Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
दहा महानगरपालिकांसाठी सरासरी
५६ टक्के तर अकरा जिल्हा परिषदांसाठी सरासरी ७० टक्के मतदान; उद्या मतमोजणी
·
मिलिंद
चंपानेरकर यांना अनुवादासाठी
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
·
कामाच्या
ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याविषयी जनजागृती करणाऱ्या
मोहिमेचा औरंगाबाद इथं समारोप
आणि
·
सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला महिला विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद
****
राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी
सरासरी ५६ टक्के तर अकरा जिल्हा परिषदां आणि ११८ पंचायत समित्यांसाठी सरासरी ७० टक्क्यांवर
काल मतदान झालं. मतदानादरम्यान, पुणे, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एक
जणाचा मृत्यू झाला. किरकोळ अपवाद वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं.
महानगरपालिकांमध्ये मुंबईत ५५ टक्के,
ठाण्यात ५८ टक्के, उल्हासनगरमध्ये ४५ टक्के, नाशिकमध्ये ६० टक्के, पुण्यात ५४ टक्के,
पिंपरी-चिंचवडमध्ये ६७ टक्के, सोलापूरमध्ये ६० टक्के, अमरावतीमध्ये ५५ टक्के, अकोल्यात
५६ टक्के आणि नागपूरमध्ये ५३ टक्के मतदान झालं. जिल्हा परीषद आणि पंचायत समित्यांसाठीही
जोरदार मतदान झालं, यामध्ये पुणे ७०, नाशिक ६८, सोलापूर ६८, सातारा ७०, सांगली ६५,
कोल्हापूर ७७, रायगड ७१, रत्नागिरी ६४, सिंधुदुर्ग ७०, अमरावती ६७, आणि गडचिरोली ६८
टक्के मतदान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या
येहळेगाव इथं काल जिल्हा परीषद गट निवडणुकीचं फेरमतदान घेण्यात आलं. १६ फेब्रुवारी
रोजीच्या मतदानाच्या वेळी यंत्रात बिघाड झाल्यामुळे
या ठिकाणी फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार काल इथं साडे
चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं.
उद्या सर्व महानगरपालिकांसह जिल्हा परीषद आणि पंचायत
समित्यांसाठीच्या मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे.
****
काल झालेल्या मतदानामध्ये पुणे महानगरपालिकेनं
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला. मतदान केल्यानंतर मतदारांना
एक लीटर पेट्रोलचं मोफत कुपन देण्यात आलं. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण
व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला.
ठाणे इथं पैसे वाटप करत असल्याच्या
आरोपावरून काँग्रेस तसंच भारतीय रिपब्लीकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवकाला
मारहाण केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,
ठाण्यात एका प्रभागात बोगस मतदार आढळले असून, त्यांना वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात
देण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात
कुशिरे मतदान केंद्राच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाणीची घटना घडली. रांगेवरून
झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना
ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अंकेक्षित
व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं नीती आयोग “नवीन
परतावा योजना” लवकरच आणणार आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काल नवी दिल्ली
इथं ही माहिती दिली. अंकेक्षित व्यवहारांवर भाग्यवान ग्राहक योजनेअंतर्गत सुमारे
१० लाख ग्राहकांना १५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाधिक ग्राहक अंकेक्षित व्यवहारांचा मार्ग निवडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
मिलिंद चंपानेरकर
यांनी मराठी भाषेत अनुवादित केलेल्या ‘लोकशाहीवादी अम्मीस दिर्घपत्र’ या
पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१६
या वर्षासाठीचे साहित्य अकादमीचे पुरस्कार काल नवी दिल्ली इथं जाहीर
करण्यात आले. सईद अख्तर मिर्झा यांच्या अम्मी- लेटर
टू ए डेमिक्रेटिक मदर या पुस्तकाचा चंपानेरकर यांनी मराठीत अनुवाद केला आहे. पन्नास
हजार रूपये रोख आणि ताम्रपदक असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या सुभद्रा
सेवाभावी प्रतिष्ठाणच्या गौरव पुरस्कारांची काल प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विठ्ठल बोकन यांनी
घोषणा केली. यामध्ये डॉक्टर अनुसया लोंढे यांना मातृगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे,
पत्रकारीतेसाठीचा सुशील कुलकर्णी, कवितेसाठीचा प्रभाकर साळेगावकर, साहित्यासाठीचा राजेंद्र
गहाळ, अध्यात्मसाठीचा धोंडोपंत वाघ, यांना तर भास्करराव टेहरे यांना सेवागौरव पुरस्कार
जाहीर झाला आहे. २९ मार्च रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून
संरक्षण करणाऱ्या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर राबवण्यात आलेल्या मोहिमेचा
काल औरंगाबाद इथं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत समारोप
झाला. या अनुषंगानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत
मार्गदर्शन करताना, रहाटकर यांनी या कायद्याबाबत विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याचं
आवाहन केलं. राज्यभरात विशाखा समितीच्या १५ हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून,
ज्या आस्थापनांनी अद्याप विशाखा समिती कार्यान्वीत केलेली नाही, अशा ठिकाणी तत्काळ
समिती कार्यान्वीत करण्याचे निर्देश रहाटकर यांनी यावेळी दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात
आहे, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या
तुरीची राष्ट्रीय पणन महासंघ - नाफेड खरेदी करणार असल्याचा विश्वास नाफेडच्या अधिकाऱ्यांनी
दिला आहे. नाफेडनं हमी भावानं तुरीची खरेदी करत असून सध्या आवक वाढल्यानं खरेदी केंद्रांवर
बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्याचबरोबर साठवण्यासाठीचे गोदामही अपुरे पडत
असल्यामुळे लातूर जिल्ह्यात नाफेडनं तूर खरेदी करणं थांबवलं आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये
अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांनी काल जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे यांची भेट घेऊन निवेदन दिलं, यावेळी
वांगे यांनी नाफेड शेतकऱ्यांची तूर कोणत्याही परिस्थितीत खरेदी करणार असल्याचं सांगितलं.
तूर साठवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली जात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर
आणि पैठण नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची काल निवड करण्यात आली. यामध्ये कन्नड इथं
स्थायी समितीच्या सभापती पदी
युवराज बनकर यांची निवड करण्यात आली.
पैठण आणि गंगापूर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या
सभापतींचीही निवड काल करण्यात आली. यात नियोजन आणि वित्त, पाणीपुरवठा, आरोग्य आणि स्वच्छता तसंच महिला आणि बालविकास
समितीच्या सभापती पदांचा समावेश आहे.
दरम्यान, खुलताबाद
उपनगराध्यक्षपदाची निवड आज होणार आहे. या निवडीसाठी २ तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर
दक्षिण आफ्रिकेचा एका गड्यानं पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघानं महिला विश्वचषक
स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतासमोर
विजयासाठी २४४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. एकावेळी विजय सोपा वाटत असतानाचं अखेरच्या
सात षटकात भारतीय संघाची घसरगुंडी उडाली आणि शेवटच्या एका षटकात विजयासाठी नऊ धावांची
गरज असताना नववा गडी बाद झाला. अत्यंत दडपण असताना शेवटच्या दोन चेंडूत एका षटकारासह
आठ धावा करत कर्णधार हरमनप्रित कौरनं भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. तिने ४१ चेंडूत
४१ धावा केल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
पुन्हा एकदा गूढ आवाज झाले, यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती.
काल सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास नळदुर्ग, ईट, लोहारा जेवळी जळकोट आणि परीसरात
हे आवाज ऐकू आल्याचं नागरीकांनी सांगितलं. मात्र लातूर इथल्या भूकंप मापकावर यासंदर्भात
काहीही नोंद झाली नसल्याचं प्रशासनाच्यावतीन सांगण्यात आलं.
****
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल
अवमानकारक विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर
कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत काल औरंगाबाद
इथं आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया
रहाटकर यांना घेराव घातला. यावेळी
रहाटकर यांनी कारवाई करण्याचं आश्वासन
दिलं.
याचबरोबर आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही आमदार परिचारक यांच्याविरूद्ध
कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदनं दिलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जेऊर पांगरमल
इथं विषारी दारू पिल्यानं घडलेल्या दुर्घटनेशी संबंधित उत्पादन शुल्क विभागाच्या आणि
जिल्हा रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या अधिकाऱ्यांवर गुन्हे
नोंदवावेत आणि या प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधानसभेतील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे पाटील यांनी पांगरमल इथं जाऊन
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री राम
शिंदे यांनीही या गावाला भेट देवून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
असल्याचं आश्वासन दिलं आहे.
****
लातूर पाटबंधारे विभागांतर्गत सर्व
प्रकल्पाच्या लाभधारकांना उन्हाळी हंगामासाठी संबंधित प्रकल्पातल्या पाणीसाठ्याच्या
उपलब्धतेनुसार पाणी देण्याचं नियोजन असून त्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज
करावेत, असं कार्यकारी अभियंता लघू पांटबंधारे विभाग यांनी कळवलं आहे.
//******//
No comments:
Post a Comment