आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आणि माजी खासदार जांबुवंतराव
धोटे यांचं आज पहाटे यवतमाळ इथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. विधानसभेवर पाच
वेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आलेले धोटे यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच
इतर प्रश्नही आक्रमकपणे मांडले. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असंही संबोधलं जातं.
२००२ साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. जांबुवंतराव धोटेंच्या
निधनानं विदर्भावर शोककळा पसरली आहे.
****
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री इ के पलानिसामी
आज विधानसभेत विश्वास ठराव मांडणार आहेत. पलानिसामी
यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. प्रभारी राज्यपाल सी
विद्यासागर राव यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी पलानीसामी यांना ११७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
****
ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर
रसाळ यांच्या ‘लोभस : एक गाव काही माणसं‘ या
पुस्तकाचं आज
औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालयात प्रकाशन
होणार आहे. ह्या व्यक्तिचित्रणात्मक
पुस्तकाविषयी प्रभारी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी आपले विचार मांडणार आहेत. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या भूमकर सभागृहात सायंकाळी
सहा वाजता हा कार्यक्रम होईल.
****
शिवजयंतीनिमित्त उद्या लातूर इथं दुचाकी
फेरी काढण्यात येणार आहे. शहराचं ग्रामदैवत सिद्धेश्वर - रत्नेश्वर देवस्थानपासून सकाळी
१० वाजता ही फेरी निघेल. रिंग रोड, अंबाजोगाई रोड मार्गे शिवाजी चौकात शिवछत्रपतींना
अभिवादन केल्यानंतर ही फेरी गंजगोलाईमार्गे शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करणार
असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. सिंधूला पहिल्यांदाच जागतिक
क्रमवारीत पहिल्या पाच मध्ये जागा मिळाली आहे. सायना नेहवाल मात्र या क्रमवारीत नवव्या
स्थानावर आहे. चीनची ताई झू यिंग या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे.
//*******//
No comments:
Post a Comment