Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रीय योगदान देण्याची
संधी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. १७ व्या रोजगार मेळाव्यात आज देशभरातल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं
वाटप करण्यात आलं. त्यावेळी दृकश्राव्य संदेशातून पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं.
भविष्यातल्या भारतासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नियुक्ती मिळालेल्या
तरुणांना केलं, ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या
उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.
नागपूर इथं राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात झालेल्या
रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टपाल विभागात नियुक्त
झालेल्या २५ उमेदवारांना प्रतिनिधी स्वरूपात नियुक्तीपत्रं वितरित करण्यात आली. नियुक्त
झालेले उमेदवार ग्रामीण टपाल सेवा, टपाल विभाग या कार्यालयात प्रवेश करणार आहेत.
****
भारत-तिबेट सीमासुरक्षा पोलिस दल - आयटीबीपीचा स्थापना
दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त या सैनिकांचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी
कौतुक केलं आहे. आयटीबीपी ही हिमालयाच्या सीमांवर देशाच्या सुरक्षेची पहिली भक्कम भिंत
म्हणून उभी असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनीही आयटीबीपीच्या सैनिकांना शुभेच्छा
दिल्या आहेत. सामाजिक माध्यमांवर दिलेल्या संदेशात शहा यांनी, देशाच्या सुरक्षेसाठी सैनिकांनी केलेल्या शौर्य आणि त्यागाचं
कौतुक करत, हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं
आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या कुरनूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी
बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. हैदराबादहून बंगळुरूला जात असलेल्या या
बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात
आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल
तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान
राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.
****
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी संकेतचिन्ह तयार करण्यासाठी
नवीन आणि नविकरणीय ऊर्जा मंत्रालयानं स्पर्धा जाहिर केली आहे. यातील विजेत्यांना रोख
पारितोषिकं दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी मायजीओव्ही पोर्टलवर पाच नोव्हेंबर पर्यंत
प्रवेशिका दाखल करता येतील.
****
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज केलेल्या कारवाईत
दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण
घेत होते.
****
सुप्रसिद्ध वकील बिर्जीस देसाई लिखित ‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचं
आज मुंबईत राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास, वडनगरच्या सामान्य कुटुंबापासून देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत
कसा पोहचला याचं सविस्तर चित्रण हा पुस्तकात आहे. केवळ चरित्र नाही, तर राष्ट्राचं पुनरुजीवन आणि आत्मनिर्भरतेची कल्पना मांडणारी
ही कथा असल्याचं लेखक देसाई म्हणाले. पुस्तकात मोदी यांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या
धोरणांचा आढावा, त्यांचे परिणाम, आणि नेतृत्वावरील गैरसमज कसे पसरवले गेले याची माहितीही
समाविष्ट आहे.
****
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातल्या
संतनगरी शेगाव मध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत
आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो पर्यटक तसंच भक्तांनी शेगावनगरी फुलून
गेली आहे. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने
समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, बारी महाप्रसाद पारायण व्यवस्था केली असून, भक्तांच्या सोयीनुसार भक्तनिवासामध्ये राहण्याची व्यवस्था
करण्यात आल्याची माहिती संस्थांनच्या वतीने देण्यात आली.
****
बहारिन इथं झालेल्या १८ वर्षांखालील आशियायी युवा स्पर्धेत
कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघाने इराणचा ७५-२१ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं.
मुलांच्या संघानेही अंतिम सामन्यात इराणचा ३५-३२ असा पराभव केला. या दोन सुवर्णपदकांसह
भारत आता पदकतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment