आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२१ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यातल्या
दहा महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी
मतदानाला आज सकाळी साडे सात वाजेपासून सुरुवात झाली आहे. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत
मतदान चालणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला आहे.
****
जम्मू
काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात आज सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा
कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दोन दहशतवादी पळून
जाण्यात यशस्वी झाले. या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
****
हृदयरोगाच्या उपचारासाठी
वापरण्यात येणाऱ्या ‘कोरोनरी स्टेंटस्’ च्या उत्पादकांनी तसंच
आयातदारांनी
स्टेंटच्या किंमतीची यादी एक मार्चपूर्वी
सादर करावी अशी सूचना राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरणानं केली आहे. त्यासोबतच
उत्पादकांना, उत्पादनाचं त्रैमासिक विवरण,
स्टेंट्सच्या आयात आणि विक्रीची माहिती सादर करावी, असंही यासंदर्भात जारी
सूचनेत म्हटलं आहे.
****
अनुसूचित
जाती प्रवर्गातल्या अंदाजे १२ लाख कलाकारांच्या
आर्थिक विकासासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय मंत्रालयानं एकत्रित येऊन
काम करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या अनुसूचित जातीतील कलाकारांचं उत्पन्न वाढवण्याच्या
उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी
आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत
या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
****
तामिळनाडूमध्ये विरोधी पक्ष डीएमकेनं राज्य विधानसभेत गेल्या
शनिवारी संमत झालेला विश्वासमत ठराव रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च
न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री ई पलानिसामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला, मात्र याला आपला
विरोध असल्याचं डीएमकेनं म्हटलं आहे.
****
तेहरान इथं सुरु असलेल्या विश्व महिला बुद्धीबळ स्पर्धेत
ग्रँड मास्टर द्रोणावली हरिका उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. हरिकानं उपउपान्त्य फेरीच्या
सामन्यात जॉर्जियाच्या खेळाडूचा पराभव केला.
//********//
No comments:
Post a Comment