Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
बँक कर्मचारी संघटनांनी आज एक दिवसीय
कामबंद आंदोलन पुकारलं आहे. बुडीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणासाठी उच्च अधिकाऱ्यांना
जबाबदार धरणं, विमुद्रीकरण काळात जादा तास केलेल्या कामाचा मोबदला न मिळणं, यासह विविध
कारणांसाठी पुकारलेल्या या संपामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार विस्कळीत होण्याची
शक्यता आहे. राष्ट्रीय बँक अधिकारी संघटना तसंच राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटना मात्र
या संपात सहभागी झालेल्या नाहीत.
****
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी उद्यापासून
सुरु होत आहे. पंजाब नॅशनल बँल, जम्मू ॲण्ड काश्मीर बँक आणि येस बँकेच्या देशभरातल्या
४३३ शाखांमधून ही नोंदणी केली जाणार आहे. ही यात्रा २९ जूनपासून सुरू होणार असून, सात
ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणीही सुरु करण्यात आल्याचं श्री अमरनाथ
देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी के त्रिपाठी यांनी सांगितलं. यात्रेत
सहभागी होण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
भारतात जलद गतीनं विकास साधण्याची क्षमता
असून, ग्रामीण क्षेत्रात गरीबी कमी करण्यासाठी तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी
विविध योजना राबवल्या जात असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
लंडन इथं प्रमुख सरकारी अधिकारी आणि उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भारत
रोखरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचं सांगतानाच जेटली यांनी, वस्तू आणि सेवा
कर - जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होईल, अशी आशा व्यक्त केली.
****
वक्फ मालमत्तांचा विकास आणि या मालमत्तांचा समाजातल्या हितासाठी
उपयोग करण्यामध्ये, काहींचे हितसंबंध गुंतल्यामुळे अडथळे येत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक
व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं केंद्रीय
वक्फ परिषदेच्या ७५ व्या बैठकीत बोलत होते. काही राज्य वक्फ मंडळांमध्ये गंभीर स्वरुपाची
अनियमितताही निदर्शनास आली असून, यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई
केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. देशभरातल्या वक्फ
मंडळांचं कामकाज डिजिटाईज्ड
करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं नक्वी म्हणाले.
****
नवी दिल्ली इथं सुरु
असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज जीतू रायनं १० मीटर पीस्टल
प्रकारात आज कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या
गटात अंकूर मित्तल यानं काल डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. या स्पर्धेत
भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे.
****
औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता
विकास केंद्र आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं एक वर्ष
कालावधीच्या दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता आणि व्यवसाय व्यवस्थापन पदविका
या अभ्यासक्रमाची संपूर्ण राज्यात सुरुवात करण्यात येत आहे. राज्यभरातल्या उद्योजकता
विकास केंद्रात या अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरु असल्याचं याबाबत जारी पत्रकात म्हटलं
आहे.
****
बैलगाड्यांच्या शर्यतीला
परवानगी देण्यासाठी विधेयक आणण्यासाठी सरकार कायदेशीर बाबी तपासून बघत आहे, असं विधान
कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सांगितलं. ते मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात
कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.
****
२०१६-१७ या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी
निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी ७०० कोटी ५७ लाख इतक्या अर्थसंकल्पीय तरतूदीस
मंजूरी मिळाली असून यापैकी १४० कोटी ११ लाख इतकी रक्कम वितरीत करण्यास मान्यता मिळाली
आहे. काल जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात ही माहिती देण्यात आली.
****
राज्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या
कार्याचा गौरव करण्यासाठी आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षासाठीचे
राज्य युवा पुरस्कार काल घोषित करण्यात आले. क्रीडा विभागाच्या आठ विभागातून आठ युवक,
युवती आणि संस्थांची निवड करण्यात आली आहे. यात २०१४-१५ साठीचे पुरस्कार औरंगाबादचा
पठाण अझहर खान, परभणीची काजल भुसारे, उस्मानाबादचा उमाकांत मिटकर, सुरेखा गिरी यांना
आणि बीडच्या शाहू महाराज प्रतिष्ठान संस्थेला जाहीर झाला असून, २०१५-१६ साठीचा पुरस्कार
औरंगाबादच्या स्वप्नील चांदणे आणि अश्विनी महिरे, लातूरचे प्रवीण पाटील, उस्मानाबादची कृष्णाई उळेकर हिला जाहीर झाला आहे. व्यक्तींना
प्रत्येकी रोख ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर संस्थांना प्रत्येकी १ लाख रूपये,
आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
//*****//
No comments:
Post a Comment