Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 18 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री
इ के पलानीसामी यांनी विधानसभेत आज विश्वासदर्शक
ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं १२२
तर विरोधात फक्त ११ मते पडली. विरोधी पक्ष डीएमकेच्या सदस्यांनी
सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्यामुळे त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं.
माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्यासह ११ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात
मतदान केलं.
****
उत्तर
प्रदेशात उद्या
होणाऱ्या तिसऱ्या फेरीच्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षेसह आवश्यक व्यवस्था तैनात
करण्यात आली आहे. या फेरीमध्ये १२ जिल्ह्यांतल्या ६९ मतदारसंघासाठी
मतदान होणार आहे.
****
जागतिक
आरोग्य संघटनेनं भारतीय राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला, प्रभावी
लस नियमनासाठी जगभरात सर्वात जास्त गुण दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित
केलेल्या जागतिक दर्जाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय
प्राधिकरणाची पाहणी केल्यानंतर हा किताब बहाल करण्यात आला. भारतात निर्माण केलेली लस
ही युनीसेफ, डब्ल्यू एच ओ आणि पी ए एच ओ सारख्या संघटनांना पुरवली
जाते.
****
विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे
शेतीला आणि लहान उद्योगांना मोठा फटका बसला असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्हा
परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जाहिरातीत जास्त पैसे खर्च करत
असल्याचं सांगत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेना
सरकामधून बाहेर पडल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं पवार
यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
****
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं येत्या मार्चमध्ये दहावीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची
कल चाचणी सुरु झाली आहे. यात १४० प्रश्नांचा समावेश असून, याद्वारे विद्यार्थ्यांचा
विविध शाखांमधला कल तपासला जातो. मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी
तीन मार्चपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची कल चाचणी पूर्ण करावी, असं आवाहन मंडळानं
केलं आहे.
****
स्वच्छ
भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमात मराठवाडा विभाग मागे असून वैयक्तिक
शौचालयाच्या एकुण उद्दिष्टापैकी पन्नास टक्के उद्दिष्टच पूर्ण झालं असल्याची माहिती,
विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोतम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं आज मराठवाड्यातले नगराध्यक्ष
आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते
बोलत होते. जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात शौचालयांचं काम कमी प्रमाणात
झालं असून निर्धारीत उद्दिष्ट येत्या मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना, संबंधित अधिकाऱ्यांना
देण्यात आल्याचं भापकर यांनी यावेळी सांगितलं. यात औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्याचं काम
उत्कृष्ट असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेडमध्ये नाफेडमार्फत सुरु
करण्यात आलेल्या आठ तूर खरेदी केंद्रामंध्ये गेल्या दोन दिवसांपासून तूर खरेदी बंद
झाली आहे. बारदाना अभावी आणि गोदाम रिकामं नसल्याचं कारण देत नाफेड शेतकऱ्यांकडून तूर
खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ही तूर त्वरित नाफेडनं खरेदी
करावी तसंच बंद पडलेले खरेदी केंद्रं चालू करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा,
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी
दिला आहे. सरकारनं याबाबत लक्ष देऊन शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, असं आवाहनही देवसरकर
यांनी यावेळी केलं.
****
समाजानं पारंपारिक शिक्षणाऐवजी
कृतीशील शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे, असं प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांनी केलं आहे. नांदेडच्या पीपल्स
महाविद्यालयात आयोजित मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र आणि वाणिज्य या विषयांवरच्या
राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. विद्यार्थ्यांनी सतत अशा
चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करावा, असं कुलगुरुंनी यावेळी
सांगितलं.
****
अहिंसा
हे तत्व महात्मा गांधींनी दुबळ्यांपासून सुरू करून सबळांपर्यंत नेल्याचं मत, सामाजिक
कार्यकर्ते आणि गांधी विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद
इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित ‘वर्तमानकाळात महात्मा
गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. गांधीजींविषयी
समाजात समजाऐवजी गैरसमज जास्त असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment