Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 26 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांनी
स्वत:वर काही बंधनं घालावीत, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणुकीला धार्मिक
रंग देण्याच्या उद्देशानं काही नेते याप्रकारचे मुद्दे अधोरेखित करतात आणि त्यामुळे
प्रक्षोभक विधानं केली जातात, असं आयोगानं सगळ्या मान्यताप्राप्त पक्षांना पाठवलेल्या
पत्रात म्हटलं आहे. अशा प्रकारची भाषणं निकोप वातावरणासाठी बाधक असून, हा गंभीर मुद्दा
असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयानं
जात, धर्म आणि वंश या मुद्यांवर मत मागण्यास बंदी घातली आहे.
****
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर
यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली
आहे. सक्षम आणि विकसित भारताचं स्वप्न पाहणारे वीर सावरकर हे खरे देशभक्त होते असं
पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात
सक्रीय सहभाग घेणाऱ्या सावरकरांनी सशस्त्र लढ्याचा पुरस्कार केला आणि विद्यार्थ्यांना
तसंच समविचारी लोकांना संघटीत केलं. आयुष्यातली अनेक वर्ष त्यांना अंदमान इथल्या तुरुंगात
घालवावी लागली.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख
बँकांचे कर्मचारी परवा मंगळवारी संपावर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातल्या
वाढत्या थकीत कर्जांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या मुद्यासह अन्य मागण्यांसाठी
हा संप होणार आहे. खाजगी बँकांचा मात्र या संपात सहभाग नसेल. बँक कर्मचारी संघटना आणि
बँक व्यवस्थापन संघटनेदरम्यान गेल्या आठवड्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचं बँक कर्मचारी
संघटनेचे सरचिटणीस सी.एच.वेंकटचलम यांनी आज नवी दिल्ली इथं पीटीआयला सांगितलं.
****
ऐतिहासिक वास्तुवैभवाचं जतन आणि संवर्धन करणं ही काळाची
गरज असून, या वास्तू वैयक्तिक संपत्ती समजून प्रत्येकानं त्याचं जतन करावं, असं आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं एशियाटिक सोसायटी मध्यवर्ती
ग्रंथालयाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी ते आज बोलत होते. या सभागृहात
अनेक प्रकारची दुर्मिळ आणि उपयुक्त पुस्तकं उपलब्ध असून, वाचकांनी याचा लाभ घ्यावा
असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची
गरज असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९व्या दीक्षांत समारंभात ते आज प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी शिक्षणामुळे नवीन संसाधन संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध
होतील, असं ते म्हणाले. मराठवाडा हा प्रदेश शेतीवर अवलंबून असल्यामुळे इथल्या तरुणांनी
कृषी शिक्षणासाठी आग्रही असायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. राज्यपाल तथा कुलपती
सी विद्यासागर राव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पवार यांना राज्यपालांच्या
हस्ते मानद डी लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
पोलीस अधिकाऱ्यांविरुध्दच्या
तक्रारींचं निवारण करण्यासाठी येत्या महिनाभरात राज्य तक्रार निवारण प्राधिकरण कार्यान्वित
करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला केली आहे. विभागीय तक्रार निवारण
प्राधिकरणांची स्थापना करण्यासाठी सरकारनं सकारात्मक पावलं उचलावीत आणि ही प्रक्रिया
येत्या २० मार्चपर्यंत पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे.
****
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय
प्रचार संचालनालयाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या सिरसम इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन
आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. आज
पहिल्या दिवशी किशोरवयीन आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. उद्या विद्यार्थ्यांच्या
जनजागरण फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा
‘कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार’ ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे.
तर ‘कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार’ कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. परिषदेच्या
पत्रकात ही माहिती देण्यात आली. उद्या परिषदेच्या औरंगाबाद इथल्या सभागृहात समीक्षक
आणि कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या
वतीनं उद्याचा २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘कविता दिन’ म्हणून
साजरा केला जातो.
****
औषधांमध्ये असणाऱ्या घटकद्रव्यांचं उत्पादन वाढवण्यावर
सरकारनं भर दिला पाहिजे असं एका राष्ट्रीय संस्थेनं म्हटलं आहे. जैविक घटकांचा अभ्यास
करणाऱ्या या संस्थेनं केलेल्या सर्वात मोठ्या औषध गुणवत्ता सर्वेक्षणात ही बाब नमूद
करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या औषधांपैकी ९० टक्के औषधं चीनी बनावटीची असल्याचं समोर
आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत या संस्थेनं
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तसंच औषध नियामक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक
प्रशिक्षण संस्था सुरु करण्याची शिफारस केली आहे.
****
No comments:
Post a Comment