Tuesday, 28 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान, लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिवनी कोतल इथं सामूहिक कॉपी सुरू असल्याचं निदर्शनास आलं. शिक्षण विभागानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत, परीक्षा केंद्र संचालक बदलण्याचे आदेश दिले असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी दिली.

      दरम्यान, राज्यभरात नऊ विभागीय मंडळांमार्फत दोन हजार ७१० केंद्रांवर बारावी परीक्षेत पहिल्या विषयाची परीक्षा आज घेण्यात आली. या परिक्षेला यंदा १५ लाख पाच हजार ३६५ विद्यार्थी बसले असून, यापैकी आठ लाख ४८ हजार ९२९ मुलं तर सहा लाख ५६ हजार ४२६ मुली आहेत.

रीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी २५० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. धुळे जिल्ह्यात ४३ केंद्रातून २५ हजार ५७३ परीक्षार्थी तर सोलापूर जिल्ह्यात ८२ केंद्रांतून ५० हजार ८६४ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.   

****

मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचं निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सोलापूर इथं आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ उत्सव समारंभापुरता मर्यादित न राहता तो व्यापक व्हावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. उच्च दर्जाच्या मराठी सांस्कृतिक परंपरांकडे दुर्लक्ष होणं हे सामाजिकदृष्ट्या मराठी समाजमनाला परवडणारं नसल्याचं त्या म्हणाल्या. 

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी पदार्थांच्या विकीरणासंदर्भातलं महत्वाचं संशोधन १९२८ मध्ये आजच्या दिवशी जगासमोर मांडलं होतं. हे संशोधन 'रामन परिणाम' म्हणून ओळखलं जातं. रामन यांच्या विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय वैज्ञानिकांचा राष्ट्र निर्माणात महत्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

नवीन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेला उद्भवणाऱ्या धोक्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक विविध क्षेत्रातल्या तज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. बँकेनं मुंबई इथं आज ही घोषणा केली. बँकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्रा, या ११ सदस्यीय समितीच्या अध्यक्ष असतील. सायबर सुरक्षेच्या सक्षमीकरणाबरोबरच सुरक्षा मानकांचा स्वीकार करण्यासह इतर महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे.

दरम्यान, वाढत्या महागाई संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे देशातल्या १८ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार असून, पहिल्या टप्प्यात पुढच्या महिन्यात मुंबईसह सहा शहरांमध्ये हे ग्राहक विश्वास सर्वेक्षण होणार आहे.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं आर्थिक सहकार आणि विकास संघटना - ओईसीडीचं भारतासंबंधी सर्वेक्षण जारी करताना बोलत होते. जीएसटीच्या तरतुदींना अंतिम मंजुरी देण्यासाठी जीएसटी परिषदेची पुढची बैठक चार आणि पाच मार्चला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाचे लाभ आणि परिणाम पुढच्या तिमाहीत समजतील असं ते यावेळी म्हणाले.

****

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला सात एप्रिलपर्यंत पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये भरण्यास सांगितलं आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी न्यायालयानं सहारा समूहाला त्यांच्या १३ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला तसंच इतर वारसा स्थळांचा लवकरच विकास होणार असल्याचं, केंद्रीय सांस्कृतिक कार्य तसंच पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणं राष्ट्रीय गौरवाची तसंच पर्यटनाची केंद्रं व्हावीत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान, पुणे इथं पहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचं, आपल्या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालाची प्रत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवण्यात आली असून, १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. या सामन्यात तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा ३३३ धावांनी पराभव केला होता.

****

अस्वच्छतेमुळे रोगांचं प्रमाण अधिक असल्याचं, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या खालापुरी इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर आयोजित जनजागृती अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते. 

****

No comments: