Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 24 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
शासकीय नोकरी म्हणजे
देशसेवेत सक्रीय योगदानाची संधी-१७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन; देशभरात
५१ हजारांहून अधिक युवकांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान
·
भावी पिढीच्या आरोग्यासाठी
नैसर्गिक शेती अनिवार्य-राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं आवाहन
·
देशात लवकरच सहकारी
तत्त्वावर चालणारी ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू होणार
·
आधुनिक भारतीय जाहिरात
क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत निधन
आणि
·
संभाव्य शीतलहरीच्या
पार्श्वभूमीवर पूर्वतयारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सूचना
****
शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रीय योगदान देण्याची संधी
असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १७ व्या रोजगार
मेळाव्यात आज देशभरातल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान
करण्यात आली. त्यावेळी दृकश्राव्य संदेशातून पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं.
भविष्यातल्या भारतासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नियुक्ती
मिळालेल्या तरुणांना केलं,
ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख
नियुक्त्या करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
नागपूर इथं राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात झालेल्या
रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टपाल विभागात नियुक्त
झालेल्या २५ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात
नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. नियुक्त झालेले उमेदवार
ग्रामीण टपाल सेवा,
टपाल विभाग या कार्यालयात कार्य
करणार आहेत.
मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या
उपस्थितीत,
तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या
उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.
तरुण पिढी ही आपल्या देशाची ताकद असून, त्यांना
केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत आहे, असं मोहोळ यांनी यावेळच्या
भाषणात नमूद केलं. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या टपाल विभागासह भारतीय रेल्वे, सीमा
सुरक्षा बल,
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, सीमा सुरक्षा विभाग, केंद्रीय
औद्योगिक सुरक्षा बल,
सशस्त्र सीमा बल, भारतीय विमानतळ प्राधिकरणसह
सुमारे १०३ उमेदवारांना मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं.
यापैकी एका लाभार्थ्याने आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
लाभार्थी
बाईट
****
भावी पिढी आरोग्यवान होण्यासाठी नैसर्गिक शेती अनिवार्य
असल्याची भावना,
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली आहे. ते आज
मुंबईत 'नैसर्गिक शेती'
विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसंच
अधिकारी या चर्चासत्राला उपस्थित होते. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादनात वाढ होते, पर्यावरण
रक्षण तसंच समस्त प्राणिमात्रांचं कल्याण अंतर्भूत असल्याने, 'नैसर्गिक शेती'
हे पवित्र कार्य असून ते धर्मातीत असल्याचं, राज्यपालांनी
नमूद केलं.
****
बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांची काळी यादी तयारी करुन
त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करावी असे निर्देश राज्य
सरकारनं दिले आहेत. शिधापत्रिकांचं वितरण करताना कागदपत्रांची काटेकोर पडताळणी
करावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
देशात लवकरच ‘भारत टॅक्सी’ ही सहकारी तत्त्वावर चालणारी
टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. प्रारंभी या प्रकल्पाचा प्रायोगिक टप्पा दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात
आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून, त्यानंतर
टप्प्याटप्प्याने देशभरात या सेवेचा विस्तार होईल. अशाप्रकारची ही
देशातील पहिलीच सहकारी टॅक्सी सेवा ठरणार असून, ती
‘मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह टॅक्सी लिमिटेड’ या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत राहील, असं
सहकार मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवाकर- जीएसटी परिषदेने जीएसटी नोंदणी प्रक्रिया
अधिक सोपी,
सहज आणि पारदर्शक करण्याच्या उपायांना मंजुरी दिली आहे, असं
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद इथं
नव्या सीजीएसटी इमारतीच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. देशभरातील जीएसटी सेवा
केंद्रांमध्ये पुरेशी कर्मचारी व्यवस्था, सोयी-सुविधा आणि योग्य
देखभाल याची खात्री केली जाईल, जेणेकरून करदात्यांना वेळेवर आणि
दर्जेदार सेवा मिळू शकतील,
असंही सीतारामन यांनी सांगितंलं.
****
आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे
यांचं मुंबईत निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने
आजारी होते. ऑगिल्व्ही या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना
२०१६ साली पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या
मान्यवरांनी पियुष पांडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली
वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात, मोजक्या
शब्दांत नेमका संदेश पोहचवण्यात निपूण, शब्दांचा किमयागार म्हणता
येईल अशा साक्षेपी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो, या शब्दांत पियुष पांडे
यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता, गेल्या
काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी
पूर्वतयारी करावी,
अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिली आहे. १९ राज्य
सरकारांना आणि ४ केंद्रशासित प्रदेशांना ही सूचना करण्यात आली आहे. २०१९ ते २०२३
या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे ३ हजार ६३९ मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आयोगाने
दिली. समाजातल्या दुर्बल समाजघटकांना थंडीच्या
तडाख्यापासून संरक्षण देण्याच्या हेतूने, मानवाधिकार आयोगाने
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
****
आज जागतिक पोलिओ दिन. देशाच्या पोलिओ निर्मूलनातलं यश हे
समर्पित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झालं असून, त्यांनी
घराघरात जाऊन प्रत्येक मुलाला पोलिओची लस मिळेल याची
खात्री केली,
असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश
नड्डा यांनी म्हटलं आहे. वेळेवर लसीकरण
करून प्रत्येक मुलाचं संरक्षण करावं आणि आरोग्यदायी, पोलिओमुक्त
भारतासाठी एकत्र काम करावं,
असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे
****
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीसाठी आज नांदेड
इथं सकल ओबीसी समाजाची बैठक झाली. जिल्ह्यातील ओबीसी समाजाने आपली भूमिका ठामपणे
मांडण्यासाठी तसच सकल ओबीसी समाजानं जागरूक राहावं, असं आवाहन यावेळी
करण्यात आलं.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या
कामगारांनी अहोरात्र सेवा बजावत सणासुदीच्या काळात मुंबई महानगरात निर्माण
झालेल्या सुमारे तीन हजार मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याचं प्रभावीपणे निर्मूलन केलं
आहे. मुंबई महानगर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी केलेलं सहकार्य आणि स्वच्छता
कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीसाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांचे आभार
मानले आहेत.
****
सहकारातून विकास, विकासातून समृद्धी साधता
येते, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते
आज नादेड इथं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाच्या ३० व्या गळीत हंगामाला
प्रारंभ झाल्यानंतर बोलत होते. या कारखान्याची तीन दशकांची ही वाटचाल म्हणजे केवळ
ऊस गाळपाची कथा नाही तर शेतकऱ्यांच्या परिश्रमाची, सहकाराच्या शक्तीची
आणि सामूहिक विकासाच्या जिद्दीची कहाणी आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी आणि
कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन
आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही संघाच्या भाग्यनगर इथल्या कार्यालयावर
मोर्चा नेण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला. वंचित आघाडीचे
नेते सुजात आंबेडकर,
अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, अरुंधती
शिरसाठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी
परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.
****
नांदेड इथं येत्या तीन नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३
वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या
सरी कोसळल्या. धुळे जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या
वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज पासून तीन दिवस हलका ते मध्यम
स्वरूपात पाऊस पडेल तसच वादळी वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने
दिला आहे.
****
बहारिन इथं झालेल्या १८ वर्षांखालील आशियायी युवा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताच्या महिला
संघाने इराणचा ७५-२१ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. मुलांच्या
संघानेही अंतिम सामन्यात इराणचा ३५-३२ असा पराभव केला. या दोन सुवर्णपदकांसह भारत आता
पदकतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment