Thursday, 23 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दिवाळी पाडवा सर्वत्र उत्साहात साजरा; खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी

·      खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्र सरकारकडे साठ्याची नोंदणी बंधनकारक

·      केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

·      लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन तर्फे बियाण्यांचं वाटप

आणि

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - न्यूझीलंड लढत

****

दीपावलीच्या प्रकाशपर्वातला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, हा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. विक्रम संवत २०८२ पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही काल झाला. पती-पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट, फराळ आणि खरेदीची लगबग दिसून आली. काही भागांत बळी पूजन, तर उत्तरेत गोवर्धन पूजेचा आणि अन्नकूट परंपरेचा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला.

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथल्या जगप्रसिद्ध गंगोत्री धामचे पवित्र दरवाजे काल अन्नकुट उत्सवानिमित्त बंद करण्यात आले. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या मंदिराला यावर्षी साडे सात लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. आज यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं बंद केली जातील.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या सराफा बाजारात सोनं खरेदी, तसंच कापड, दुचाकी, चारचाकी, घरगुती तसंच इलेक्ट्रानिक साहित्य खरेदीसाठी काल पाडव्याच्या निमीत्ताने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, आज कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे. बहिणी आज भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. भावंडांमधील प्रेम, स्नेह आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त घराघरांत आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.

****

केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक, प्रक्रिया करणारे, मिश्रण करणारे, पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधिताला नोंदणी बंधनकारक केलं आहे. यासोबतच या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला, त्यांच्याकडच्या उत्पादनांची आणि साठ्याची माहिती देणंही अनिवार्य केलं आहे. यामुळे खाद्यतेल क्षेत्राशी संबंधीत अचूक आकडेवारी संकलित करणं, साठ्यावर देखरेख ठेवणं आणि याआधारे धोरणांची आखणी करताना मदत होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद कालपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंग आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होणार आहे. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षास्थितीचा आढावा घेतील. लष्कर, हवाईदल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयाने हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करणं हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता २०१४ मध्ये ३५ गिगावॅट्स होती, ती आता पाचपटींनी वाढून १९७ गिगावॅट्सवर पोहोचली आहे. यात मोठ्या जलऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण झालेल्या ऊर्जेचा समावेश नाही. २०३० पर्यंत बिगरजीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅट्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

वस्तु आणि सेवा  - जीएसटी कररचनेत बदल गेल्या २२ सप्टेंबरपासून लागू झाले. यामुळे स्वयंचलीत वाहन क्षेत्रासह अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जास्त बदल पाहायला मिळत आहे. त्यातच दसरा, दिवाळी सारख्या मोठ्या उत्सवामध्येही या बाजारपेठेमध्ये भरभराट तसंच मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथले वाहनक्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ उद्योजक उमेश दाशरथी यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – उमेश दाशरथी

****

केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. एकीकडे राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे असं म्हणत, सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न त्यांनी विचारला. राज्यातल्या आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं वडेट्टीवार यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यभरात ३६५ दिवसांत १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. या विभागाच्या वतीनं काल मुंबईत मुलुंड इथं "दीप उत्सव दिवाळी पहाट" हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्ती वेतन संदर्भात त्रुटींचे निराकरण करण्याचं आश्वासन दिलं.

****

ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं काल पुण्यात निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. डॉ. होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातला इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यातही चिटणीस यांनी मोलाची भूमिका बजावली. १९७० च्या दशकापासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

लातूर जिल्ह्यात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन तर्फे रब्बी हंगामासाठी हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथून या वाटपाची सुरुवात करण्यात आली. अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी नाम फाउंडेशन काम करणार असून, लातूर जिल्ह्यात हरभरा आणि ज्वारी बियाण्याच्या दोन हजार पिशव्या वाटणार असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथले दिव्यांग रवींद्र इंगळे यांनी स्वदेशीचा नारा देऊन स्वत: तयार केलेल्या पणत्या, वाती विकण्याचा व्यवसाय केला. भारतीयांनी स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला. यामधून मिळणाऱ्या नफ्यामधून काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहितीही इंगळे यांनी दिली.

****

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या, आदिवासी पाड्यांवर दरवर्षी प्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. मागील २६ वर्षांपासून ते आपल्या घरी दिवाळी साजरी न करता, भिंगारा, गोमाल, चाळीसटपरी, उमापूर अशा दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या आदिवासींमध्ये जाऊन, कपडे आणि मिठाई वाटप करतात.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल. गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं दसरा, दिवाळी आणि छट पूजेचा उत्सव लक्षात घेत २७३ रेल्वे गाड्या वाढवल्या असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी दिली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रेल्वेचा नांदेड विभाग प्रवाशांकडे विशेष लक्ष देत असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. गर्दीचं नियोजन करण्यासाठी विशेष वॉर रूम उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे प्रवासाबाबत कोणतीही तक्रार असेल तर प्रवासी, एक तीन नऊ, या क्रमांकावर ती तक्रार नोंदवू शकतात, असं कामले यांनी सांगितलं.

****

No comments: