Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
· शेतकऱ्यांकडची सर्व तूर खरेदी
करण्याची राज्य सरकारची घोषणा
· प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे
सैन्य भरतीसाठी होणारी लेखी परीक्षा रद्द
· राज्यात जिल्हा
परीषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस
अनुकूल - शरद पवार
आणि
· मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त
आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
राज्यातल्या शेतकऱ्यांकडच्या सर्व तुरीची खरेदी केली जाणार
असल्याचं काल राज्य सरकारनं जाहीर केलं. ही तूर खरेदी करेपर्यंत कोणतेही केंद्र बंद
केले जाणार नसून १५ मार्चनंतरदेखील खरेदी केंद्र सुरूच राहणार आहेत. तूर उत्पादनात
झालेली वाढ आणि खरेदीसाठी आवश्यक बारदान्यासह तिच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध होत
नसल्यामुळे राज्यातल्या खरेदी केंद्रांमध्ये तूर खरेदी केली जात नसल्याची शेतकऱ्यांची
तक्रार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं.
केंद्र सरकारनं तूर खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिली असून तिला मुदतवाढ देण्याची
मागणी करण्यात आली असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, तूर साठवणुकीसाठी राज्यातले शासनाच्या नियंत्रणाखालची
विविध महामंडळं, समित्यां तसंच खासगी गोदामं भाड्याने घेण्याचे निर्देशही पणनमंत्री
देशमुख यांनी दिले आहेत.
****
तंत्रज्ञान
हे सामान्य माणसाच्या उपयोगाचं बनवण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञांची
गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या
‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या २९ व्या भागात जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते. यासाठी युवकांनी
विज्ञानाची कास धरावी असं ते म्हणाले. डिजीधन योजनेअंतर्गत रोखविरहीत व्यवहार करण्याला
मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो व्यापारी आणि लाखो नागरिकांना सरकारकडून बक्षीसं मिळाली
असल्याचं त्यांनी नमूद केलं. येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीदिनी किमान १२५ जणांना भिम हे ॲप अंकेक्षित व्यवहारांसाठी वापरण्यास शिकवावं,
असं आवाहन त्यांनी केलं.
यंदा देशात विक्रमी धान्य
उत्पादन झालं असून, ते आपल्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचं फळ असल्याचं पंतप्रधानांनी
यावेळी सांगितलं.
पेयजल
आणि स्वच्छता योजना, स्वच्छता पंधरवडा आदी उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. येत्या
आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं देशात महिलांप्रती
संवेदनशीलता आणि जागरुकता वाढावी असं आवाहन त्यांनी केलं. महिला सक्षमीकरणासाठी विविध
राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. महिलांनी
सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून त्यांना सर्व बाबतीत समान हक्क
असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांनी स्वत:वर काही बंधनं घालावीत,
अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणुकीला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशानं
काही नेते याप्रकारचे मुद्दे अधोरेखित करतात आणि त्यामुळे प्रक्षोभक विधानं केली जातात,
अशा प्रकारची भाषणं निकोप वातावरणासाठी बाधक असून, हा गंभीर मुद्दा असल्याचं आयोगानं
नमूद केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म आणि वंश
या मुद्यांवर मत मागण्यास बंदी घातली आहे.
****
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सैन्य भरतीसाठी काल देशभरातल्या
विविध केंद्रावर होणारी लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा एक महिन्यानंतर
घेतली जाणार आहे, असं संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे यांनी काल ठाणे इथं सांगितलं. याप्रकरणी, काल ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
अटक केलेल्या लष्कराशी संबंधीत कर्मचाऱ्यांसह एकूण अठरा जणांना न्यायालयानं तीन दिवसांची
पोलिस कोठडी सुनावल्याची माहितीही भामरे यांनी दिली. पोलिसांनी संबंधित साडेतीनशे परीक्षार्थींनाही
ताब्यात घेतलं आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह, नाशिक, पुणे
आणि गोव्यात याबाबत कारवाई करण्यात आली. संबंधीत परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या एका
शिकवणी वर्गात दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं
वृत्त आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख बँकांचे कर्मचारी उद्या संपावर
जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या थकीत कर्जांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना
जबाबदार धरण्याच्या मुद्यासह अन्य मागण्यांसाठी हा संप होणार आहे. खाजगी बँकांचा मात्र
या संपात सहभाग नसेल. बँक कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन संघटनेदरम्यान गेल्या
आठवड्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचं बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम
यांनी काल नवी दिल्ली इथं पीटीआयला सांगितलं.
****
औषधांमध्ये
असणाऱ्या घटक द्रव्यांचं उत्पादन वाढवण्यावर सरकारनं भर दिला पाहिजे असं एका राष्ट्रीय
संस्थेनं म्हटलं आहे. जैविक घटकांचा अभ्यास करणाऱ्या या संस्थेनं केलेल्या सर्वात मोठ्या
औषध गुणवत्ता सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या औषधांपैकी ९०
टक्के औषधं चीनी बनावटीची असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत या संस्थेनं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तसंच
औषध नियामक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याची शिफारस
केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
राज्यात जिल्हा परीषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी
काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आपण अनुकूल असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या दोन पक्षात आघाडी
झाली तर राज्यातल्या १९ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येऊ शकते असं पवार यावेळी म्हणाले.
मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेनेला मदत
करण्याबाबत लवकरच पक्षपातळीवर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. मात्र भारतीय जनता
पक्षाला मदत केली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं पवार यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद
डी लिट पदवी प्रदान केली. विद्यापीठाचा १९वा दीक्षांत समारंभ काल पार पडला. यावेळी
बोलतांना पवार यांनी मराठवाडा शेतीवर अवलंबून असल्यामुळे इथल्या तरुणांनी कृषी शिक्षणासाठी
आग्रही असायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
****
विख्यात साहित्यिक कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते.
या निमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेशी संबधित
विविध विभाग, विद्यापीठं, ग्रंथालयं, विविध शैक्षणिक संस्थांसह ठिकठिकाणी हे कार्यक्रम
होणार आहेत. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मराठी साहित्यातील
मनाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना प्रदान केला जाणार
आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार’
ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे. तर ‘कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार’
कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. परिषदेच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. परिषदेच्या औरंगाबाद इथल्या सभागृहात समीक्षक आणि
कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहेत. परिषदेच्या वतीनं आजचा २७ फेब्रुवारी हा कविवर्य
कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘कविता दिन’ म्हणून साजरा केला जातो.
****
मुंबई इथं येत्या सहा मार्च रोजी आयोजित मराठा मोर्चा दहावी-बारावीच्या
परीक्षांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. काल औरंगाबाद इथं संबंधीत समन्वय समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
****
केंद्र
सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाअंतर्गत हिंगोली
जिल्ह्यातल्या सिरसम इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय
जनजागृती अभियानाला काल सुरुवात झाली. कालच्या
पहिल्या दिवशी
किशोरवयीन आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. आज
या अभियानात,
विद्यार्थ्यांच्या
जनजागरण फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद इथं सहकारी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. यासंदर्भात उस्मानाबाद इथं आयोजित एका कार्यक्रमात
ते बोलत होते. मुंबईतले प्रसिध्द डॉक्टर पद्मभूषण नंदू लाड यांनी या रुग्णालय उभारण्यासंदर्भात
यावेळी माहिती दिली. या प्रस्तावित रुग्णालयाला तुळजाभवानी सहकारी रुग्णालय असं नाव
देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.
//******//
No comments:
Post a Comment