Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यात दहा महापालिका, अकरा जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत
समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिकेसाठी
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४५ टक्के तर बृहन्मुंबई महापालिकेसाठी ४१ पूर्णांक ३२ टक्के
मतदान झालं. नाशिक महापालिकेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४३ पूर्णांक ३३ टक्के मतदान
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
अमरावती इथं दुपारी दीड वाजेपर्यंत ३१ पूर्णांक ६२ टक्के,
अकोला आणि सोलापूर ३२ टक्के, पुणे आणि पिंपरी चिंचवड सुमारे साडेतीस टक्के, तर नागपूर
महापालिकेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे ३० टक्के मतदान झालं.
ठाणे इथं माजी नगरसेवक शहाजी जावीर यांना पैसे वाटप करत
असल्याच्या आरोपावरून काँग्रेस तसंच भारतीय रिपब्लीकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण
केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ठाण्यात
एका प्रभागात बोगस मतदार आढळले असून, त्यांना वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजता मतदानाची वेळ संपली,
तोपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मतदानावर
बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत, अशा आशयाची पत्रकंही गावांमधून वाटली होती. या पार्श्वभूमीवर
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात कुशिरे मतदान
केंद्राच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाणीची घटना घडली. रांगेवरून झालेल्या
वादातून हा प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुशिरेचे सरपंच विष्णू
पाटील यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दुपारी साडे तीन
वाजेपर्यंत ६० पूर्णांक ३४ टक्के मतदान झालं. रायगड जिल्हा परिषदेसाठी दीड वाजेपर्यंत
सरासरी ४५ टक्के, सिंधुदूर्ग ४५ पूर्णांक २७ टक्के, तर सातारा जिल्हा परिषदेसाठी दुपारी
दीड वाजेपर्यंत ४३ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी
असल्याचं, पाकिस्ताननं अखेर मान्य केलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
यांनी जर्मनी इथं म्युनिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा संमेलनात बोलताना, दहशतवादी हाफिज
सईद देशासाठी गंभीर धोका असून देशहितासाठीच त्याला अटक करण्यात आली असल्याचं नमूद केलं.
हाफीज सईद हा २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे पुरावे देऊन सातत्यानं
पाठपुरावा केल्यानंतर पाकिस्ताननं हाफीज सईदला दहशतवादी ठरवलं आहे.
****
डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या
दृष्टीनं नीती आयोग नवीन कॅश बॅक योजना लकवरच आणणार आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अमिताभ कांत यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. डिजिटल व्यवहारांवर लकी ड्रॉ
योजनेअंतर्गत सुमारे १० लाख ग्राहकांना १५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं
वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाधिक
ग्राहक डिजिटल व्यवहारांचा मार्ग निवडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय वायू गुणवत्ता कार्यक्रमाअंतर्गत
देशभरातल्या विविध वायू प्रदूषणावर सरकार देखरेख ठेवणार असल्याचं पर्यावरण मंत्री अनिल
माधव दवे यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. २९ राज्यांमधल्या
३०० गावांमध्ये हा कार्यक्रम राबवणार असल्याचं ते म्हणाले. या वर्षीपासून सर्व प्रकारच्या
वाहनांसाठी बीएस चार परिमाण लावण्यात आवश्यक करणार असल्याचं ते म्हणाले.
****
कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक
छळापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर राबवण्यात आलेल्या
मोहिमेचा आज औरंगाबाद इथं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत
समारोप झाला. या अनुषंगानं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत
मार्गदर्शन करताना, रहाटकर यांनी या कायद्याला धरून विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याचं
आवाहन केलं. राज्यभरात विशाखा समितीच्या १५ हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून,
सर्व आस्थापनांनी विशाखा समिती सुरू करण्याचे निर्देश रहाटकर यांनी यावेळी दिले.
****
नांदेड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय
महिला दिनी महिला मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत
जास्त महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी
संतोष पाटील यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत
होते.
****
No comments:
Post a Comment