Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 24 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या दोन अपक्ष
नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ ८६ झालं आहे.
विक्रोळीच्या नगरसेवक स्नेहल मोरे आणि दिंडोशीचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अशी या दोघांची
नावं आहेत. आणखी काही अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपनंही आपल्याला एका अपक्ष नगरसेवकाचा
पाठिंबा असून, आणखी दोन अपक्ष नगरसेवक संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
****
नाशिकमध्ये काल मतमोजणी दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी
पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजपानं मतदान यंत्रात फेरफार केल्याच्या आरोपावरुन
भाजप आणि शिवसेना समर्थकांचा काल वाद झाला. या ठिकाणी रस्ता रोको आणि दगडफेकीचे प्रकार
घडले. यात सहा पोलिस आणि काही नागरिक जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत
गोळीबार करावा लागला होता.
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कराचा
भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या संबंधित शाखांची मान्यता रद्द करण्याचा
इशारा केंद्र सरकारनं दिला आहे. काही बँकांमधून कराचा भरणा करून घेण्यास नकार दिल्याची
प्रकरणं समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयानं सर्व प्रमुख बँकांना
लिहिलेल्या पत्रात हे निर्देश दिले आहेत. यासाठी बँकांनी आपली सॉफ्टवेअर किंवा संगणकीय
प्रणालीत आवश्यक बदल करून घ्यावेत, असंही या पत्रात म्हटलं आहे.
विमुद्रीकरणानंतर सरकारनं जाहीर केलेल्या
या योजनेअंतर्गत नागरिकांना आपली बेहिशेबी संपत्ती पन्नास टक्के कर भरून नियमित करून
घेता येणार आहे. एक डिसेंबरपासून सुरू झालेली ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार
आहे.
****
देशात पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती
एका अहवालातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओनं जारी केलेल्या
अहवालानुसार चीन आणि भारत सर्वात जास्त तणावात असलेल्या देशांच्या यादीत आहेत. जगभरात
तणावग्रस्तांची संख्या सुमारे ३२ कोटी असून, यातील ५० टक्के लोक भारत आणि चीनमध्ये
आहेत. २००५ ते २०१५ या दहा वर्षांत तणावग्रस्तांची संख्या १८ टक्क्यांनी वाढली असल्याचं
अहवालातून समोर आलं आहे.
****
२०२० पर्यंत भारत तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या
माध्यमातून जनजागृती अभियान चालवणार असल्याचं भारतीय दंतचिकित्सा संघटना- आय डी ए चे
आगामी नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दीपक माखीजानी यांनी म्हटलं आहे. ते काल मध्यप्रदेशात
ग्वाल्हेर इथं पत्रकारांशी बोलत होते. धुम्रपान करणारे ७० टक्के लोक तंबाखू सोडू इच्छितात
परंतू ५ टक्केच लोक त्यात यशस्वी होतात, हे प्रमाण वाढवण्यासाठी जागृती अभियान प्रभावीपणे
राबवणार असल्याचं ते म्हणाले.
****
बिहार कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष सुधीर कुमार यांना
राज्यात लिपिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उघड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष
तपास पथकानं त्यांना आज झारखंडमधल्या हजारीबाग इथून अटक केली. त्यांची चौकशी सुरू असल्याचं
तपास यंत्रणेचे प्रमुख मनु महाराज यांनी सांगितलं. याप्रकरणी आयोगाचे सचिव, तसंच पेपर
छापून देणाऱ्या कंपनी मालकाला याआधीच अटक करण्यात आली आहे.
****
धुळे शहरातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील एका गोदामावर
छापा मारून चार लाख ८६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण
विभागानं ही कारवाई केली. हा मुद्देमाल पुढील तपासासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे
सुपूर्द करण्यात आला.
****
धुळे तालुक्यात आर्वी गावाजवळ कापूस जिनींग फॅक्टरीत आज
पहाटे साडे चार वाजता आग लागली. या आगीत एकवीरा कॉटेक्स कंपनीचे कापसाचे गठ्ठे मोठ्या
प्रमाणावर जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या चार बंबांनी केलेल्या प्रयत्नांनंतर ही
आग आटोक्यात आली. या आगीत नुकसानाचा आकडा कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात
येत आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुणे
इथं सुरु असलेल्या कसोटी सामच्याचा आजचा खेळ संपला असून, दिवस अखेर ऑस्टेलियाच्या दुसऱ्या
डावात चार बाद १४३ धावा झाल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विननं तीन तर जयंत यादवनं एक
बळी घेतला. याआधी भारताचा पहिला डाव १०५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी
आघाडीवर आहे.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा
महासंघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं आज पदकाचं खातं उघडलं. महिलांच्या दहा मीटर
एयर रायफल स्पर्धेत पूजा धाटकर हिनं कांस्य पदक मिळवलं.
****
बीड तालुका आणि बीड शहर व्यापारी महासंघाच्या वतीनं परवा
रविवारी बीड इथं व्यापारी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे आमदार
जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन होणार असून, पुणे इथले अर्थतज्ज्ञ
पंकज मानधने व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment