Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
एक हजार रूपयांची नवी नोट आणण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं आहे. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी एका ट्विटमध्ये ही बाब स्पष्ट केली.
पाचशे रूपये आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटांची निर्मिती आणि पुरवठा करण्यावर सरकारचं
लक्ष केंद्रीत असल्याचं दास यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. नागरिकांनी एटीएममधून आवश्यकतेपुरतेच पैसे
काढावेत, असं आवाहनही दास यांनी केलं आहे.
****
सर्व रूग्णालयांनी कार्डियॅक स्टेंटसचे सुधारित दर दर्शनी भागात
लावावेत, असे निर्देश राष्ट्रीय औषधी मूल्यांकन मंडळानं दिले आहेत. राज्य औषधी नियंत्रकांनाही
याबद्दल सूचित करण्यात आलं असून, रूग्णालयं या निर्देशाचं पालन करत आहेत अथवा नाहीत,
ही बाब, तपासणी करून कळवण्यास, सांगण्यात आलं आहे. सरकारनं या स्टेंट्सच्या किंमतीत नुकतीच सुमारे पंचाऐंशी टक्क्यांनी कपात केली आहे. या स्टेंट्सची निर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवावा आणि
त्यांची टंचाई भासू देऊ नये, अशा इशाराही मंडळानं या
उपकरणाच्या उत्पादक आणि आयातदारांना दिला आहे.
****
मानसिक
आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत मार्गदर्शक तत्वं जारी करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या अशा रुग्णांना
घरी परत नेण्यास त्यांचे कुटुंबीय ही फारसे उत्सुक नसतात, ही अत्यंत संवेदनशील समस्या
असल्याचं, सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं नमूद केलं. या रुग्णांना
समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी धोरण निश्चित करावं, असं न्यायालयानं म्हटलं
आहे. यासाठी न्यायालयानं केंद्र सरकारला आठ आठवड्यांची मुदत दिली आहे.
****
बँकांच्या बुडित कर्जाच्या समस्येवर तत्काळ
उपाय करण्याची गरज भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी व्यक्त
केली आहे. बँकांना दिल्या गेलेल्या
अनेक विवेकाधिकारांमुळे, या समस्येच्या समाधानासाठी केलेल्या स्वतंत्र प्रयत्नांना यश येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. औद्योगिक
गुंतवणूक वाढवण्यासाठी, तसंच अधिक रोजगार निर्मितीसाठी बुडित कर्जाची समस्या सोडवली
पाहिजे, असं सांगत, रिझर्व्ह बँकेच्या निधी साठ्यातून सरकारी बँकांना निधी देऊ नये, असा इशाराही आचार्य यांनी दिला आहे.
****
मालमत्ता विकासकांनी मोठ्या प्रमाणात, परवडणारे गृहप्रकल्प उभारावेत, असं आवाहन
नागरी विकास मंत्री एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे.
ते काल नवी दिल्लीमध्ये, स्थावर मालमत्ता क्षेत्रासंदर्भातल्या एका परिषदेमध्ये बोलत
होते. स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजनांचा
लाभ घेत, खाजगी विकासकांनी परवडणारे गृहप्रकल्प उभारावेत, असं नायडू यावेळी म्हणाले.
****
अमेरिकेनं अवैध प्रवाशांना त्यांच्या देशांमध्ये परत पाठवण्याबाबत
कडक दिशानिर्देश जारी केले असून, अशा लोकांना परत पाठवण्याच्या कामात अधिक गती आणली
आहे. काल रात्री जारी केलेल्या या दिशानिर्देशांनुसार, वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत
राहणाऱ्या, सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या आणि सुरक्षिततेला धोका ठरू शकतील, अशा
प्रवाशांना आता परत पाठवलं जाईल, यासंदर्भात नवीन कायदा आणलेला नसून, अस्तित्वात असलेल्या कायद्यांचीच कडक अंमलबजावणी
सुरू करण्यात आली आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या मधुमेहानं ग्रस्त असलेल्या
विद्यार्थ्यांना आता परीक्षेदरम्यान आहार घेण्याची
परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये टाईप -१ मधुमेह मोठ्या प्रमाणात आढळून
आल्यानं ही परवानगी देण्यात आल्याचं मंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. आता असे विद्यार्थी
परीक्षेच्या वेळी खाद्यपदार्थ आणून ते पर्यवेक्षकांकडे
ठेवू शकतील. मात्र, अशा विद्यार्थ्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी
मंडळाकडे सादर केलेलं असावं, असं मंडळाच्या या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकी देशांच्या पाच दिवसांच्या आपल्या
दौऱ्यामध्ये उपराष्ट्रपती मोहम्म्द हमीद अन्सारी युगांडाची राजधानी कंपाला, इथं पोहचले आहेत. एंटेबे
विमानतळावर त्यांचं युगांडाच्या उपराष्ट्रपतींनी स्वागत केलं. या भेटीमध्ये उपराष्ट्रपती
त्या देशाच्या नेत्यांच्या भेटी घेतील. तसंच तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील. भारत-युगांडा व्यापार मंचालाही
उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत.
//*******//
No comments:
Post a Comment