Thursday, 23 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

·      दहा महानगरपालिका, २५ जिल्हा परीषदां आणि २८३ पंचायत समित्यांच्या मतदानाची आज मोजणी

·      सौर ऊर्जा निर्मिती क्षमता, चाळीस हजार मेगॅवॅटपर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      सांडपाणी प्रकिया प्रकल्प न उभारणारे देशभरातले औद्योगिक प्रकल्प तीन महिन्यानंतर बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आणि

·      भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना

****

राज्यात दोन टप्प्यात पार पडलेल्या, दहा महानगरपालिका, २५ जिल्हा परीषदां, आणि २८३ पंचायत समित्यांच्या मतदानाची आज सकाळी दहा वाजता मत मोजणीला सुरूवात केली जाणार आहे.

१० महापालिकांमध्ये, एक हजार, २६८ जागांसाठी तब्बल ९ हजार, २०८ उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परीषदेसाठी सात हजार, २३४ उमेदवारांनी ही निवडणूक लढवली होती. पंचायत समित्यांच्या तीन हजार जागांसाठी, १२ हजार, ८६० उमेदवार मैदानात होते. मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परीषदांचे ४६० गट, आणि ७६ पंचायत समित्यांच्या ९३० गणांतल्या मतदानाचीही आज मतमोजणी केली जाणार आहे.

पंचायत समितीनिहाय मतदानाची मोजणी केली जाणार असून, दुपारपर्यंत सर्व  निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

अपवाद वगळता सर्व ठिकाणी बहुरंगी लढती झाल्यानं, त्याचबरोबर मतदानाचं प्रमाणही वाढल्यानं निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

****

देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता, वीस हजार मेगॅवॉटवरून चाळीस हजार मेगॅवॉटपर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी काल नवी दिल्लीत  वार्ताहरांना ही माहिती दिली.

****

एक हजार रूपयांची नवी नोट आणण्याचा विचार नसल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी एका ट्विटमध्ये ही बाब स्पष्ट केली. पाचशे रूपये आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटांची निर्मिती आणि पुरवठा करण्यावर सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं, दास यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी ए टी एम मधून आवश्यकते पुरतेच पैसे काढावेत, असं आवाहनही दास यांनी केलं आहे.

****

सर्व रूग्णालयांनी हृदयविकारात महत्त्वाच्या असलेल्या स्टेंटसचे सुधारीत दर दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश, राष्ट्रीय औषधी मूल्यांकन मंडळानं दिले आहेत. राज्य औषधी नियंत्रकांनाही याबद्दल सूचित करण्यात आलं असून, रूग्णालयं या निर्देशाचं पालन करत आहेत अथवा नाहीत, ही बाब, तपासणी करून कळवण्यास, सांगण्यात आलं आहे. या स्टेंट्सची निर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवावा आणि त्यांची टंचाई भासू देऊ नये, अशा इशाराही मंडळानं या उपकरणाच्या उत्पादक आणि आयातदारांना दिला आहे.

****

सांडपाणी प्रकिया प्रकल्प न उभारणारे देशभरातले औद्योगिक प्रकल्प तीन महिन्यानंतर बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांनी सांडपाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी सामायिक जाहिरात देऊन, औद्योगिक प्रकल्पांना या निर्णयाची महिती द्यावी, तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर सर्व प्रकल्पांची पाहणी करावी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसलेले कारखाने त्वरीत बंद करावेत त्याचबरोबर त्यांचा वीजपुरवठा खंडीत करावा, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या अटीवरच या कारखान्यांना परवानगी दिली जाते, मात्र अनेक कारखाने असे प्रकल्प न उभारता कारखान्यातलं दूषित आणि घातक पाणी नदी- नाले, आणि समुद्रात सोडत असल्याचं आढळून आलं आहे, यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होत असल्याचं आढळून आलं आहे. या पार्श्वभूमीवर एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर निकाल देतांना न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकार कडून सकारात्मक पावलं उलली जात नसल्यानं, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं, बारावीचे पेपर तपासण्या संदर्भात असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या महासंघाचे अध्यक्ष, प्राचार्य अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. शिक्षकांनी गेल्या वर्षी त्यांच्या प्रलंबित मगण्यांसाठी आंदोलनं केली, त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात मागण्या पूर्ण केल्याच नाहीत, त्यामुळे हे पाऊल उचलावं लागल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.

****

गंगाखेड नगरपरिषदेच्या मालकीची जागा भाडेतत्वावर देण्याबाबत अंतिम आदेश काढण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाच घेताना, कार्यालयीन अधीक्षक शामकांत काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची येत्या सव्वीस फेब्रुवारीला होणार असलेली एम. फिल. ची प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, ती आता येत्या पाच मार्चला होईल, असं विद्यापीठानं एका परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. सव्वीस फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

****

उस्मानाबाद इथं येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर यांची निवड झाली आहे. नाट्य संमेलन तयारी संदर्भात नाट्य परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज पासून सुरुवात होत आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिला सामना सुरू होईल. भारतानं याआधी इंग्लंड विरुध्दची पाच कसोटी सामन्यांची मालिका चार - शून्य अशा फरकानं, तर बांगलादेश सोबतचा एकमेव कसोटी सामनाही जिंकला आहे.

****

हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी, कल्याण बोडखे यांचं परवा रात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते.  औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या देभेगाव या त्यांच्या गावी काल त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

ग्रामीण लेखक पत्रकार आसाराम लोमटे यांनाआलोकया त्यांच्या लघु कथासंग्रहासाठी जाहीर झालेला २०१६ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर उपस्थित होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश मरकड यांची निवड झाली आहे. त्यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मरकड यांना नऊ तर काँगेसचे मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन यांना आठ मतं पडली. स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे कैसरोद्दीन, आणि भारतीय जनता पक्षाचे अविनाश कुलकर्णी यांची निवड झाली.

****

औरंगाबाद शहरातल्या सिडको भागात सोयी-सुविधा न दिल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सिडको आणि औरंगाबाद महानगर पालिकेला नोटीस बजावली आहे. सिडको मध्ये सोयी- सुविधा देण्यात याव्यात, यासाठी १९८६ मध्ये एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, २००४ मध्ये विधीज्ञ प्रदीप देशमुख, सिडको आणि महानगर पालिकेचे अधिकारी यांची एक समिती यासंदर्भात खंडपीठानं स्थापन केली होती. या समितीनं दिलेल्या अहवालात सुचवलेल्या शिफारसी आणि सूचनांची अंमलबजावणी महानगर पालिका आणि सिडकोनं न केल्यानं, न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे.

****

      सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरूद्ध काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरमधील एका माजी सैनिकानं परिचारक यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, परिचारक यांच्या आक्षेपार्ह क्तव्याचा निषेध म्हणून काल पंढरपूर इथं बंद पाळण्यात आला.

****

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, जालना इथल्या हिरालाल अग्रवाल या उद्योजकाच्या कुटुंबियांना, दक्षिण मध्य रेल्वे आणि विमा कंपनीनं तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि व्याजापोटी पंधरा लाख रुपये, द्यावेत, असा आदेश जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिला आहे. या रकमेतील सत्तर टक्के रक्कम दक्षिण मध्य रेल्वेनं आणि तीस टक्के रक्कम विमा कंपनीनं द्यावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

//******//

No comments: