Friday, 24 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      २५ जिल्हा परीषदा आणि दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश

·      काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक जिल्हा परीषदांमधली सत्ता गेली, १७ जिल्हा परीषदांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत नाही.

·      मराठवाड्यात पंचायत समित्यांमध्येही भाजपला सर्वाधिक जागा

आणि

·      दहा पैकी सहा महानगरपालिकांमध्येही भाजपचे वर्चस्व, प्रतिष्ठेची मुंबई महापालिका त्रिशंकू, शिवसेना सर्वात मोठा पक्ष

****

दहा महानगरपालिका, १५ जिल्हा परिषदां आणि २८३ पंचायत समितींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं असून सहा महानगर पालिका आणि लातूर, जळगाव, चंद्रपूर आणि वर्धा या चार जिल्हा परिषदांमध्येही बहुमत मिळालं आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, सांगली, बुलडाणा आणि गडचिरोली जिल्हा परीषदेत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परीषदेत बहुमत मिळालं असून हिंगोली, नाशिक आणि यवतमाळ जिल्हा परीषदेत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेत बहुमत मिळालं असून नांदेड, अहमदनगर आणि अमरावती जिल्हा परीषदेत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पुणे तसंच सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. राज्यातल्या आठ जिल्हा परीषदां वगळता उर्वरीत १७ जिल्हा परीषदांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही.

****

मराठवाड्यात आठ जिल्हा परिषदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं चार, भाजपनं दोन, शिवसेना आणि काँग्रेसनं एका जिल्हा परीषदेमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र लातूर वगळता इतर एकाही जिल्हा परिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. मराठवाड्यात आठही जिल्हा परिषदांमध्ये पक्षीय बलाबलाची माहिती देत आहे वैभवी जोशी.....

लातूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं ३६ जागा जिंकल्या. काँग्रेसनं १५, राष्ट्रवादी काँग्रेसनं ५, शिवसेना १, एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला.    

विभागात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या ६० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 25 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला २० जागा जिंकता आल्या. इतर पक्षांपैकी शिवसेना तसंच शिवसंग्राम प्रत्येकी चार, काकू नाना आघाडीनं तीन काँग्रेस दोन तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये थेट लढत असलेल्या परळी तालुक्यातल्या सहा गटांपैकी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागांपैकी शिवसेना १३, भाजप ५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस २४, राष्ट्रीय समाज पक्ष ३ तर अपक्ष उमेदवार ३ जागांवर निवडून आले.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी शिवसेनेनं १५ जागांवर विजय मिळवला, भाजप १०, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२ तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसनं ६३ पैकी २८ जागा जिंकल्या. भाजपनं १३, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी १०, राष्ट्रीय समाज पक्षानं एक तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक २६ जागा जिंकल्या. शिवसेनेनं ११, काँग्रेसनं १३, भाजपनं चार तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला.

जालना जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी भाजपनं २२, शिवसेनेनं १४, राष्ट्रवादी काँग्रेसनं १३, काँग्रेसनं ५, तअपक्ष उमेदवारांनी २ जागा जिंकल्या.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ६२ जागांपैकी, भाजपनं २३ तर शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या. काँग्रेसचे उमेदवार १६ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तीन जागांवर विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक तर अपक्ष उमेदवारानी एक जागा जिंकली.

****

राठवाड्यात पंचायत समित्यांमध्येही भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळाल असून ७६ पंचायत समित्यांपैकी २१ पंचायत समित्यांमध्ये भाजपला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १२ पंचायत समित्यांमध्ये तर पाच ठिकाणी शिवसेनेला बहुमत मिळालं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९ पंचायत समित्यांपैकी चार पंचायत समित्यांमध्ये भाजपला तर एका पंचायत समितीमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाल आहे. चार पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या दहा पंचायत समित्यांपैकी सातमध्ये भाजपला तर तीन पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या ११ पंचायत समित्यांपैकी पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. दोन ठिकाणी दोन्ही पक्षाला समान जागा मिळाल्या आहेत तर दोन पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांपैकी चार भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, एका पंचायत समितीत शिवसेनेला बहुमत मिळालं आहे. एका पंचायत समितीत शिवसेना आणि भाजपला समान जागा मिळाल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समित्यांपैकी काँग्रेसला सात, भाजपला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एका पंचायत समितीमध्ये बहुमत मिळालं. एका पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस आणि शिवसेनेला समान जागा मिळाल्या आहेत तर तीन पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या पाच पंचायत समित्यांपैकी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका पंचायत समितीमध्ये बहुमत मिळालं तर दोन पंचायत समित्या त्रिशंकू झाल्या आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांपैकी चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर एका पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता आली आहे, अन्य चार पंचायत समित्यांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांपैकी चार पंचायत समित्या काँग्रेस तर तीन पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत, एका पंचायत समितीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट

कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

दहा महानगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती आणि अकोला या सहा महानगरपालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, आणि सोलापूर महानगरपालिकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेत शिवसेनेला सर्वाधिक ८४ जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत मात्र कोणत्याचं पक्षाला मिळालं नाही. भाजपला ८२ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ३१ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ठाणे महापालिकेतही शिवसेनेला सर्वाधिक ६७ जागा मिळाल्या आहेत, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या असून इथं भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत. सोलापूर महापालिकेत मात्र भाजपला सर्वाधिक ४७ जागा मिळाल्या असून शिवसेनेला २० जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला केवळ १४ जागा मिळाल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेतही भाजपला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या असून त्याखालोखाल शिवसेनेला २५ जागा मिळाल्या आहेत

****

मुंबई महापालिकेत शिवसेनेशी युतीसंदर्भात भाजपची कोअर कमिटी निर्णय घेईल, असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपवर विश्वास ठेवून कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यानं, शिवसेनेचाच महापौर होणार, असं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

मुंबई महापालिकेत एका जागेवर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारात दोन वेळा मतमोजणी होऊनही बरोबरी झाल्यानं, ईश्वर चिठ्ठीची प्रकिया अवलंबण्यात आली, यात भाजपचे उमेदवार अतुल शहा विजयी झाले.

****

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत. जनतेनं सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे, असं पंतप्रधानांनी ट्वीटरद्वारे म्हंटलं आहे.

****

राज्यात १५ मार्चनंतर र खरेदी केंद्र सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवणार असल्याचं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित शेतीमाल खरेदी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन झालं असून शेतकऱ्यांचं नुकसान हो नये यासाठी, हा प्रस्ताव पाठवणार असल्याचं देशमुख म्हणाले.

****

भारत- ऑस्ट्रेलियामध्यल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं ९ गडी बाद २५६ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियानं घेतला.

//****//

No comments: