Saturday, 18 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री इ के पलानीसामी यांनी आज विधानसभेत विश्वास ठराव मांडला. विधानसभेत बहुमत चाचणीला सुरुवात होताच विरोधी पक्ष डीएमकेच्या आमदारांनी गुप्त मतदानाची मागणी करत गदारोळ सुरु केला. त्यानंतर डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी बहुमत चाचणी काही दिवसांनी घेण्याची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष पी धनपाल यांनी ही मागणी फेटाळल्यानं गोंधळ आणखी वाढत गेला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकुब केलं. 

****

महाविद्यालयं आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना आधार कार्ड सादर करणं बंधनकारक असणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नवी दिल्ली इथं याबाबत सूचना जारी केली. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे, त्यांनी ३० जून पर्यंत आधार कार्ड सादर करण्यास सांगितलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये मात्र हा नियम लागू नसल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दोन दिवसीय दक्षिण आशियायी अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन  केलं. सहा देशांच्या सर्वोच्च सभागृहाचे अध्यक्ष आणि संबंधित देशामधील सभागृहांचे शिष्टमंडळ देखील परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संसदेचं योगदानाबाबत चर्चा होणार आहे.

****

इस्लामिक स्टेट आणि लष्कर ए तय्यबा सारख्या अनेक दहशतवादी संघटनांनी आव्हानं उभी केली असताना संयुक्त राष्ट्र दहशतवादाबद्दल व्याख्या तयार करु शकत नसल्याबद्दल भारतानं खंत व्यक्त केली आहे. बॉन इथं जी २० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी भारताची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्रांची प्रतिबंध समिती चीनच्या विरोधामुळे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरवर दहशतवादी म्हणून निर्बंध घालण्यात अपयशी ठरत असल्याबद्दल अकबर यांनी नाराजी व्यक्त केली. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं जी एस एल व्ही मार्क तीन या  देशात तयार करण्यात आलेल्या अवकाशयानाच्या इंजिनाची यशस्वी चाचणी केली. तामिळनाडूमधील महेंद्रगिरीमध्ये ही चाचणी करण्यात आली. हे यान प्रत्यक्षात अवकाशात सोडण्यापूर्वीची ही शेवटची चाचणी आहे, असं इस्रोचे अध्यक्ष ए एस किरणकुमार यांनी ही माहिती दिली.

                              ****

चालू पीक वर्षात देशातल्या कांदा उत्पादनात पाच पूर्णांक आठ दशांश टक्क्यांनी म्हणजेच सुमारे १९७ लाख टनांनी कांद्याचं उत्पादनात घट होईल, असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. या पिकाखालील लागवडीच्या क्षेत्रामध्ये कमी झाल्यानं ही घट झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. मात्र, बटाटे आणि टोमॅटोच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. भाजीपाला उत्पादनातही यंदा काहीशी घट अपेक्षित आहे. फळ उत्पादनात मात्र वाढ अपेक्षित असून, आंबा आणि केळी उत्पादन गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक होईल, असं या अंदाजात नमूद करण्यात आलं आहे.

****

सरकारनं देशभरात सुमारे ४१ कोटी मुलांना गोवर प्रतिबंधक लस पुढील वर्षापर्यंत देण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. अतिरिक्त आरोग्य सचिव डॉक्टर अरुण कुमार पंडा यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. या मोहिमेची सुरुवात सात फेब्रुवारी पासून देशातल्या पाच राज्यात करण्यात आली आहे. गोवरमुळे दोन हजार साली एक लाख मुलांचा मृत्यू झाला होता. २०१५ साली हे प्रमाण ५१ टक्के कमी होऊन ४९ हजारावर आल्याचं पंडा यांनी सांगितलं.

****

विदर्भाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्यावरील व्याज माफ केलं तरच भाजपला आमचा पाठिंबा राहील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं प्रचार सभेत बोलत होते. विमुद्रीकरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून, केंद्र सरकारनं याचं स्पष्टीकरण द्यावं असं ते म्हणाले. 

****

तेहरान इथं सुरु असलेल्या महिलांच्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या द्रोणावली हरीका आणि आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मीनी राऊत यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळवून इतिहास रचला. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेच्या अंतिम १६ खेळाडुंमध्ये धडक मारली आहे. हरीकाचा सामना आता जॉर्जीयाच्या खेळाडूशी, तर पद्मीनीची लढत चीनच्या खेळाडूबरोबर होणार आहे.

//*******//

No comments: