Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
राज्य
विधीमंडळाचं येत्या ६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १८ मार्चला अर्थसंकल्प मांडणार
·
मराठा
आरक्षणाचा विषय, राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवता येईल का, मुंबई उच्च न्यायालयाची
सरकारला विचारणा
·
तूर
खरेदीचे शेतकऱ्यांचे पैसे सात दिवसांच्या आत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
·
लाचखोर उपजिल्हाधिकारी शोभा राऊत हिला
चार वर्ष सश्रम कारावास, आणि २५ हजार रुपये दंडाची
शिक्षा
आणि
·
मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
साजरा, साहित्यविषयक विविध पुरस्कारांचं वितरण
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
येत्या ६ मार्चपासून सुरू होणार असून, १८
मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील. काल
विधानभवनात झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ६ मार्चला
विधीमंडळाच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेसमोर राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल. सात
एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात, एकूण २३ दिवस कामकाज होईल. या
दरम्यान ६ अध्यादेश, तसंच दोन प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. यामध्ये
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश, मुंबई तसंच महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अध्यादेश, राज्य मागासवर्ग आयोग सुधारणा अध्यादेश, आदी अध्यादेशांचा समावेश आहे.
****
सायबर गुन्हे प्रतिबंधासह, स्ट्रॉंग सिटी नेटवर्क क्षेत्रात
राज्याला अमेरिकेचं सहकार्य मिळणार
आहे. गृह राज्यमंत्री
डॉ. रणजीत पाटील यांनी ही माहिती
दिली. यासंदर्भात अमेरिकी
दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी काल डॉ. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक
झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठीही
राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच अमेरिकेचं या क्षेत्रातलं सहकार्य महत्वाचं
ठरेल, असं, पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाचा विषय, नव्यानं स्थापन
करण्यात आलेल्या, महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवता येईल का, अशी विचारणा,
मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला केली. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात
आलेल्या, विविध याचिकांची सुनावणी मुख्य न्यायाधीश मंजुषा चेल्लूर यांच्या अध्यक्षते
खालील पीठासमोर काल झाली, त्यावेळेस उच्च न्यायालयानं
ही विचारणा केली. याबाबत राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यास
न्यायालयानं सांगितलं आहे. या यचिकांची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे.
****
राज्यात तूर उत्पादनात झालेली भरघोस
वाढ लक्षात घेता सर्वत्र तूर खरेदी
केंद्रं सुरू करावीत, तसंच शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे सात दिवसांच्या आत देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत, तूर
खरेदी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत
बैठक झाली होती, त्यावेळी
ते बोलत होते. शेतकऱ्यांचं
नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत, राज्यात
जिथं भारतीय अन्न महामंडळाचे खरेदी केंद्रं सुरु आहेत, तिथं
नाफेडनं खरेदी केंद्रं तातडीनं सुरु करावीत, गोदामांची
क्षमता वाढवण्यासाठी गोदामांचं मॅपिंग करुन, आवश्यकतेनुसार खासगी गोदामं ताब्यात घेण्याच्या
सूचनाही, मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिल्या.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांनी
विविध मागण्यांसाठी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात युनायटेड फोरम
ऑफ बॅंक युनियनच्या अखत्यारीतल्या ९ संघटनांचे सुमारे १० लाख कर्मचारी सहभागी होणार
आहेत. मात्र खाजगी क्षेत्रातल्या बॅंकांचं कामकाज आज सुरु राहणार आहे.
****
सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव
सुमित मलिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय आज सेवानिवृत्त होत आहेत.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी इयत्ता
बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी मंडळानं विभागीय स्तरावर
मदतवाहिनी सुरू केली असून, परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार
आहे.
दरम्यान, दहावीच्या लेखी
परीक्षेला येत्या सात मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
२०१४ च्या
लाचखोरी प्रकरणात उस्मानाबाद इथल्या उपजिल्हाधिकारी शोभा राऊत हिला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं तिला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावास आणि
२५
हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या दोन्ही शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहतीकरता शेतजमीन
संपादित करताना राऊत यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातून पाच टक्के रक्कम मागितली
होती. यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून राऊत यांना जुलै २०१४ मध्ये अटक करण्यात आली
होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात
काल मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर काल
मुंबईत विविध पुरस्कारांचं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण करण्यात
आलं. यामध्ये विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर
भाषा अभ्यासक पुरस्कार यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना, तसंच श्री. पु. भागवत स्मृती
उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्याच्या भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला.
याचबरोबर विविध साहित्य-प्रकारांसाठीचे यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कारही
यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये, प्रतिमा इंगोले यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
पुरस्कार, सुधीर रसाळ यांना के. क्षीरसागर पुरस्कार, रमेश पतंगे यांना डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पुरस्कार, डॉ. प्रभा गणोरकर यांना कवी केशवसूत पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय
यांना वसंतराव नाईक पुरस्कार, श्रीराम पेडगावकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार, हेरंब
कुलकर्णी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुकर धर्मापुरीकर
यांना ना. धों. ताम्हणकर पुरस्कार देण्यात आला.
****
नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जेष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. मानपत्र, स्मृती
चिन्ह आणि एक लाख रुपये असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे काव्य पुरस्कार
काल औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कविवर्य
कुसुमाग्रज काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना तर कवयित्री लीला धनपलवार
पुरस्कार कवयित्री कविता महाजन यांना ज्येष्ठ समीक्षक डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. अकरा हजार रुपये
रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
औरंगाबाद इथं माहिती आणि जनसंपर्क विभागानं आयोजित केलेल्या कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचं
उद्घाटन साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
परभणी इथं राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं
मराठी राजभाषा दिन काल साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या
सोनपेठ बसस्थानकावर आमदार राहुल पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या
पुस्तकांचं वाटप केलं.
****
देशातल्या तरुणांमध्ये प्रचंड
क्षमता असून वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचं वोक्हार्ट
संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश चांडक यांनी म्हटलं आहे. औरंगाबादच्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित
स्पर्धेचं उद्घाटन चांडक यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताचा
गेल्या अनेक वर्षांपासून विकसनशील देशामध्ये समावेश असून विकसित देशात समाविष्ट होण्यासाठी
प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई
तालुक्यातल्या गिरवली इथं विवाहीत महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या
निषेधार्थ काल गिरवली इथं मोर्चा काढण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय
प्रचार संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यातल्या खालापुरी, इथं कालपासून सुरू झालेल्या ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियानाचा आज समारोप होईल.
//*****//
No comments:
Post a Comment