Friday, 24 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      १७ व्या रोजगार मेळाव्यात आज होणार पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

·      तिन्ही सेनादलांसाठी ७९ हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी

·      दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेंबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा

·      सुप्रसिद्ध वकील बिर्जीस देसाई लिखित ‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचं आज मुंबईत राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

आणि

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव करत भारत उपान्त्य फेरीत दाखल

****

१७ व्या रोजगार मेळाव्याचं आज देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ५१ हजारांहून अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे.

****

संरक्षण अधिग्रहण परिषदेनं तिन्ही सेनादलांसाठी ७९ हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. याअंतर्गत भारतीय लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली मार्क टू, नौदलासाठी जहाज आणि युद्धसामग्री वाहून नेणारी जहाजे, बंदूक, हवाई दलासाठीही लांब पल्ल्याची लक्ष्य भेदी प्रणाली आणि इतर प्रस्तावांचा समावेश आहे.

****

दिवाळी आणि आगामी छठ पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेंबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीतल्या विशेष वॉर रुममधून आढावा घेतला. या विशेष रेल्वेंचं निरीक्षण आणि देखेरेखीसाठी तसंच सणांच्या कालावधीत रेल्वेस्थानकांवर गर्दी झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने हा विशेष कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,

बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

देशात नियमित रेल्वेगाड्यांसोबतच दीड हजार विशेष रेल्वेगाड्या दिवाळीच्या काळात सोडण्यात येत असून, दररोज ३०० विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या महिन्याच्या एक तारखेपासून पुढील महिन्याच्या ३० तारखेपर्यंत १२ हजारांहून अधिक विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातली अग्रगण्य उत्पादक कंपनी अत्याधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनात प्रकल्प उभारणार असून, या प्रकल्पासाठी मिहान तर्फे २३३ एकर भूखंडाचं वितरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ही कंपनी भारतात तब्बल १२ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे, ज्यापैकी ६८० कोटींची गुंतवणूक नागपूरच्या मिहानमध्ये होणार आहे. या प्रकल्पामुळे ४०० प्रत्यक्ष आणि एक हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांना बळ देणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर नागपूरचं स्थान अधिक दृढ करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बिहारमध्ये विधासभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं काल महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. महाआघाडी सत्तेत आली तर विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली.

****

देशभरात काल भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा झाला. प्रथेनुसार भाऊबीजेच्या दिवशी उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची दारं विधिवत बंद करण्यात आली. या मोसमात १७ लाख ६८ हजार ७९५ भाविकांनी केदारनाथांचं दर्शन घेतलं.

****

बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे. यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल. त्यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणं सोपं होणार आहे. बँकिंग कायद्यातल्या या संदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

भारताच्या गगनयान या मानवरहित अंतराळयानाच्या निर्मितीचं ९० टक्के काम पूर्ण झालं असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे अध्यक्ष डॉ. व्ही नारायणन् यांनी काल बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या उड्डाणात व्योममित्र हा यंत्रमानव यानातून पाठवला जाईल. २०२७ मध्ये गगनयानचं पूर्ण उड्डाण होणार असून, त्यावेळी तीन भारतीय अंतराळवीर त्यातून प्रवास करुन परत पृथ्वीवर येतील, असं त्यांनी सांगितलं.

****

सुप्रसिद्ध वकील बिर्जीस देसाई लिखित ‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचं आज मुंबईत राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास, वडनगरच्या सामान्य कुटुंबापासून देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत कसा पोहचला याचं सविस्तर चित्रण हा पुस्तकात आहे. केवळ चरित्र नाही, तर राष्ट्राचं पुनरुजीवन आणि आत्मनिर्भरतेची कल्पना मांडणारी ही कथा असल्याचं लेखक देसाई म्हणाले. पुस्तकात मोदी यांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या धोरणांचा आढावा, त्यांचे परिणाम, आणि नेतृत्वावरील गैरसमज कसे पसरवले गेले याची माहितीही समाविष्ट आहे.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल नवी मुंबईत झालेल्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत प्रतिका रावल आणि स्मृति मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर ४९ षटकात तीन बाद ३४० धावा केल्या. प्रतिकानं १२२, तर स्मृतिने १०९ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी महिला विश्वचषकात भारताची विक्रमी १२२ धावांची भागीदारी केली. सामन्यादरम्यान पावसाने अडथळा आणल्यामुळे भारताला ४९ षटकांचीच फलंदाजी करता आली. त्यानंतर डकवर्थ - लुईस नियमांनुसार न्यूझीलंडसमोर ४४ षटकांत ३२५ धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं असताना, त्यांचा संघ २७१ धावाच करु शकला. भारतासाह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपान्त्य फेरीत खेळणार आहेत.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला ॲडलेड इथं झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी राखून जिंकला असून, मालिकेतही दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं ४७व्या षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं.

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रेला काल सुरवात झाली. कुकडेल इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही सरदार सन्मान यात्रा सुरु झाली. २८ ऑक्टोंबर पर्यत नंदुरबार जिल्ह्यातल्या १२० हुन अधिक गाव-खेड्यांमध्ये भ्रमंती करुन ही यात्रा एकता स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणार आहे.

****

परभणीमध्ये पालम तालुक्यातल्या चाटोरीमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो. यावेळी सैनिक आणि कुटुंबीयांचा मानपत्र, शाल, श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

****

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लाडगाव इथं भेट देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसंच नागरिकांशी संवाद साधला. लाडगाव इथले सरपंच गजानन बागल आणि विजय बागल यांच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ या कार्यक्रमाला बागडे उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते नेकनूर इथल्या श्रीगुरू बंकटस्वामी देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत एकूण तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन काल करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत प्रसादालय बांधकाम, भक्तनिवास, संरक्षण भिंत आणि स्वच्छता गृह या महत्त्वाच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

****

No comments: