Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
· मुंबई महापालिकेत युतीबाबत
अद्याप कोणताही विचार केला नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
तर बहुमतासाठी काँग्रेससोबत युतीची शक्यता भाजपनं
फेटाळली
· जिल्हा परिषदांमध्ये
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचे संकेत
· प्रधानमंत्री
गरीब कल्याण योजनेअंतर्गत कराचा भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांवर कारवाईचा
केंद्राचा इशारा
· पुणे कसोटी क्रिकेट
सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड
आणि
· महाशिवरात्र सर्वत्र भक्तीभावानं
साजरी
****
मुंबई महापालिकेत युतीबाबत अद्याप कोणताही विचार केला
नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत मातोश्री या
आपल्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या जनतेचे आभार मानताना त्यांनी हे वक्तव्य
केलं. दरम्यान, मुंबई महापालिकेत नवनिर्वाचित तीन अपक्ष
नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ ८७ झालं आहे.
स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, आणि चंगेज मुलतानी अशी या तिघांची नावं आहेत. आणखी काही
अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान,
ठाकरे आज पक्षातले ज्येष्ठ नेते तसंच नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई
महापालिकेत बहुमतासाठी काँग्रेससोबत युतीची शक्यता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार
यांनी फेटाळून लावली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल तसंच बृहन्मुंबई
महापालिकेसंदर्भात चर्चेसाठी काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यानंतर शेलार
पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातले काही
सदस्य आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.
****
राज्यात
जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याचे संकेत
आहेत. काँग्रेस पक्षाची काल मुंबईत यासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी
संपर्क साधल्याची माहिती दिली.
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कराचा भरणा करून घेण्यास नकार
देणाऱ्या बँकांच्या संबंधित शाखांची मान्यता रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिला
आहे. काही बँकांमधून कराचा भरणा करून घेण्यास नकार दिल्याची प्रकरणं समोर आल्याच्या
पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयानं सर्व प्रमुख बँकांना लिहिलेल्या पत्रात हे
निर्देश दिले आहेत. यासाठी बँकांनी आपल्या सॉफ्टवेअर किंवा संगणकीय प्रणालीत आवश्यक
बदल करून घ्यावेत, असंही या पत्रात म्हटलं आहे.
विमुद्रीकरणानंतर सरकारनं जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत नागरिकांना
आपली बेहिशेबी संपत्ती पन्नास टक्के कर आणि दंड भरून नियमित करून घेता येणार आहे. एक
डिसेंबरपासून सुरू झालेली ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र काही बँकांच्या
शाखांनी या संदर्भात तांत्रिक कारणे देत, इच्छुक नागरिकांकडून कर भरणा करून घेण्यास
नकार दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.
****
तंत्रज्ञानाच्या
क्षेत्रात महाशक्ती होण्याची क्षमता भारताकडे असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ
पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या
५३व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना ते काल
बोलत होते. नवीन संशोधनाचं तंत्रज्ञानात रुपांतर होणं आवश्यक असून, शहरी तसंच ग्रामीण
भागातली दरी सांधण्यासाठीही संशोधन आणि विकासाचा वापर करायला हवा असंही काकोडकर म्हणाले.
४२ संशोधक विद्यार्थ्यांना यावेळी पीएचडी प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा २९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईनं आपल्या शाळांमध्ये
आणि विद्यार्थी वाहतुकीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच जीपीएस पध्दती आणि बस खिडक्यांना संरक्षण जाळ्या बसवण्याचेही आदेश दिले आहेत.
याबाबत काही दुर्लक्ष अथवा दुर्घटना झाल्यास, संस्था आणि शाळेचे प्रमुख जबाबदार धरल्या
जातील, असंही मंडळानं म्हटलं आहे.
****
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या
जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी
मालिकेत पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत झाली आहे. पुण्यात सुरू असलेल्या
या पहिल्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात चार बाद
१४३ धावा करत, सामन्यात २९८ धावांची आघाडी घेतली. भारताकडून रविचंद्रन अश्विननं तीन
तर जयंत यादवनं एक बळी घेतला. त्यापूर्वी काल भारताचा पहिला डाव १०५ धावांवर संपुष्टात
आला. लोकेश राहुलनं ६४, अजिंक्य रहाणे १३, मुरली विजय १०, चेतेश्वर पुजारा सहा, उमेश
यादव चार, इशांत शर्मा, जयंत यादव, आणि रवींद्र जडेजा प्रत्येकी दोन, तर रवीचंद्रन
अश्विन एक धाव करून बाद झाला. तर रिद्धिमान सहा आणि कर्णधार विराट कोहली काल शून्यावर
बाद झाले.
****
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या
पूजा घाटकरनं दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. दिल्लीत डॉ. कर्णिसिंग
शुटिंग रेंजमध्ये कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पूजाने २२८ पूर्णांक ८ गुण मिळवून
हे कांस्य पदक पटकावलं.
****
महाशिवरात्र काल सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली. शंकराच्या
१२ ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात
बीड जिल्ह्यातल्या परळी इथं वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथं नागनाथ आणि औरंगाबाद
जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या घृष्णेवर मंदिरात परवा मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी
रांगा लावल्या होत्या.
घृष्णेवर मंदिरात काल दुपारी घृष्णेश्वराची पालखी काढण्यात आली,
शिवालय कुंडात महास्नान करून, पालखी मंदिरात परतली. परळी वैजनाथ इथं मंदीर परिसरात भरलेली यात्रा भाविकांसाठी
आकर्षण असते. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते वैजनाथाची शासकीय
महापूजा करण्यात आली.
औंढा इथं महाशिवरात्रीनिमित्तानं रुद्राभिषेक, महाभिषेकासह विविध
धार्मिक अनुष्ठानांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
महाशिवरात्रीनिमित्त काल
उस्मानाबाद जिल्ह्यात यमगरवाडी इथं भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमात
उपस्थितांना मार्गदर्शन केलं
****
लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांवर झालेल्या
अतिक्रमणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती
जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. ते काल लातूर
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार, विकास
कामांसाठीचा पाठपुरावा या बाबत प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जण ठार
झाले. सिल्लोड तालुक्यातल्या मंगरुळ फाटा आणि गोळेवाडी या दोन ठिकाणी झालेल्या दोन
वेगवेगळ्या अपघातांध्ये दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. फुलंब्री तालुक्यात दुचाकी
आणि ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्या एका दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद-जळगाव
मार्गावर नायगाव गव्हाणजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात दोन
जण ठार झाले.
****
परभणी जिल्हापरिषदेत सत्तास्थापनेची गणितं सुरू झाली असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ पैकी सर्वाधिक
२४ जागा मिळल्या असून, भाजपला पाच, राष्ट्रीय समाज पक्षाला तीन तर तीन अपक्ष उमेदवार
निवडून आले आहेत.
****
बियाणे उत्पादक महासंघातर्फे औरंगाबाद इथं पीक प्रात्यक्षिक
आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी अकरा वाजता शहरानजीक गोलवाडी
परिसरात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार असून
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
****
राज्य राखीव पोलिस बलातर्फे औरंगाबाद
इथं सशस्त्र पोलिस शिपाई भरती केली जाणार आहे.
इच्छुकांनी येत्या १७ मार्चपर्यंत ऑनलाइन पध्दतीनं www.mahapolice.mahaonline.gov.in
या संकेस्थळावर अर्ज भरावेत असं पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.
//******//
No comments:
Post a Comment