Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
राज्यातल्या दहा महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा
जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. सर्व
ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं चित्र दिसून येत आहे. सर्वच ठिकाणी
मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता सुरळीत सुरू आहे.
उल्हासनगर इथं माजी उपमहापौर आशा इदनानी या मतदान केंद्रावर
आल्या असता त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. तर ठाणे इथल्या वर्तक नगर मतदान केंद्रावर
शिवसेनेच्या उमेदवार विमल भोईर या मतदानासाठी गेल्यावर मतदान यंत्र बंद पडलं. काही
वेळानंतर यंत्र दुरूस्त झाल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. नाशिक शहरात काठे गल्ली
भागातल्या मतदान केंद्रावरचं मतदान यंत्र सकाळी मतदान सुरू होतानाच बंद पडलं होतं.
ते यंत्र बदलल्यावर मतदान सुरळीत झालं. म्हसरुळ भागात सुमारे साडे सहाशे मतदारांची
नावं मतदार यादीत सापडत नसल्यानं, मतदार संतप्त झाले होते. मात्र, विभागीय अधिकारी
तसंच पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर ताण निवळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन्ही
टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी परवा गुरुवारी होणार आहे.
****
पुणे महानगरपालिकेनं मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा
उपक्रम राबवला आहे. मतदान केल्यानंतर मतदारांना एक लीटर पेट्रोलचं मोफत कुपन देण्यात
येत आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात
येत आहे.
****
जागतिक मातृभाषा दिन आज साजरा होत आहे. “बहुभाषिक शिक्षणाद्वारे
शाश्वत भविष्य” हे या वर्षाचं घोषवाक्य आहे. २००० सालापासून युनेस्कोतर्फे हा दिन साजरा
केला जातो.
****
प्राप्तीकर विभागाच्या स्वच्छ धन मोहिमेचा दुसरा टप्पा पुढील
महिन्यात राबवला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम असलेल्या
बँक खात्यांमधील रकमांची छाननी करण्यात येणार आहे.
****
सन २०१७-१८ या वर्षामध्ये ३४१ लाख कापूस गाठीचं उत्पादन होईल
असा अंदाज उद्योग संघटनेनं व्यक्त केला आहे. गेल्या महिन्याच्या अंदाजपत्रकात ही बाब
नमूद करण्यात आली.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा केंद्रावर नाफेडमार्फत हमीभावानं
होणारी तूर खरेदी बारदानं आणि गोदामाची उपलब्धता नसल्यामुळे बंद करण्यात आली आहे. या
परिसरात विक्रीसाठी आलेल्या तुरीच्या साठवणीसाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची
मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
****
पैठण एमआयडीसी इथल्या बेबी केमिकल कंपनीत रसायनाची टाकी साफ
करताना त्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. दिलीप भिसे असं या कामगाराचं नाव असून,
काल रात्री टाकी साफ करताना तो टाकीत पडला. त्याला औरंगाबाद इथं रुग्णालयात दाखल करण्यात
आलं, मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं पैठण एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात
आलं.
****
औरंगाबाद इथं आज कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून
संरक्षण अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीबाबत एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं
आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
विद्यापीठाच्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्था”
या नोंदणीकृत संस्थेचं उद्घाटन येत्या २४ तारखेला शासकीय कर्करोग रूग्णालयाचे अधिकारी
डॉ. अरविंद गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांच्या
दृढीकरणासाठी ज्ञानाचा प्रचार-प्रसार करणं, मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्यांकांच्या
तरतूदींचं अध्ययन करणं, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग, कार्यशाळा, व्याख्यानं आयोजित करणं
आदी या संस्थेची उद्दिष्टं आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथल्या दारुकांडातील मृतांची
संख्या नऊ झाली आहे. भास्कर आव्हाड यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची
तत्काळ चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयची सद्यस्थिती स्पष्ट
करावी, अशी मागणी करणारी याचिका राज्य क्रिकेट संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल
केली आहे. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याबद्दल न्यायालयानं
गेल्या महिन्यात बीसीसीआय आणि संबंधित क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवलं
होतं. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
****
कोलंबो इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचा
अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान होणार आहे. येत्या जून -जूलै मध्ये इंग्लंड इथं होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ याआधीच पात्र ठरला आहे.
//******//
No comments:
Post a Comment