Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 2 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
विमुद्रीकरणानंतर देशातल्या अनेक वृत्तपत्रांना त्यांच्या काही आवृत्या
बंद कराव्या लागल्या, हा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू
यांनी फेटाळून लावला आहे. राज्यसभेत ते आज बोलत होते. सरकार वेळोवेळी जाहिरात धोरण
ठरवत असून, वास्तवात छापल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांवर विमुद्रीकरणाचा काही परिणाम झाला
नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसनं केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका
केल्याबद्दल नायडू यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान,
विमुद्रीकरणाला विरोध केल्यानं, तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंदोपाध्याय
यांच्यावर सरकारने कारवाई केल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज सभात्याग
केला.
****
२०१६
वर्षात पंतप्रधान कार्यालयाकडे दहा लाख सार्वजनिक तक्रारी दाखल झाल्या असल्याचं, केंद्रीय
मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत सांगितलं. सरकारनं २०१५ मध्ये सुरू केलेल्या
ऑनलाईन सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या माध्यमातून या तक्रारी दाखल
केल्या जातात.
****
आयकरदात्यांनी
विमुद्रीकरणानंतर बँकेत जमा केलेल्या रकमेची ऑनलाईन तपासणी करून घेण्याचे निर्देश,
आयकर विभागानं दिले आहेत. नोटाबंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी दुसऱ्याच्या बँक खात्याचा
वापर केल्याचं उघडकीस आलं आहे, त्यामुळे आपल्या खात्यात रकमेत तफावत आढळल्यास तत्काळ
आयकर विभागाला सूचित करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री खासदार
ई अहमद यांच्या पार्थिव देहावर आज केरळमध्ये कन्नूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. ते ७८ वर्षांचे होते. परवा संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी अहमद
यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता, त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यात काल
सकाळी त्यांचं निधन झालं होतं.
****
डिजिटल
तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय माहिती आणि
प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं
आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. सर्वोत्तम प्रसारण सेवा देणं
आणि डिजिटल माध्यमातून प्रसारण प्रक्रिया सोपी करणं ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी
यावेळी व्यक्त केलं.
****
एअरसेल
मॅक्सिस प्रकरणी नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन
आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांना दोषमुक्त ठरवलं आहे. गुन्हे अन्वेषण विभाग तसंच
सक्तवसुली संचालनालयानं त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
****
सीमा
सुरक्षा दल-बीएसएफ मधल्या भोजन व्यवस्थेबद्दल सोशल मीडियावर तक्रार करणारा बीएसएफ जवान
तेजबहादूर यादव याचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तेजबहादूर याने केलेल्या
आरोपांची चौकशी सुरू असून, त्याच्यावर शिस्तभंगाचाही आरोप असल्यानं, हा अर्ज नामंजूर
केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यादव याला अटक केल्याचा तसंच त्याचा छळ केला
जात असल्याच्या आरोपाचा मात्र बीएसएफनं इन्कार केला आहे.
****
वीज
बिलाची वसूली अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेनं करावी, यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई
करण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिला आहे. ते
आज मुंबई इथं आढावा बैठकीत बोलत होते. थकबाकी वसूलीबाबत गांभीर्यानं कार्य करण्याची
गरज त्यांनी व्यक्त केली.
****
राज्यात
आतापर्यंत फक्त ५४ टक्के सातबारा उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध असून, हे काम लवकरात
लवकर पूर्ण करुन व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचं या विभागाकडून सांगण्यात
आलं आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत सर्व साताबारा डिजिटल करण्याची घोषणा महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
****
परभणी
जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेसंबंधी
निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय
आणि न्याय्य वातावरणात पूर्ण
होण्याच्या
दृष्टीनं ध्वनिक्षेपकाचा वापर, शासकीय वाहनांचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कापडी फलक लावणं, भाषण
देणं याविषयीच्या नियमांचा यात
समावेश आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात
'प्रयोगशाळेतील उपकरणे दुरुस्ती आणि देखभाल' या विषयावर येत्या सोमवारपासून पाच दिवशीय
कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत प्रयोगशाळा
तंत्रज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातली विविध उपकरणं दुरुस्ती तसंच
देखभालीबाबत प्रशिक्षणही दिलं जाईल.
****
No comments:
Post a Comment