Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी होणाऱ्या
अंतिम टप्प्याच्या मतदानाचा प्रचार आज संध्याकाळी संपणार
आहे. या टप्प्यात
११ जिल्ह्यांतल्या ५१
मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मात्र समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळं
आलापूर मतदारसंघासाठीचं मतदान नऊ मार्चपर्यंत पुढे
ढकलण्यात आलं आहे. या टप्प्यासाठी ४५ महिला उमेदवारांसह ६१८ उमेदवार रिंगणात आहेत.
****
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि ओडिसामध्ये स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत मिळवलेलं यश ‘विजय उत्सवाच्या’ रुपानं साजरं
करणार आहे. सर्व जिल्ह्यांमधल्या भाजप कार्यालयांमध्ये हा
उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं
आहे. याबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विमुद्रीकरणानंतर भाजपनं सर्व
निवडणुका जिंकल्या असल्याचं म्हटलं आहे.
****
भारत बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर गुन्ह्यांचं प्रमाण
कमी करण्यासाठी सीमा सुरक्षा बल - बी एस एफ आणि बांग्लादेश सीमा सुरक्षा दल - बी जी
बीनं संयुक्तरित्या सीमेवर गस्त घालण्यास संमती दर्शवली आहे. मेघालय मधल्या सीमेवरील
गुन्ह्यांचं प्रमाण जास्त असणाऱ्या ६८ जागांची माहिती मिळाली आहे. याठिकाणी दोन्ही
देशांकडून रात्रंदिवस पाळत ठेवण्यात येणार आहे.
****
गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात
भारताची स्टील
निर्यात तीन पटींनी वाढून आठ दशांश ८९ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी
महिन्यात देशाची स्टील निर्यात २ दशांश ७४ लाख टन एवढी झाली
होती. स्थानिक स्टील उद्योगांना सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असल्यामुळे ही
वाढ झाली असल्याचं स्टील उद्योगाच्या संयुक्त प्रकल्प समितीनं म्हटलं आहे. जानेवारीशिवाय
उर्वरित १० महिन्यांमध्येही ५८ दशांश ६५ लाख टन स्टील निर्यात झाली असून, गेल्या वर्षीच्या
तुलनेत त्यामध्ये ७१ टक्के वाढ झाली असल्याचं समितीनं म्हटलं आहे.
****
मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला
पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसनं कोणतंही आश्वासन न देता सध्या
सुरू असलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होईपर्यंत थांबा आणि वाट पहा अशी
भूमिका स्वीकारली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तामध्ये ही माहिती देण्यात आली. मुंबईत
काँग्रेसला २२७ पैकी फक्त ३१ जागा मिळाल्या आहेत. तर तीन बंडखोर पुन्हा पक्षात परतल्यामुळे
शिवसेनेचं संख्याबळ आता ८७ पर्यंत पोहचलं आहे. मात्र तरीही शिवसेना
११४ या बहुमताच्या आकड्यापासून बरीच दूर आहे.
****
डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात येत्या
सहा मार्चला डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात डिजिटल व्यवहाराशी
निगडीत बँका, विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. यात रोखरहित
व्यवहारांची माहिती देण्यात येणार आहे.
****
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या
काळात त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याच्या हेतूनं राज्य शिक्षण मंडळानं राज्यभरातल्या
विद्यार्थ्यांसाठी
दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी
ही माहिती दिली. परीक्षा कालावधीत सकाळी आठ
ते रात्री आठ
या वेळेत भ्रमणध्वनीवरून
विद्यार्थ्यांना आवश्यक ते समुपदेशन निःशुल्क करण्यात
येणार आहे.
****
पुणे इथं सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या
पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर
संपुष्टात आला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विननं चार, रविंद्र जडेजानं तीन, उमेश यादवनं
दोन तर जयंत यादवनं एक बळी घेतला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा दोन बाद १६ धावा झाल्या. सामना जिकंण्यासाठी भारताला ४२५ धावांची आवश्यकता
आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांच्या
कायम आरक्षित जागी, खुल्या आणि इतर नियुक्या करतांना आरक्षण कायद्याचा भंग करून संबंधितांच्या
वेतनावर, दोन कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी
धुळे शहर पोलीस ठाण्यात चार तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
यासंदर्भात धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी, तत्कालीन शिक्षणाधिकारी बी एस सूर्यवंशी, जी एन पाटील, जी के पाडवी आणि सी एस परचुरे यांनी शिंदखेडा, बेटावद, कापडणे तसंच खेडे इथल्या शाळांमध्ये हा गैरप्रकार केल्याची तक्रार केली आहे.
यासंदर्भात धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी, तत्कालीन शिक्षणाधिकारी बी एस सूर्यवंशी, जी एन पाटील, जी के पाडवी आणि सी एस परचुरे यांनी शिंदखेडा, बेटावद, कापडणे तसंच खेडे इथल्या शाळांमध्ये हा गैरप्रकार केल्याची तक्रार केली आहे.
//*******//
No comments:
Post a Comment