Friday, 24 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंगापैकी मराठवाड्यात बीड जिल्ह्यातल्या परळी इथं वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथं नागनाथ आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या घृष्णेवर मंदिरात मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

परराज्यातूनही मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले असून, मंदीर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांसाठी पेयजल, प्रसादाची व्यवस्था तसंच सुरक्षेच्या दृष्टीनंही चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

घृष्णेवर मंदिरात आज दुपारी घृष्णेश्वराची पालखी निघेल, शिवालय कुंडात महास्नान करून, पालखी मंदीरात परतेल. परळी वैजनाथ इथं मंदीर परिसरात भरलेली यात्रा भाविकांसाठी आकर्षण असते. आज संध्याकाळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते वैजनाथाची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे.

औंढा इथं महाशिवरात्रीनिमित्तानं रुद्राभिषेक, महाभिषेकासह विविध धार्मिक अनुष्ठानांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मुंबईत कलिना प्रभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर हल्ला झाला, यात गंभीर जखमी झालेले तुरडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात मनसेचे दहा ते बारा कार्यकर्तेही जखमी झाले असून, हा हल्ला भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सांगितलं जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल दारुकांडाप्रकरणी जेऊर पंचायत समिती गणाच्या उमेदवार मंगला आव्हाड यांच्यासह पती महादेव आव्हाड यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. या दोघांना अहमदनगरच्या  न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेनेच्या मंगला आव्हाड आणि जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार भाग्यश्री मोकाटे यांच्या प्रचाराच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बनावट मद्यातून अनेकांना विषबाधा झाली होती. यात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला.

****

भारतीय स्टेट बँकेत बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया येत्या एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. भारतीय स्टेट बँकेकडून ही माहिती देण्यात आली. बिकानेर आणि जयपूर स्टेट बँक, म्हैसूर स्टेट बँक, त्रावणकोर स्टेट बँक, पतियाळा स्टेट बँक आणि हैदराबाद स्टेट बँक या पाचही बँकांच्या मालमत्ताही भारतीय स्टेट बँकेकडे दिल्या जाणार आहेत. विलिनीकरणानंतर भारतीय स्टेट बँकेच्या २२ हजार ५०० शाखा आणि ५८ हजार एटीएमसोबत बँकेची मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये इतकी होणार आहे.   

****

औरंगाबाद इथं सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी येत्या २८ तारखेला मौलाना आझाद संशोधन केंद्रात रोजगार मेळावा आयोजित केला आहे. साडे तीन हजारांहून अधिक पदांसाठी सर्व प्रथम दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्यांना मुलाखतीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मेळाव्यास येतांना आपले शैक्षणिक कागदपत्रं, ओळखपत्र, आधारकार्ड आणि बँक खाते संबंधित माहिती सोबत उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

चालू वर्षात डाळींचे उत्पादन २२ पूर्णांक १४ दशलक्ष टनांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे उद्दीष्ट यावर्षीच्या २१ पूर्णांक २५ दशलक्ष टनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. कृषी मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अंदाज पत्रकात ही बाब नमूद करण्यात आली. गव्हाच्या उत्पादनात २०१६-१७ मध्ये नऊ पूर्णांक ३२ टक्क्यांची वाढ होऊन ९६ पूर्णांक ६४ दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे.

****

न्यायवैद्यक हा न्यायपालिकेचा महत्वपूर्ण भाग असून, कमी खात्री दर, प्रलंबित खटले आणि खटल्यांच्या निकालासाठी लागणारा कालावधी या तीन मुख्य समस्या सध्या न्यायपालिकेसमोर असल्याचं गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. आयआयटी मुंबई इथं भारतीय न्यायवैदयक संस्थेच्या ३८व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. न्यायप्रक्रिया ही प्रामुख्याने वैदयकीय पुराव्यांवर अवलंबून असल्यानं, “फॉरेन्सिक मेडिकॉन  २०१७” मध्ये झालेल्या चर्चेचा  फायदा प्रदीर्घ  कालावधीपर्यंत न्यायपालिकेला होईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय न्यायवैदयक शास्त्र आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत पोहोचण्यासाठी या क्षेत्राला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबध्द असल्याचं ते म्हणाले.

//*******//

No comments: