन बाद झाला. सुरुवातीच्या पडझडीनंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी
शतकी भागीदारी करत डाव सावरला. रोहित शर्मा ७३ तर श्रेयस अय्यर ६१ धावा करुन बाद झाले.
भारतानं ५० षटकांत ९ बाद २६४ धावा केल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील चाटोरी परिसरातील
भारतीय सैन्यात सेवारत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी सामाजिक संस्थेनं कृतज्ञता
सोहळा आयोजित करून कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील
पाच वर्षांपासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो. यावर्षी परभणी शहराच्या पंचक्रोशीतील
भारतीय सैन्य दलात सेवारत असलेल्या ३० सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमाच्या
वेळी सैनिक आणि कुटुंबीयांसह सदस्यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून
त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment