आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१९ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आजपासून पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर
जात आहेत. आफ्रिकी देशांसमवेत असणारे राजकीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं ते रवांदा
आणि युगांडा या देशांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते उभय देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय
संबंधावर तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत. तसंच तिथे वास्तव्य करणाऱ्या
भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे प्रजेच्या कल्याणाला
सर्वोच्च महत्व देणारे, उत्तम प्रशासक आणि आदर्श राज्यकर्ते आपल्या भूमीत जन्मले याचा
भारताला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाच्या जल आणि भूमीपूजन कार्यक्रमाला
उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
हृदयविकारावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटच्या किंमतीसह
सर्व माहिती येत्या एक मार्च पूर्वी सादर करण्याची सूचना राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण
प्राधिकरण – एन.पी.पी.ए. नं स्टेंट उत्पादक आणि आयातदारांना केली आहे. स्टेंट उत्पादन,
आयात आणि विक्रीबाबत दर तीन महिन्याला विवरण सादर करण्यासही प्राधिकरणानं सांगीतलं
आहे. उत्पादकानं स्टेंटच्या किंमतीची यादी ऑनलाईन जारी करावी आणि त्याची प्रत सर्व
राज्यांमधल्या औषध नियामक, वितरक, तसेच ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांना पाठवावी असं याबाबतच्या
अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संयुक्त संसदीय गट स्थापन करण्याचा
निर्णय दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संमेलनात घेण्यात आला आहे.
इंदौर इथं आयोजित संमेलनाचं उद्घाटन काल लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन आणि अन्य मान्यवरांच्या
हस्ते झालं. भारतीय संसद आणि आंतरसंसदीय संघाच्यावतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं
आहे. संमेलनादरम्यान, शाश्वत विकास आणि लोकशाहीसह दहशतवादासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर
चर्चा झाली.
//*******//
No comments:
Post a Comment