Wednesday, 3 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

· अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

·      राज्य विधिमंडळाचं येत्या आठ डिसेंबरपासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन

·   समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजवर कठोर कारवाईची गरज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त

·      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांचा पार्थिव देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान

आणि

·      दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेला ३५९ धावांचं आव्हान

****

राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांनी केला होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. पायाभूत सुविधांबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. या बोगद्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिमेला असणाऱ्या किनारी मार्गाला जोडणं शक्य होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

****

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आठ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरूवात होणार आहे. मुंबईत विधान भवनात आज सकाळी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. १४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १३ तसंच १४ डिसेंबरला शनिवारी तसंच रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज होणार आहे.

****

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज या दोन्ही बाबींवर कठोर कारवाईची गरज केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. एआयनिर्मित आक्षेपार्ह साहित्यावरही कठोर कारवाई आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.

****

देशात आठ लाखांहून अधिक सहकारी संस्था असून, त्यापैकी समारे सव्वा दोन लाख सहकारी संस्था महाराष्ट्रात असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. एनसीओएलने पंजाबराव देशमुख कृषी अभियानांतर्गत अकरा संस्थांसोबत करार केला असून, त्या माध्यमातून विविध कृषी उत्पादनांची खरेदी तसंच निर्यात केली जात असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

****

जागतिक नाविन्यता निर्देशांकात गेल्या दहा वर्षात भारताने ८१ वरून ३८व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुजूमदार यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. खासदार डॉ फौजिया खान यांच्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने ते उत्तर देत होते.

जल सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. डॉ फौजिया खान यांनी या चर्चेत सहभाग घेत कचरा व्यवस्थापन आणि प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी नागरिकांनी सिविक सेन्स अर्थात नागरी संवेदनांचं भान राखण्याचं आवाहनही केलं. प्रफुल्ल पटेल यांनी नागरी तसंच औद्योगिक भागातून भूजलात होणारं प्रदुषण रोखण्याच्या गरजेकडे लक्ष वेधलं.

****

लोकसभेत आज केंद्रीय उत्पाद शुल्क सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक चर्चेसाठी सदनासमोर केलं. तंबाखू उत्पादनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्काच्या दरात सुधारणा करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. खासदार सुप्रिया सुळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, प्रशांत पडोळे यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.

****

दिव्यांग व्यक्तींना समानतेची वागणूक देणारा समाजच खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना, आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी, राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी ही भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या -

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दिव्यांगजनांनी विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः खेळांमध्ये मिळवलेलं यश म्हणजे सर्वांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं सांगून गेल्या वर्षीच्या पॅरालिम्पिक्समध्ये २९ पदकं पटकावणाऱ्या भारतीय चमूचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.

****

बालकांमधील दिव्यांगत्वाचे निदान करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडीस्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी ही माहिती दिली. दिव्यांग दिनानिमित्त विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या ५७ दिव्यांगांच्या शाळांतील ३३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, समुहनृत्य गायन, मुकनाट्य, वैयक्तिक नृत्य, लावणी, देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांगांचा तसेच दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा आज सत्कार करण्यात आला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या सर्वांना गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडूनही दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग मित्र यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

****

ज्येष्ठ सामाजिक कायकर्ते पन्नालाल सुराणा यांचा पार्थिव देह आज सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. सुराणा यांचं काल निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आलं. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष असलेले सुराणा यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत

जयप्रकाश नारायण यांच्यासोबत बिहारमध्ये प्रथम भूदान चळवळ आणि त्यानंतर आणिबाणीविरोधातल्या आंदोलनात पन्नालाल सुराणा यांचा सक्रीय सहभाग होता. विविध संस्था संघटनांच्या कार्यकारिणीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. दैनिक मराठवाडाचं संपादकपद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. दुष्काळ निर्मुलन, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले सुराणा यांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, तसंच व्यक्तिचित्रण आदी विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. किल्लारीच्या प्रलयंकारी भूकंपानंतर सुराणा यांनी नळदुर्गजवळ उभारलेल्या ‘आपलं घर’ या शाळेने अनेक निराधार मुलांना हक्काचं घर मिळालं. सुराणा यांच्या निधनानं, एक द्रष्टा मार्गदर्शक हरपल्याची भावना, समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली. समाजकारण आणि राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याकरता जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी राखीव ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या आज रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं साऊथ अफ्रिका संघाला ३५९ धावांचं आव्हान दिलं. साऊथ अफ्रिका संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारतानं पन्नास षटकात पाच बाद ३५८ धावा केल्या. विराट कोहलीनं १०२ आणि ऋतुराज गायकवाडनं १०५ धावांची शतकी खेळी केली. यशस्वी जैस्वाल २२, रोहीत शर्मा १४ धावांवर बाद झाले. तर के. एल. राहूल ६६ आणि रविंद्र जडेजा २४ धावांवर नाबाद राहिले. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा पाहुण्या संघाच्या चार षटकांत बिन बाद २५ धावा झाल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...