Sunday, 26 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून काम करत राहू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·       मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद

·       अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरून येत्या २०१९ पर्यंत रेल्वे धावेल - मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी के शर्मा

आणि

·       पुणे क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव

****

राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून काम करत राहू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांमधील विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी काल किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, त्यानंतर ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, तसंच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान,मुंबईत विजयोत्सव साजरा करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप सत्तास्थापनेसाठी काँग्रेससोबत युती करणार नाही, असा पुनरुच्चार केला. पारदर्शक व्यवहार या आपल्या भूमिकेशीही भाजप तडजोड करणार नसल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, शिवसेना राज्यसरकारमधून बाहेर पडणार अल्यास, मुंबई महापालिकेत पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मात्र, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असं म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. इतर छोट्या पक्षांची मदत घेऊन महापौर पदासाठी उमेदवार देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, निरुपम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून शिवसेना किंवा इतर कोणत्याही जातीयवादी पक्षाला पाठिंबा देऊ नये, असं म्हटलं आहे. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या भल्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरांचा कार्यकाळ येत्या नऊ मार्चला पूर्ण होत असून, त्यापूर्वी महापौर पदाची निवडणूक होणं अपेक्षित आहे.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं मागणी केल्यास काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार असल्याचं, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे, ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नव्यानं निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १८ सदस्यांच्या बैठकीत काल याबददल निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.  ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत नसेल तिथं शिवसेना किंवा इतर पक्षांना पाठिंबा द्यायला काँग्रेस तयार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं पैसे आणि बळाचा वापर केल्याचा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला.

****

राज्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स - दूरदृष्य संवाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात सरकारला अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं गृहमंत्रालयाला येत्या मार्चपर्यंत राज्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य सरकारनं न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याबाबत कार्यवाही केली नसल्याची माहिती उच्च न्यायालयाला मिळाली, यावर गृहमंत्रालयानं या प्रक्रियेला वेग द्यावा असे निर्देश न्यायमूर्ती कानडे यांनी दिले आहेत.

****

हृदयविकाराच्या रुग्णांना स्टेंट हे उपकरण चढ्या दरानं बसवणाऱ्या रुग्णालयांनी, संबंधीत रुग्णांना चढ्या दरांचा परतावा दिला तर, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन औषध मूल्य नियंत्रण प्राधिकरणानं दिलं आहे.

असा परतावा न देणाऱ्या रुग्णालयांवर मात्र मागणीपत्र बजावलं जाणार असून, त्यांनी आकारलेल्या अँजिओप्लास्टी उपचाराच्या देयकाचं सखोल लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. अशा रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचंही प्राधिकरणानं यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा २९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्युज ऑन ए आय आर डॉट कॉम, या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरून येत्या २०१९ पर्यंत रेल्वे धावेल असा विश्वास मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी के शर्मा यांनी व्यक्त केला आहे. या रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी काल ते नगर इथं आले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे विभाग आणि राज्य सरकारनं राज्यातल्या नऊ मोठ्या प्रकल्पांसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण केले जातील असं शर्मा यांनी यावेळी सांगितलं.

****

शेती क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी राज्यात चार हजार कोटी रूपयांचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं, कृषी, फलोत्पादन आणि विपणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं कृषी विभाग आणि राज्य बियाणे उत्पादक संघटना - सियामच्या वतीनं भरवण्यात आलेल्या पीक प्रात्याक्षिक आणि शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाण्याच्या नियोजनापासून ते शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी असलेला हा प्रकल्प मार्च महिन्यानंतर कार्यान्वीत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बियाणे उत्पादक कंपन्यांनी हवामान बदलाचा अंदाज घेऊन दर्जेदार बियाण उत्पादन करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तूर खरेदी केंद्रांसाठी बारदान उपलब्ध झाल असून सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना, शेतीचं पेरणीयोग्य क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होत असून जे पडीत क्षेत्र आहे त्या शेतमालकांना दंड लावणार असल्याचं सांगितलं. या पीक प्रात्याक्षिक आणि शेतकरी मेळाव्यात २१ कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा विशाखा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार यंदा नांदेडच्या डॉक्टर योगिनी सातारकर पांडे यांना जाहीर झाला आहे. काल ही घोषणा करण्यात आली. द्वितीय पुरस्कार सिंधुदुर्ग इथले मोहन कुंभार यांना आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिकचे विष्णू थोरे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला, आज नाशिक इथं महाकवी कालिदास कला मंदिरात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुणे इथं झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ३३३ धावांनी पराभव झाला. या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ४४२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १०७ धावात सर्वबाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आता एक - शून्यनं आघाडीवर असून, मालिकेतला दुसरा क्रिकेट सामना बंगळुरु इथं येत्या चार मार्चपासून खेळला जाणार आहे.  

****

परभणी शहर महागनर पालिका आणि आशा किरण सोशल फाउंडेशन तसंच एनव्हीएस मराठवाडा हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमानं काल सूर्यनमस्कार जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं. शहरातल्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना यावेळी माहिती पत्रकांचं वाटप करण्यात आलं.

****

२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त औरंगाबाद इथं ग्रंथालय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथंही यानिमित्तानं व्याख्यान तसंच ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

****


No comments: