Monday, 20 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      परतूर शहरामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक, संचारबंदी लागू

·      छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी.

·      दहा महापालिकांसह अकरा जिल्हा परिषदांचा निवडणुक प्रचार काल संपला; उद्या मतदान

आणि

·      तुरीची हमी भावानं खरेदी करणारी केंद्र १५ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरामध्ये काल रात्री शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेकीची घटना घडली. तसंच शहरातली एक हॉटेल, दोन शामियाने आणि काही टपऱ्या जाळण्यात आल्या. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांपर्यंतचं नुकसान झाल्याचं आज सकाळी पोलिसांनी सांगितलं. शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना मलंगशहा चौकात अन्य समाजाच्या पताकांना धक्का लागला. यावरून दगडफेकीस प्रारंभ झाला. दोन्ही गटाकडून ही दगडफेक करण्यात आली. यामुळे शहरातलं वातावरण तणावपूर्ण झालं. दगडफेकीत काही लोक जखमी झाले असूल त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गुन्हे नोंदवण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३६८ वी जयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. या निमित्त ठिक-ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते. प्रजेच्या कल्याणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी इथं एका कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं तेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला, त्या विचारांचा अवलंब करुन राज्य कारभार करणार असल्याचं ते म्हणाले.

मुंबईत विधानभवनात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधानसभेचे सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांनी मंत्रालयात महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.

औरंगाबाद शहरात अनेक संस्था आणि संघटनांनी शिवजयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढत तसंच वाहन फेरीचं आयोजन केलं होतं.

जालना इथंही शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवणाऱ्या अनेक स्फूर्तीदायक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. लातूर इथंही मोटारसायकल फेरी काढण्यात आली. ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थानापासून सुरू झालेल्या या फेरीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या  तुळजाभवानी मंदीरातही विशेष पूजा करण्यात आली.

परभणी शहरातून हत्ती, घोड्यांसह आणि ढोल-ताशा, झांज, लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली.

जालना, उस्मानाबाद, हिंगोली, बीड तसंच नांदेड शहरातही मिरवणुका काढून शिवजयंती साजरी करण्यात आली.

****

राज्यातल्या दहा महापालिकांसह अकरा जिल्हा परिषदांचा निवडणुक प्रचार काल संपला. खेरच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन, सभा, प्रचार फेऱ्यांसह मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला. या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार आहे.

****

दोन लाख रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दागिन्यांच्या रोख खरेदीवर येत्या १ एप्रिलपासून एक टक्का उदगम कर - टी.सी.एस. लागू होणार आहे. सध्या हा कर पाच लाख रूपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर लागू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तीन लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी दंड आकारण्याची तरतूद आहे. काळा पैसा निर्मितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये कामकाज चालवण्याची शिफारस एका संसदीय समितीने केली आहे. सध्या या सर्व ठिकाणी केवळ इंग्रजीमध्ये कामकाज चालवलं जातं. या नियमात बदल करण्यासाठी राज्यघटनेनं केंद्र सरकारला पुरेसे अधिकार दिले असल्याचं समितीनं म्हटलं आहे. काही राज्यांमधल्या उच्च न्यायालयात प्रादेशिक भाषेत काम चालवण्याचे प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठानं ते फेटाळले होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असल्याचं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. या विश्वासाचा उगम लोकप्रतिनिधींच्या पारदर्शक, संपर्कक्षम आणि जबाबदारपणे वागण्यात आहे, असं त्या म्हणाल्या. इंदोर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या काल बोलत होत्या.

कायदे तयार करणं, अर्थसंकल्प मंजूर करणं, प्रशासकीय कामांवर लक्ष ठेवणं याबरोबरच विकासप्रक्रियेत संसदेचं एक महत्वाचं स्थान असल्याचं त्या म्हणाल्या. या संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या असून, आपले संबंध आणखी दृढ झाल्याचं महाजन यांनी यावेळी नमूद केलं.

****

भारताकडे वैद्यकीय पर्यटन केंद्र होण्याची क्षमता असून, सरकारनं परवडण्यायोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं एका आरोग्य शिबीराचं उद्घाटन करताना बोलत होते.

हदयविकारांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी करून सरकारनं एक मोठं पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात उत्तम आरोग्यसुविधा पुरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपलं काम लोककल्याणाची चळवळ म्हणून करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

आरोग्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिका निश्चित करणारं एक धोरण असणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे राज्यांना आपल्याला अनुकूल पद्धतीने यासंदर्भात काम करण्याचं स्वातंत्र्य मिळेल, असं संघटनेचं म्हणणं आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यं असणाऱ्या देशात विविध आरोग्य समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची आणि दृष्टीकोनाची गरज असल्याचं संघटनेच्या प्रतिनिधीनं कोलकाता इथं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

यावेळी त्यांनी, भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाची प्रशंसा केली तसंच सरकारनं आरोग्याला आणखी प्राधान्य देत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचं आवाहन केलं.

****

देशाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचं काल कोलकाता इथं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते.

****

राज्यातली तुरीची हमी भावानं खरेदी करणारी केंद्र येत्या १५ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र शासनानं मुदतवाढ दिली आहे, असं पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांनी सांगितलं. आवश्यकता भासल्यास १५ मार्चनंतरही ही केंद्र सुरू ठेवण्याबाबत विचार केला जाईल, असं ते म्हणाले.

****

देशाचे सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्द्ल आक्षेपार्ह विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत  परिचारक यांच्या विरोधात शिवसेनेनं तक्रार दाखल केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूकीसाठी पंढरपूर तालुक्यातल्या भोसे इथल्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलतांना परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्द्ल आक्षेपार्ह विधान केलं होत. त्या प्रार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या वतीनं पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान झालेल्या प्रकाराबद्द्ल परिचारक यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली.

****

मराठवाड्यातल्या लातूर आणि परभणीसह, राज्यातल्या भिवंडी, पनवेल, मालेगाव, निजामपूर आणि चंद्रपूर या महापालिकांची प्रारुप मतदान यादी येत्या २७ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्यावर चार मार्च, २०१७ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज..सहारिया यांनी काल दिली.

****

स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थीव देहावर काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी लासीना इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. धोटे यांचं परवा पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या जेऊर पांगरमल इथं विषारी दारु प्यायल्यानं मृत झालेल्यांची संख्या आठवर पोहचली आहे. काल एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.

****

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या दापोडा परिसरात काल प्लॅस्टीकच्या वस्तू बनवणाऱ्या कारखान्याला आग लागून त्यातील चार कामगार ठार तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

//*******//


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...