Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 19 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या
जबाबदार वर्तनावर अवलंबून असल्याचं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.
या विश्वासाचा उगम लोकप्रतिनिधींच्या पारदर्शक, संपर्कक्षम आणि जबाबदारपणे वागण्यात
आहे, असं त्या म्हणाल्या. इंदोर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या
संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या आज बोलत होत्या.
कायदे तयार करणं, अर्थसंकल्प मंजूर करणं, प्रशासकीय कामांवर
लक्ष ठेवणं याबरोबरच विकासप्रक्रियेत संसदेचं एक महत्वाचं स्थान असल्याचं त्या म्हणाल्या.
या संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या
असून, आपले संबंध आणखी दृढ झाल्याचं महाजन यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये
हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये कामकाज चालवण्याची शिफारस एका संसदीय समितीने केली
आहे. सध्या या सर्व ठिकाणी केवळ इंग्रजीमध्ये कामकाज चालवलं जातं. या नियमात बदल करण्यासाठी
राज्यघटनेनं केंद्र सरकारला पुरेसे अधिकार दिले असल्याचं समितीनं म्हटलं आहे. काही
राज्यांमधल्या उच्च न्यायालयात प्रादेशिक भाषेत काम चालवण्याचे प्रस्ताव यापूर्वीच
सादर करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठानं ते फेटाळले होते.
****
भारताकडे वैद्यकीय पर्यटन केंद्र होण्याची क्षमता असून,
सरकारनं परवडण्यायोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत, त्यासाठी प्रयत्न सुरू केले
असल्याचं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबई इथं एका आरोग्य शिबीराचं उद्घाटन करताना बोलत होते.
हदयविकारांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या
किंमती मोठ्या प्रमाणात कमी करून सरकारनं एक मोठं पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले.
ग्रामीण भागात उत्तम आरोग्यसुविधा पुरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं
ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपलं काम लोककल्याणाची चळवळ म्हणून करावं,
असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
२ लाख रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दागिन्यांच्या रोख
खरेदीवर येत्या १ एप्रिलपासून एक टक्का उद्गम कर - टीसीएस लागू होणार आहे. सध्या ही
मर्यादा ५ लाख रूपयांपर्यंत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तीन लाख रूपयांपेक्षा अधिक
रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी दंड आकारण्याची तरतूद
आहे. काळा पैसा निर्मितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव
धोटे यांच्या पार्थीव देहावर आज यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी लासीना इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले. धोटे यांचं काल पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.
****
देशाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचं आज कोलकाता
इथं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३६८ वी जयंती आज सर्वत्र
उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक
म्हणून जो आदर्श निर्माण केला, त्या विचारांचा अवलंब करुन राज्यकारभार करणार असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या
शिवनेरी इथं आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते आज बोलत होते.
नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात शिवजयंती
साजरी करण्यात आली.
मुंबईत विधानभवनात शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत
पुतळ्याला विधानसभेचे सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी पुषपहार अर्पण करून अभिवादन केलं.
सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय
यांनी आज मंत्रालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रकाश
खपले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
शिवजयंती निमित्त लातूर इथं मोटारसायकल फेरीचं आयोजन करण्यात
आलं होतं. ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थानापासून
सुरू झालेल्या या फेरीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन
महिवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
तसंच शहरातून सजवलेल्या हत्ती, घोड्यांसह आणि ढोल-ताशा, झांज, लेझीम पथकासह मिरवणूक
काढण्यात आली.
****
अहमदनगरच्या भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं
देण्यात येणारा पंडित मदनगोपाल व्यास पुरस्कार, यावर्षी लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानला
देण्यात आला. हा पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉ.अशोक कुकडे यांनी स्वीकारला.
४१ हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यातल्या विविध
भागात सामाजिक, अध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार
दिला जातो.
****
राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या
निवडणुकींसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या सर्व ठिकाणी परवा मंगळवारी मतदान होणार आहे.
महानगरपालिकांसाठी आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर जिल्हा परिषदांसाठी आज रात्री
दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment