Wednesday, 22 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२२ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारत आणि चीनदरम्यान आज बीजिंग इथं पहिल्या धोरणात्मक द्विपक्षीय चर्चेला सुरूवात होत आहे. परस्परहिताच्या तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या सर्व मुद्यांवर यावेळी चर्चा  होईल, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे.

****

संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या भारतीय कुशल मनुष्यबळाच्या अमेरिकेत काम करण्याबाबत अमेरिकेनं दूरदृष्टीचा आणि संतुलित दृष्टीकोन ठेवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेहून आलेल्या एका शिष्टमंडळाच्या भेटीमध्ये ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या कुशल भारतीयांचं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात भरीव योगदान असल्यामुळे अशा भारतीयांबद्दल अमेरिकेनं संतुलित दृष्टीकोन ठेवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

छत्तीसगढ राज्यातल्या दंतेवाडा जिल्ह्यातल्या नारायणपूर जवळच्या अबुझमद जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात माओवादी ठार झाले. माओवाद्यांच्या विरोधातली गेल्या काही महिन्यातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिस तसंच जिल्हा राखीव दलानं संयुक्तरित्या काल ही कारवाई केली.

****

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे. बारा जिल्ह्यातल्या बावन्न मतदार संघांमध्ये होणाऱ्या या मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

****

स्मार्ट सिटी योजनेनंतरच्या स्मार्ट पंचायत, या केंद्र सरकारच्या पुढच्या योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी नवी दिल्ली इथं एक बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे सहभागी झाले होते.

या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट पंचायत समितीसाठी देशभरातील ३० सनदी अधिकाऱ्यांची यांची निवड करण्यात आली असून डॉ. नारनवरे यांचा त्यात समावेश आहे.

//*******//

No comments: