Friday, 3 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

      विमुद्रीकरणानंतर देशातल्या अनेक वृत्तपत्रांना त्यांच्या काही आवृत्या बंद कराव्या लागल्या, हा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. राज्यसभेत ते आज बोलत होते. सरकार वेळोवेळी जाहिरात धोरण ठरवत असून, वास्तवात छापल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांवर विमुद्रीकरणाचा काही परिणाम झाला नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसनं केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केल्याबद्दल नायडू यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, विमुद्रीकरणाला विरोध केल्यानं, तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्यावर सरकारने कारवाई केल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज सभात्याग केला.

****

२०१६ वर्षात पंतप्रधान कार्यालयाकडे दहा लाख सार्वजनिक तक्रारी दाखल झाल्या असल्याचं, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत सांगितलं. सरकारनं २०१५ मध्ये सुरू केलेल्या ऑनलाईन सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या माध्यमातून या तक्रारी दाखल केल्या जातात. 

****

आयकरदात्यांनी विमुद्रीकरणानंतर बँकेत जमा केलेल्या रकमेची ऑनलाईन तपासणी करून घेण्याचे निर्देश, आयकर विभागानं दिले आहेत. नोटाबंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी दुसऱ्याच्या बँक खात्याचा वापर केल्याचं उघडकीस आलं आहे, त्यामुळे आपल्या खात्यात रकमेत तफावत आढळल्यास तत्काळ आयकर विभागाला सूचित करण्यास सांगण्यात आलं आहे. 

****

माजी केंद्रीय मंत्री खासदार ई अहमद यांच्या पार्थिव देहावर आज केरळमध्ये कन्नूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ७८ वर्षांचे होते. परवा संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी अहमद यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता, त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यात काल सकाळी त्यांचं निधन झालं होतं.

****

डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. सर्वोत्तम प्रसारण सेवा देणं आणि डिजिटल माध्यमातून प्रसारण प्रक्रिया सोपी करणं ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

एअरसेल मॅक्सिस प्रकरणी नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांना दोषमुक्त ठरवलं आहे. गुन्हे अन्वेषण विभाग तसंच सक्तवसुली संचालनालयानं त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.

****

सीमा सुरक्षा दल-बीएसएफ मधल्या भोजन व्यवस्थेबद्दल सोशल मीडियावर तक्रार करणारा बीएसएफ जवान तेजबहादूर यादव याचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तेजबहादूर याने केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून, त्याच्यावर शिस्तभंगाचाही आरोप असल्यानं, हा अर्ज नामंजूर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यादव याला अटक केल्याचा तसंच त्याचा छळ केला जात असल्याच्या आरोपाचा मात्र बीएसएफनं इन्कार केला आहे.

****

वीज बिलाची वसूली अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेनं करावी, यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिला आहे. ते आज मुंबई इथं आढावा बैठकीत बोलत होते. थकबाकी वसूलीबाबत गांभीर्यानं कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

राज्यात आतापर्यंत फक्त ५४ टक्के सातबारा उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचं या विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत सर्व साताबारा डिजिटल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

****

परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेसंबंधी निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्‍याय्य वातावरणात पूर्ण होण्‍याच्या दृष्‍टीनं ध्वनिक्षेपकाचा वापर, शासकीय वाहनांचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कापडी फलक लावणं, भाषण देणं याविषयीच्या नियमांचा यात समावेश आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'प्रयोगशाळेतील उपकरणे दुरुस्ती आणि देखभाल' या विषयावर येत्या सोमवारपासून पाच दिवशीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातली विविध उपकरणं दुरुस्ती तसंच देखभालीबाबत प्रशिक्षणही दिलं जाईल.

****

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 02 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.

****

राजकीय पक्षांना आता दरवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत लेखा परीक्षित आयकर विवरणपत्र सादर करावं लागेल, असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं आहे. ठराविक वेळेत विवरणपत्र सादर न केल्यास आयकरातून सुट मिळणार नसल्याचं अधिया यांनी स्पष्ट केलं. राजकीय पक्षांना रोख्यांद्वारे मिळालेल्या देणगीबाबत सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, देणगी देणाऱ्यांची माहितीही जाहीर करणार नसल्याचं अधिया यांनी स्पष्ट केलं. 

****

राज्यसभेत आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चा झाली. सत्ताधारी तसंच विरोधी बाकांवरच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेत प्रस्तावच्या समर्थनात तसंच विरोधात आपली मतं मांडली.

लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित ठेवण्यात आलं आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार ई अहमद यांना परवा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसदेत हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर काल सकाळी त्यांचं निधन झालं, त्यांच्या स्मरणात लोकसभेचं कामकाज आज स्थगित ठेवण्याचा निर्णय लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कालच जाहीर केला होता.

****

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत असून, यासाठी रोखरहित व्यवहार महत्वाचं पाऊल ठरत असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. राजस्थानात अलवर इथं एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नागरिकांनी रोखरहित व्यवहार आत्मसात करायला पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

मध्य प्रदेशातल्या देवास न्यायालयानं साध्वी प्रज्ञा सिंह सह आठ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंहवर २९ डिसेंबर २००७ रोजी देवास इथं संघ प्रचारक सुनिल जोशी यांची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळालेला नसल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंहची अद्याप तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नाही. 

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथलं नियोजित स्मारक येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. या स्मारकाच्या कामाची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारनं एक सल्लागार समिती स्थापन केली आहे. लंडन दौऱ्यावर असलेले बडोले यांनी या समितीची पहिली बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. समितीनं स्मारकासंबंधी काही सूचना सुचवल्या असून, त्यावर विचार सुरु असल्याचं बडोले यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. डॉ आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, ते ज्या इमारतीत वास्तव्यास होते, ती इमारत स्मारक स्वरुपात जतन करण्यासाठी राज्य सरकारनं ऑगस्ट २०१५ मध्ये खरेदी केली आहे. 

****

मुंबई महापालिकेचा कारभार सर्वांत पारदर्शक असल्याचं प्रमाणित केल्याबद्दल मुंबई महापालिकेनं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती यशोधर फणसे यांनी मांडलेल्या या ठरावाला तृष्णा राव यांनी अनुमोदन दिलं. मुंबईसह हैदराबाद महापालिकेनं सर्वात पारदर्शक कारभारात पहिलं स्थान मिळवल्याचं, यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

****

कृषी आणि ग्रामीण क्षेत्र सरकारची प्राथमिकता असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राजकीय देणग्यांमध्ये पारकर्शकता आणणं आणि काळा पैसा कमी करणं, हा अर्थसंकल्पाचं उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शेतकरी, डिजिटल अर्थव्यवस्था, कर प्रशासनात सुधारणा, ऊर्जा आणि स्वच्छ भारतसह दहा महत्वाच्या क्षेत्रावर भर देण्यात आला असल्याचं ते म्हणाले. जलद आर्थिक विकासामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात औरंगाबाद, नागपूर, आणि कोकणात विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. यासर्व ठिकाणी विविध पक्षांच्या बहुरंगी लढती होत असून, नागपूरमध्ये १६, अमरावती-१३, कोकणात-१० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस काल रद्द केल्यामुळे उद्या अमृतसरहून निघून नांदेडला परवा पोहोचणारी सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मात्र उद्या सकाळी नांदेडहून सचखंड एक्सप्रेस निर्धारित वेळेवर सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

//********//

आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०२ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

केंद्रीय अर्थसंकल्पाला विकासाला गती देणारा आणि प्रगतिशील अर्थसंकल्प असल्याचं उद्योग जगतानं म्हटलं आहे. गुंतवणूक आणि मागणी दोन्हींवर हा अर्थसंकल्प केंद्रीत असल्याचं भारतीय उद्योग मंडळ - सीआयआयचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची आर्थिक बाजू मजबूत होणार असल्याचं मत फिक्कीचे सरचिटणीस डॉ. दिदार सिंग यांनी व्यक्त केलं.  

****

आज संसदेत राज्यसभेचं कामकाज होणार असून, लोकसभेचं कामकाज दिवंगत माजी केंद्रीय मंत्री इ अहमद यांच्या स्मरणार्थ स्थगित राहणार आहे. राज्यसभेच्या प्रस्तावित कामकाजामध्ये, दोन्ही सदनांना संयुक्त संबोधित केल्याबद्दल राष्ट्रपतींना धन्यवाद प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

****

गोवा आणि पंजाब राज्यात विधानसभेसाठी येत्या रविवारी मतदान होत आहे, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं उमेदवारांना पूर्वपरवनागीशिवाय उद्या आणि परवा वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना निवडणूक आयोगानं आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी नोटीस बजावली असून, उद्या दुपारपर्यंत यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आम आदमी पक्षानं पर्रिकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. 

****

महानगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा १० ते ५ लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे.  राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी मुंबई इथं ही माहिती दिली. जिल्हा परिषदांच्या उमेदवारांसाठी ही मर्यादा सहा ते चार लाख आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांकरिता चार ते तीन लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे.

****

कैलास मानसरोवर यात्रेसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. १२ जून ते आठ सप्टेंबर ही यात्रा चालणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. नोंदणीची अंतिम तारीख १५ मार्च असून, प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन करण्यात आली आहे.

//*******//

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 02 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शेतकरी, पायाभूत सुविधा, अंकेक्षित अर्थव्यवस्थेसह दहा विविध क्षेत्रांना अर्थसंकल्पात प्राधान्य

·      रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर

·      तीन लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर आयकर माफ; पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरचा आयकराचा दर पाच टक्क्यावर

आणि

·      जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल, शिक्षक मतदार संघातला निवडणूक प्रचार संपला

****

‘परिवर्तनशील, ऊर्जात्मक आणि पारदर्शक’ अशा भारताचं उद्दिष्ट ठेवत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ वर्षासाठीचा, २१ लाख, ४७ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला.

शेतकरी, पायाभूत सुविधा, अंकेक्षित अर्थव्यवस्थेसह, दहा विविध क्षेत्र, तसंच ग्रामीण भारत, युवा आणि गरिबी या क्षेत्रांनाही  अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं असल्याचं ते म्हणाले.

कृषी, ग्रामविकास आणि ग्रामीण रोजगार यासाठी, एकूण एक लाख, ८७ हजार, २२२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पाऊस चांगला झाल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर, सुमारे चार टक्क्यापर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करत, पाच वर्षात, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्याच्या संकल्पाचा त्यांनी पुनरूच्चार केला. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याचं उद्दीष्ट, १० लाख कोटी रुपयांनी वाढवण्यात आलं आहे.

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत, नऊ हजार कोटी रुपये. सूक्ष्म सिंचनासाठी नाबार्डमार्फत ४० हजार कोटी रुपये. दुग्धप्रक्रिया उद्योगासाठी तीन वर्षांकरता, आठ हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.

देशभरात १०० नव्या मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारण्याची घोषणाही जेटली यांनी यावेळी केली.

अंत्योदय योजनेअंतर्गत, एक कोटी कुटुंबांना २०१९ पर्यंत दारिद्ररेषेच्या वर आणलं जाईल.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत, कृषी उत्पन्न वाढवण्यासोबतच, महिलांना रोजगार मिळवून दिला जाईल. यासाठी सर्वाधिक, म्हणजे, ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत, दुर्गम भागात रस्ते बांधण्यासाठी यंदा, १९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बेघरांसाठी २०१९ पर्यंत, एक कोटी घरं बांधली जाणार आहेत.

पायाभूत सुविधा क्षेत्रात, रेल्वे, रस्ते आणि जलमार्गांसाठी भरीव तरतूद केली आहे. रेल्वे क्षेत्रासाठी प्रवासी सुरक्षा, आसनक्षमता वाढवणं, तसंच, रेल्वे स्वच्छतेवर भर दिला आहे. एक लाख कोटी रुपयांचा विशेष सुरक्षा निधी प्रस्तावित केला आहे. २ हजार २० पर्यंत, मानवरहित फाटकं बंद केली जाणार आहेत. २५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. ५०० रेल्वे स्थानकांवर अपंगासाठी विशेष सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. रेल्वे स्वच्छतेसाठी, ‘क्लीन माय कोच’ ही एस एम एस सेवा सुरु केली आहे.

इंडियन रेल्वे कॅटरींग ॲण्ड टुरीझम कार्पोरेशनच्या, I R C T C च्या माध्यमातून रेल्वे तिकीटाचं आरक्षण करतांना लावण्यात येणारं सेवा शुल्क रद्द करण्यात आलं आहे.

लष्करी जवान आणि माजी सैनिकांना आता रेल्वे तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.  रेल्वेसाठी एकूण १ लाख ३१ हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.



महामार्गांच्या विकासासाठी, ६४ हजार, ९०० कोटी रूपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी, दोन लाख, ७४ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यात माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनाचा समावेश नाही.

      राजकीय क्षेत्रातल्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, सरकारनं महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राजकीय पक्षांना आता, २ हजार रूपयांपर्यंतंच रोख रक्कम देणगी म्हणून स्वीकारता येणार आहे. त्यापुढच्या रकमेच्या देणग्या धनादेश किंवा अंकेक्षित व्यवहाराच्या माध्यमातून स्वीकारता येतील. या सर्व देणग्यांचं कर विवरण देणं, राजकीय पक्षांना बंधनकारक ठरणार आहे.



वैयक्तिक प्राप्तीकरामध्ये, अडीच लाख, ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरचा आयकराचा दर, दहा टक्क्यांऐवजी आता,  पाच टक्के करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांपासून दहा लाख रुपये उत्पन्नावर, आयकरात साडेबारा हजार रुपये सवलत देण्यात आली आहे तर, तीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर माफ करण्यात आला आहे,  तीन लाख ते साडे तीन लाख रुपये उत्पन्नावर, केवळ अडीच हजार रुपये आयकर आकारण्यात येईल. ५० लाख, ते एक कोटी रुपये उत्पन्नावरच्या आयकरावर, १० टक्के अधिभार आकारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. सुधारित प्राप्तीकर विवरण भरण्याची मुदत १२ महिने करण्यात आली आहे.



अंकेक्षित व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं, छोट्या आणि मध्यम दुकानदारांसाठी, अंदाजित उत्पन्नावर कर योजना प्रस्तावित आहे. ३ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. अंकेक्षित व्यवहारांसाठी आवश्यक यंत्रांना उत्पादन शुल्क, आणि इतर आकारांमधून सूट दिली आहे.

****

उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं असून, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी बळकटी मिळून, देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करेल, असं म्हटलं आहे.

****

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी मात्र, हा अर्थसंकल्प फुसका बार ठरल्याचं म्हटलं असून, शेतकरी, युवक आणि रोजगार निर्मितीसाठी काहीही तरतूद या अर्थसंकल्पात नाही, अशी टीका केली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा मजबूत, आणि धाडसी संकल्प असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनीही या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, जनतेला दिलेली आश्वासनं पूर्णच होत नाहीत, मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित केला.

****

औरंगाबादच्या चेम्बर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - सी एम आय ए च्या वतीनं, केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. उद्योगांसाठी कर कपातीच्या तरतुदीमुळे मराठवाड्यात छोट्या उद्योगांना चालना मिळून, रोजगार निर्मितीत वाढ होणार असल्याचं, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, मुनीश शर्मा आणि सुनील देशपांडे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असली तरी, राज्यात अस्थैर्य निर्माण होऊ नये, यासाठी राज्यस्तरावर भारतीय जनता पक्षा समवेतची युती सध्या कायम ठेवणार असल्याचं, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं. शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळातून बाहेर पडण्यास तयार आहेत, असं विधान पर्यावरण मंत्री, रामदास कदम यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

****

मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काल शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले.

      औरंगाबाद जिल्हा परीषदेसाठी एकूण ५१८, नऊ पंचायत समित्यांसाठी एक हजार २१६, जालना जिल्हा परीषदेसाठी ५७४ तर, आठ पंचायत समित्यांसाठी,एक हजार ७३, हिंगोली जिल्हा परिषदेसाठी ५१९, तर पाच पंचायत समित्यांसाठी ७५०, नांदेड जिल्हा परिषदेसाठी ८९२ आणि पंचायत समित्यांसाठी एक हजार १२८, बीड जिल्हा परीषदेसाठी ८५० तर, पंचायत समित्यांसाठी बाराशे, परभणी जिल्हा परिषदेसाठी ५१५ तर पंचायत समित्यांसाठी आठशे एकोणसाठ, उस्मानाबाद जिल्हा परिषदेसाठी ६५८ तर पंचायत समित्यांसाठी एक हजार एकशे पाच आणि लातूर जिल्हा परिषदेसाठी ५०८ तर, पंचायत समित्यांसाठी, ८३१ अर्ज दाखल झाले आहेत.

आज या सर्व अर्जांची छाननी होणार आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

दरम्यान, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी संपला. उद्या सकाळी ८ ते ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल.

****

औरंगाबाद महानगर प्रदेश समितीच्या सदस्य निवडीसाठी काल मतदान झालं. महानगरपालिकेतल्या सर्व नगरसेवकांनी तर ग्रामीण भागातल्या १७८ मतदारांपैकी फक्त ३८ जणांनीच मतदानात भाग घेतला.

****

काश्मीरमध्ये हिमस्खलनात वीरमरण आलेले, बीड जिल्ह्यातले विकास समुद्रे, आणि परभणीचे बालाजी अंभोरे या जवानांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

//*******//

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर केला. वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता आयकर भरावा लागणार नसून, साडे तीन लाख रुपये उत्पन्नावर फक्त अडीच हजार रुपये आयकर आकारण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात मांडला आहे.

या व्यतिरिक्त वार्षिक अडीच लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावरच्या आयकरात कपात करण्यात आली असून, आता पूर्वीच्या १० टक्क्यांऐवजी ५ टक्के कर प्रस्तावित आहे. ५० लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकरावर १० टक्के अधिभार आकारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. पाच लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपये इतक्या वार्षिक उत्पन्नावर आयकरात साडेबारा हजार रुपये सूट या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

५० लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योगांच्या करात ५टक्के कपात, तसंच द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या आयातीवरच्या सीमा शुल्कातही अडीच टक्के, इतकी कपात करण्याची तरतूद अर्थमंत्र्यांनी सुचवली आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत वर्षभरात १० लाख तलाव बांधण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात कृषीकर्ज वाटपाचं उद्दीष्ट १० लाख कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं असून, पीक विमा योजनेसाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

ग्रामीण तसंच कृषी संबंधित क्षेत्रासाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तेवीस कोटी तर महिला बालकल्याण विभागासाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण विभागासाठी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एक्केचाळीस हजार कोटी, तर परिवहन क्षेत्रासाठी दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

दुग्ध प्रकिया विकास निधीसाठी आठ हजार कोटी रुपये, सूक्ष्म सिंचन निधीसाठी पाच हजार कोटी रुपये तर अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. महिलांना स्वयंरोजगार शिक्षणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. युवकांसाठी ‘स्वयम् मंच’ स्थापन करून याअंतर्गत सुमारे साडे तीनशे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी तेवीस हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, २०१९ पर्यंत बेघरांसाठी एक कोटी घरं बांधण्याचं, तसंच एक कोटी कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी चौसष्ट हजार नऊशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, रस्ते बांधण्याची गती प्रतिदिन एकशे तेहतीस किलोमीटरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. द्वितीय श्रेणीतील शहरांसाठी खासगी सार्वजनिक सहभागातून विमानतळं उभारण्याचा प्रस्ताव आहे.

एक मे २०१८ पर्यंत १०० टक्के ग्रामीण क्षेत्रात विद्युतीकरण केलं जाणार असून, सहाशे पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.

क्षयरोग, कुष्ठरोग आणि कांजण्या या तीन रोगांचं समूळ उच्चाटनाचा निर्धारही जेटली यांनी व्यक्त केला आहे.

या वर्षीपासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर न करता, सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वेसाठीच्या तरतुदी आज अर्थमंत्री जेटली यांनी सादर केल्या.

रेल्वे प्रवास भाड्यात कोणताही बदल प्रस्तावित नसून, रेल्वेच्या ई तिकिटावरील सेवा कर रद्द करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला. येत्या वर्षात साडे तीन हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग विकसित केले जाणार आहेत. विनाचौकीदार रेल्वे क्रॉसिंग बंद होणार असून, सर्व रेल्वेगाड्यांमध्ये जैव शौचालयं बसवली जाणार आहेत. रेल्वेच्या विकासासाठी एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तर रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाचशे रेल्वे स्थानकं दिव्यांगांसाठी अनुकूल बनवली जाणार असून, सात हजार स्थानकं सौर ऊर्जेवर कार्यान्वीत केली जाणार आहेत.

तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार आता रोख स्वरूपात करता येणार नसून, राजकीय पक्षांना कोणत्याही व्यक्तीकडून रोख स्वरुपात दोन हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी घेता येणार नाही, यापेक्षा अधिक रकमेच्या देणग्या धनादेश किंवा डिजिटल स्वरूपातच स्वीकारता येईल, असं अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

****

उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं असून, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी बळकटी मिळून देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करेल, असं म्हटलं आहे.

****

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मात्र हा अर्थसंकल्प फुसका बार ठरल्याचं म्हटलं असून, शेतकरी, युवक आणि रोजगार निर्मितीसाठी यात काहीही तरतूद नसल्याचं आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी हा अर्थसंकल्प पोकळ घोषणांचा पाऊस असल्याचं म्हटलं आहे.

*****

आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

अर्थमंत्री अरुण जेटली आतापासून काही वेळात वर्ष २०१७-१८ चा  सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन अर्थमंत्री काही वेळापूर्वीच संसदेत पोहोचले आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री यासंदर्भातल्या प्रश्नांना ट्विटरवर उत्तरं देणार आहेत. माय क्वेश्चन टू एफएम ह्या हॅशटॅगचा वापर करून अर्थमंत्र्यांना ट्विटरवर प्रश्न करता येतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं काम सुरळितपणे चालू देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं असून, सर्व मुद्द्यांवर रचनात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

****

आकाशवाणीचा वृत्तविभाग आज सकाळी साडे दहा वाजता हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विशेष अर्थसंकल्पपूर्व चर्चा प्रसारित करणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या, अर्थसंकल्पीय भाषणाचं प्रसारण होणार असून, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजीमधून अर्थसंकल्पासंदर्भात प्रत्येकी पंधरा मिनिटांची दोन विशेष बातमीपत्रं प्रसारित होतील. यानंतर पुन्हा विशेष चर्चा प्रसारित केली जाणार आहे. या विशेष कार्यक्रमांमुळे दिवसा प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषांमधल्या बातमीपत्रांच्या वेळेत आज बदल होणार आहे.

****

आयकर विभागानं कालपासून ‘ऑपरेशन क्लीन मनी’या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमांची ई-पडताळणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात करविवरणपत्रातल्या माहितीशी विसंगत रोख व्यवहार करणारे सुमारे १८ लाख नागरिक आढळून आले आहेत.

****

आज देशभरात, विशेषत: उत्तर भारतात वसंत पंचमी साजरी केली जात आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करणारा हा सण दरवर्षी माघ पंचमीला साजरा केला जातो. शैक्षणिक संस्थांमधून सरस्वती पूजन कार्यक्रमांसह, ठिकठिकाणी होणाऱ्या पतंगबाजीच्या स्पर्धा याद्वारे हा सण साजरा होत आहे.

****

काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना दिल्ली इथं मानवंदना दिल्यानंतर राज्यातल्या शहीद जवानांचे पार्थिव देह काल रात्री पुण्यात आणण्यात आले असून, पुढे ते त्या त्या जवानांच्या जन्मगावी पोहचवण्यात येत आहेत बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातल्या गांजपूरच्या विकास समुद्रे या शहीद जवानाचा पार्थिव देह धारूरच्या शिवाजी चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर गांजपूर इथं  शासकीय इतमामात पार्थिव देहावर अंत्यसंस्क्‍ार करण्यात येतील, असं आमच्या वाताहरानं कळवलं आहे.

//*******//

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 01 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      २०१७- १८ वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार

·      काळ्या पैशाविरोधातल्या लढाईत विमुद्रीकरण हे महत्त्वाचं पाऊल - राष्ट्रपती

·      आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन; मराठा आरक्षण याचिकांवर २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी

आणि

·      जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; निवडणूक खर्च मर्यादेत वाढ

****

२०१७- १८ या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अर्थमंत्री अरूण जेटली आज संसदेत सादर करणार आहेत. या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च पूर्वी आगामी वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश यामागे आहे.

      नोटाबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याचं तसंच अर्थव्यवस्थेला गतीमान करण्याचं आव्हान केंद्र सरकारपुढे असणार आहे. कृषी, शेतकरी, ग्रामीण भाग, तरुण यांच्यासाठी काही विशेष योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. लघु आणि मध्यम उद्योगांनाही अर्थसंकल्पातून काही अपेक्षा आहेत. अपघातांच्या संकटातून रेल्वेची सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांकरता मोठा राखीव निधी उभारला जाण्याची तसंच  संरक्षण क्षेत्रासाठीही मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक कर रचनेतही बदलाच्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, २०१७ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल लोकसभेत सादर करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ७ पूर्णांक एक दशांश राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात विकास दर पावणे सात ते साडे सात टक्क्यांच्या दरम्यान असेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

अर्थसंकल्पाच्या सादर करण्याच्या वेळापत्रकात बदल तसंच रेल्वे अर्थसंकल्पाचं सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलिनीकरण यामुळे संसदेचं हे अधिवेशन ऐतिहासिक असल्याचं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल पहिल्या दिवशी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ते काल बोलत होते. काळ्या पैशाविरोधातल्या लढाईत विमुद्रीकरण हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. जनतेच्या सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचं सांगत, राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सामाजिक सुरक्षा योजना, मुद्रा योजना, जनधन योजना, यासह विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला.

****

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं काल राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या प्रमुख महामार्गावर हे आंदोलन करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. औरंगाबाद, हिंगोली, नांदेड सह अन्य ठिकाणी घडलेल्या किरकोळ घटना वगळता हे आंदोलन शांततेत पार पडलं. या आंदोलनात  महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलकांनी अनेक रस्त्यांवर वाहतूक रोखून धरली होती. यामुळे राज्यभरातल्या प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ जाळपोळीच्या घटना घडल्या तसंच काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकून वाहतूक रोखण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १६८ जणांवर कारवाई केली आहे.

मराठवाड्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आठ जिल्ह्यातले मुख्य रस्ते आंदोलकांनी काही काळ रोखून धरले होते. औरंगाबाद, नांदेड इथं आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तर हिंगोली इथं आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौक, पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रम चौक, वाळूज आणि हर्सुल भागात आक्रमक आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला. नांदेड शहरात कलामंदिर भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यामुळे इथंही आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला गेला, याच भागात किरकोळ दगडफेकीचीही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं राज्य परीवहन महामंडळाच्या बसवर दगडफेकीची घटना घडली. या घटना वगळता मराठवाड्यातल्या अन्य भागात हे आंदोलन शांततेत पार पडलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात आणि समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर येत्या २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. याचबरोबर याचिकाकर्त्यांनी  किंवा प्रतिवाद्यांनी यापुढे कोणतेही अनावश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराबाबतचा ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामपंचायतीच्या प्रमाणपत्राची आता आवश्यकता असणार नाही. याऐवजी स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. राज्य मंत्रीमंडळानं काल या संबंधिच्या नियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास मान्यता दिली. निवडणुकीपासून उमेदवार वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

वैद्यकीय आणि दंतवैद्यक शाखेत प्रवेश घेण्यासाठी देश पातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट येत्या सात मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसई ही परीक्षा घेणार असून देशातल्या ८० शहरात ती होणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून  अंतिम तारीख एक मार्च आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आजपासून आकाशवाणी विशेष एफ एम रेडिओ वाहिनी सुरू करत आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चंद्र पांडा यांच्या हस्ते या वाहिनीच्या प्रसारण सेवेस सुरूवात होईल. ही सेवा १०३ पूर्णाक सात मेगा हर्टझवर उपलब्ध असेल.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल औरंगाबाद जिल्ह्यातून जिल्हा परिषद गटांसाठी ९५ तर पंचायत समिती गणांसाठी १४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. मुंबई महापालिकेसह १५१ ते १७५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेसाठी ही मर्यादा दहा लाख रूपये करण्यात आली आहे. ११६ ते १५० सदस्य संख़्या असलेल्या पालिकेसाठी आठ लाख रूपये, ८६ ते ११५ सदस्य संख्यांसांठी सात लाख रूपये तर ६५ ते ८५ सदस्यांसाठी ही मर्यादा पाच लाख करण्यात आली आहे. तर ७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यांतल्या जिल्हा परिषदांसाठी सहा लाख रूपये आणि पंचायत समित्यांसाठी चार लाख रूपये, ६१ ते ७० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषंदासांठी पाच लाख रूपये तर पंचायत समित्यांसाठी साडेतीन लाख रूपये आणि ५० ते ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदांसाठी चार लाख आणि पंचायत समित्यांसाठी ही मर्यादा तीन लाख रूपये अशी करण्यात आली आहे.

****

केंद्र सरकारनं वाहनाशी संबंधित केलेली शुल्क वाढ मागं घ्यावी या मागणीसाठी काल रिक्षा चालकांनी  एक दिवसाचं आंदोलन केलं. औरंगाबाद शहरात पैठणगेटपासून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला. मराठवाड्यातल्या जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांनीही  या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

****

औरंगाबादच्या अंकित बावणेची क्रिकेटच्या भारत अ संघात निवड झाली आहे. हार्दिक पटेलकडे या संघाचं नेतृत्व आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रेबार्न इथं येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यात तो खेळणार आहे.

****

लातूर इथल्या कीर्ती तेल कंपनीमध्ये नऊ कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरून झालेल्या मृत्यू प्रकरणी कंपनी मालकासह चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कंपनीचे मालक कीर्ती भुतडा, संचालक एस. पी. गायकवाड, व्यवस्थापक एकनाथ केसरे, प्रकल्प प्रमुख मनोज क्षीरसागर यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

****

नांदेडहून हिंगोली, अकोला मार्गे अमृतसरला जाणारी नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेस आज दुपारी एक वाजता सुटणार आहे. दुसरी औरंगाबाद - मनमाड मार्गे धावणारी सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडला येणारी गाडी नियमित वेळेपेक्षा खूप उशीरा धावत असल्यामुळे आज ही गाडी नांदेडहून सुटणार नाही.

दरम्यान, परळीमार्गे जाणारी नांदेड ते पुणे त्रिसाप्ताहिक रेल्वे आजपासून पनवेलपर्यंत धावणार आहे. ही गाडी आता शनिवार वगळता दररोज पनवेलपर्यंत जाईल.

औरंगाबाद, मनमाडमार्गे धावणाऱ्या नांदेड पुणे नांदेड या द्वी साप्ताहिक गाडीच्या वेळेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

लातूर इथं राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेला लागलेल्या आगीत खराब झालेले ऑईल फिल्टर आणि भंगार साहित्य जळून खाक झाले. काल दुपारी लागलेली ही आग अग्नीशामक दलाच्या सहा बंबांनी आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//********//

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...