Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
राज्यांना
नुकसान भरपाई देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मंजुरी.
· राज्यातल्या दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठीचा प्रचार आज संपणार.
· स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचं
निधन.
आणि
·
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन.
****
वस्तू आणि सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर राज्यांना नुकसान भरपाई
देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं काल मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या
अध्यक्षतेखाली राजस्थानमध्ये उदयपूर
इथं झालेल्या वस्तू
आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत सर्व राज्यांचं या मसुद्यावर एकमत झालं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात
हा मसुदा मांडला जाईल. केंद्रीय जीएसटी, एकीकृत जीएसटी आणि राज्य जीएसटी विधेयकाच्या मसुद्याबाबत मात्र कालच्या परिषदेत एकमत झालं नाही,
यासाठी येत्या चार आणि पाच मार्चला परिषदेची बैठक होणार आहे.
****
राज्यातल्या दहा
महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या सर्व ठिकाणी परवा मंगळवारी मतदान होणार आहे.
महापालिकांसाठी आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर जिल्हा परिषदांसांठी
आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
****
शिवसेनेनं
राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार
नसल्याचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे.
ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये
भारतीय जनता पक्ष जाहिरातींवर अत्याधिक खर्च करत असल्याची टीका त्यांनी केली. विमुद्रीकरणामुळे
शेती आणि लहान उद्योगांना मोठा फटका बसल्याचं, पवार म्हणाले.
****
महाविद्यालयीन आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
केंद्रीय विभागातील शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात
आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं काल यासंदर्भात
नवी दिल्लीत एक पत्रक जारी केलं.
****
स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव
धोटे यांचं काल पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे
होते. विधानसभेवर पाच वेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आलेले धोटे यांनी विदर्भातल्या
शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही आक्रमकपणे मांडले. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’
असंही संबोधलं जातं. २००२ साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली
होती. धोटे यांच्या निधनानं शेती आणि
प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारं लढवय्या आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपलं अशा शब्दांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमात मराठवाडा
विभाग मागं असून वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या एकूण उद्दीष्टापैकी
पन्नास टक्के उद्दीष्टंच पूर्ण झालं असल्याची माहिती, विभागीय आयुक्त
डॉ.पुरूषोतम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल मराठवाड्यातले नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. जालना,
बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात शौचालयांचं काम कमी प्रमाणात झालं असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान,
राज्याच्या अर्थसंकल्पातल्या योजनेअंतर्गत तसंच योजनेतर खर्चाच्या एकत्रीकरणासाठी मराठवाडा
वैधानिक विकास मंडळाचे सदस्य येत्या २० तारखेला राज्य शासनाला आपला अभिप्राय सादर करणार
आहेत असं भापकर यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथं काल मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
माजी मुख्यमंत्री
डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुसुम चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नांदेड इथं संगीत शंकर दरबार
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथं आयोजित वार्ताहर परिषदेत आमदार डी.पी.सावंत यांनी काल ही माहिती दिली. या
तीन दिवसीय महोत्सवात, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु.शं.कुलकर्णी, मिस इंडिया नवेली देशमुख, ज्येष्ठ
गायक पंडित टी.एम.देशमुख, अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिनेता
नुपूर नाथा चितळे यांना गौरवण्यात येणार आहे.
****
या प्रादेशिक
बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे
बातमीपत्र न्यूज ऑन
ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. या अनुषंगानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
आयोजित करण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं शिवजन्मोत्सव संयोजन समितीच्या वतीनं पिसादेवी
परिसरात तीन दिवसीय शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काल सायंकाळी “गर्जा जय जय
महाराष्ट्र माझा” हा लोककला दर्शनाचा कार्यक्रम सादर झाला. आज सकाळी भव्य शोभायात्रा
निघणार असून सायंकाळी शिवबा हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शिवजयंतीनिमित्त लातूर इथं दुचाकी फेरी
काढण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद शहरात काढण्यात येत असलेल्या मिरवणुकांमुळे
शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
या मिरवणुका संस्थान गणपती ते क्रांती चौक,
तसंच टिव्ही सेंटर ते सिडको हडको आणि गजानन महाराज मंदिर या परिसरातून
काढण्यात येणार असल्यानं, तिथले वाहतुकीचे मार्ग बंद ठेवण्यात
आले आहेत.
****
राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ-नाफेडमार्फत
नांदेड इथं ठप्प झालेली तूर खरेदी तत्काळ सुरू न केल्यास, पद्मश्री विठ्ठलराव विखे
पाटील कृषी परिषदेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर
यांनी काल नांदेड इथं यासंदर्भात बोलताना, सरकारनं या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांची
अडचण दूर करावी, असं आवाहन केलं. नाफेडनं सुरू केलेली ही तूर खरेदीची आठ केंद्र बारदानाअभावी
तसंच गोदाम रिकामं नसल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत.
****
समाजानं पारंपारिक शिक्षणाऐवजी कृतीशील
शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे असं प्रतिपादन, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांनी केलं आहे. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात
आयोजित मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र आणि वाणिज्य या विषयांवरच्या राष्ट्रीय
चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी सतत अशा चर्चासत्रांमध्ये
भाग घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करावा, असं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं.
****
अहिंसा हे तत्व महात्मा गांधींनी दुबळ्यांपासून सुरू करून सबळांपर्यंत
नेल्याचं मत, सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारवंत
डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य
महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित ‘वर्तमानकाळात महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता’
या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. गांधीजींविषयी समाजात समजाऐवजी गैरसमज जास्त
असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या सिध्दार्थ औद्योगिक सहकारी संस्थेविरोधात
सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपाला अज्ञातांनी लावलेल्या आगीची चौकशी सुरू असल्याची माहिती, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे
पोलिस निरीक्षक
बी.एम.हिरमुखे यांनी दिली. उपोषणकर्त्या सविता बिराजदार यांनी कांही संशयितांची नावं दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. सिध्दार्थ
औद्योगिक सहकारी संस्थेच्या विरोधात सविता बिराजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या
काही दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. अज्ञात इसमांनी काल पहाटे या उपोषण मंडपाला आग लावली.
****
गेल्या १६ तारखेला, जालना
जिल्ह्यातल्या पाटोदा इथं, मतदान प्रक्रिया चालू
असताना मतदान केंद्रावर येऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध
मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटोदा गावातल्या मतदान केंद्र अध्यक्षांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि
रोटरी क्लबच्या वतीनं औरंगाबाद मधल्या कलाग्राम इथं आयोजित ऋतुरंग महोत्सवात काल
मणिपूर, त्रिपुरा आणि नागालँड इथल्या लोकनृत्याचं सादरीकरण, पंडित
मिश्रा आणि सचिन नेवपूरकर यांचं शास्त्रीय गायन, असे
कार्यक्रम झाले. आज कलाग्राम इथं देबप्रिया अधिकारी आणि समन्वय
सरकार यांची गायन तसंच सतार जुगलबंदी, रचना यांचं कथ्थक, तर
पूर्वांचल राज्यातली लोककला या कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे.
****
अहमदनगर इथल्या भारतीय संस्कृती सेवा
प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित मदनगोपाल व्यास पुरस्कार लातूरच्या विवेकानंद
वैद्यकीय प्रतिष्ठाणला काल प्रदान करण्यात आला. ४१
हजार रुपये आणि सन्मान पत्र असं या
पुरस्काराचं स्वरुप असून प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉक्टर अशोक कुकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी
तालुक्यातल्या सिंदगी जिल्हा परिषद गटातल्या येहळेगाव इथं १६ तारखेला झालेल्या मतदान
प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं, या
ठिकाणी परवा २१ तारखेला फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment