Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचं नाशिक इथं आगमन झालं असून आजपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या
३८व्या अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात नियोजित अध्यक्ष महंत मोहनराज
कारंजेकर बाबा हे परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री यांच्याकडून
पदभार स्वीकारणार आहेत.
****
देशाच्या परकीय चलन साठ्यात
सुमारे साडेचार अब्ज डॉलर्सची वाढ होऊन तो ७०२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. रिझर्व्ह
बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकीय पुरवणीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचा
साठाही जवळजवळ ६ पुर्णांक २ अब्ज डॉलर्सनं वाढून १०८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला.
दरम्यान, परकीय चलन मालमत्ता १ पुर्णांक ७ अब्ज डॉलर्सनं कमी होऊन ५७० अब्ज डॉलर्सवर आली
आहे.
****
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली-एनपीएस आणि एकीकृत पेन्शन योजना-युपीएस अंतर्गत जीवन चक्र
आणि संतुलित जीवन चक्रसारख्या गुंतवणूक पर्यायांचा विस्तार करण्यास सरकारने मंजुरी
दिली आहे. खाजगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पर्यायांप्रमाणेच अधिक लवचिक गुंतवणूक पर्याय
शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पर्यायांचा
उद्देश निवृत्ती योजनात लवचिकता वाढवणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडी आणि जोखीम
क्षमतेनुसार त्यांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य देणे हा आहे.
केंद्र सरकारचे कर्मचारी आता
युपीएस आणि एनपीएस अंतर्गत डिफॉल्ट पर्यायासह अनेक गुंतवणूक पर्यायांमधून निवड करू
शकतात. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदे मिळणार आहेत.
****
भ्रष्टाचार निर्मुलनासाठी
जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुनं दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर
या जन्मदिनापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी २७ ऑक्टोबर ते
२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर आयोजित होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबवले
जाणार आहेत. ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ अशी यंदाची संकल्पना आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार आज
नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांचं आज सकाळी नांदेड इथं विमानतळावर आगमन झालं. सहकार मंत्री
बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर यांनी
पवार यांचं विमानतळावर स्वागत केलं. उपमुख्यमंत्री आज उमरी तसंच देगलूर इथं कार्यकर्ता
मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.
हा या कार्यक्रमाचा १२७ वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे. हिंदी
प्रसारणानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई इथले वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन
संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि
गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत
यांनी हा पदभार चंदनवाले यांच्याकडे सोपवला. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर
यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
****
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या
आगामी निवडणुकीसाठी काल नांदेड इथं सकल ओबीसी समाजाची बैठक झाली. जिल्ह्यातील ओबीसी
समाजानं आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठी सकल ओबीसी समाजानं जागरूक राहावं, असं आवाहन
यावेळी करण्यात आलं.
****
नांदेड इथं येत्या तीन नोव्हेंबर
रोजी दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला
आहे. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
सर्बियामध्ये सुरू असलेल्या
जागतिक अंडर-२३ कुस्ती स्पर्धेत, भारतीय महिला कुस्तीगीर हंसिका लांबा हिनं ५३ किलो वजनी
गटात आणि सारिका मलिक हिनं ६९ किलो वजनी गटाच्या अंतीम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या
त्यांची जपानी प्रतिस्पर्ध्यांशी सुवर्णपदकासाठी लढत होईल. भारतीय महिला कुस्तीगीरांनीही
त्यांच्या संबंधित वजन गटात पाच कांस्यपदके जिंकली आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात
सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला शेवटचा सामना आज सिडनी इथं सुरु
आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, कांगारु संघानं
४६ षटकं आणि ४ चेंडूत सर्वबाद २३६ धावा करुन भारतीय संघासमोर विजयासाठी २३७ धावांचं
आव्हान दिलं. भारतातर्फे हर्षित राणानं ४ तर वाशिंग्टन सुंदरनं दोन गडी बाद केले.
****
No comments:
Post a Comment