Friday, 3 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 03 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

·      ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत प्रारंभ

·      माध्यमिक शिक्षकांचं थकलेल वेतन येत्या दोन दिवसांत होणार

आणि

·      मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी; अनेकांचे अर्ज  अवैध

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी मतदान होत आहे. यात औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा आणि अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी विविध पक्षांच्या बहुरंगी लढती होणार असून औरंगाबादमध्ये २०, नागपूरमध्ये १६, अमरवतीत १३ तर कोकण आणि नाशिकमध्ये प्रत्येकी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये ५८ हजारांवर मतदार असून आठ जिल्ह्यातल्या २७५ मतदान केंद्रांवर हे मतदार मतदान करतील. मतमोजणी येत्या सोमवारी सहा फेब्रुवारीला होणार आहे.

****

राजकीय पक्षांना आता दरवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत लेखा परीक्षण केलेलं आयकर विवरणपत्र सादर करावं लागेल, असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं आहे. ठराविक वेळेत विवरणपत्र सादर न केल्यास आयकरातून सुट मिळणार नसल्याचं अधिया यांनी स्पष्ट केलं. राजकीय पक्षांना रोख्यांद्वारे मिळालेल्या देणगीबाबत सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, देणगी देणाऱ्यांची माहिती जाहीर करणार नसल्याचं अधिया म्हणाले.  

****

विमुद्रीकरणानंतर बँकेत जमा केलेल्या रकमेची खातेदारांनी ऑनलाईन तपासणी करून घेण्याचे निर्देश आयकर विभागानं दिले आहेत. नोटा बंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्याचा वापर केल्याचं उघडकीस आलं आहे, त्यामुळे आपल्या खात्यात रकमेत तफावत आढळल्यास तात्काळ आयकर विभागाला सूचित करण्यास सांगण्यात आलं आहे. 

****

९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ठाणे जिल्ह्यातली पु. भा. भावे, डोंबिवली नगरी सज्ज झाली आहे. आज सकाळी आठ वाजता ग्रंथ दिडीनं संमेलनाची सुरूवात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सम्मेलनाचं उद्घाटन होईल. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर अक्षयकुमार काळे संमेलनाचं अध्यक्षपद भषवणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात कथा-कथन, काव्य -संमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखतींसह स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथलं नियोजित स्मारक येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. या स्मारकाच्या कामाची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारनं एक सल्लागार समिती स्थापन केली आहे. लंडन दौऱ्यावर असलेले बडोले यांनी या समितीची पहिली बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. समितीनं स्मारकासंबंधी काही सूचना केल्या असून, त्यावर विचार सुरु असल्याचं बडोले यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. डॉक्टर आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, ते ज्या इमारतीत वास्तव्यास होते, ती इमारत स्मारक स्वरुपात जतन करण्यासाठी राज्य सरकारनं ऑगस्ट २०१५ मध्ये खरेदी केली आहे. 

****

वीज बिलांच्या वसुलीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिला आहे. ते काल मुंबई इथं महावितरणच्या आढावा बैठकीत बोलत होते. थकबाकी वसुलीबाबत गांभिर्यानं काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

राज्यात आतापर्यंत फक्त ५४ टक्के सातबारा उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करुन व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचं या विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत सर्व सात बारा डिजिटल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

****

मजुरांना तातडीनं रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं रोजगार हमी योजना प्रक्रियेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा तसंच सिंचन विहिरींच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल मंत्रालयात रावल यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मजुरांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचं वेतन तातडीनं मिळणं गरजेचं असून आयटी विभागाच्या मदतीने तंत्रज्ञान विकसीत करण्यात यावं, असंही त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, हे बातमीपत्र न्युज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यातल्या माध्यमिक शिक्षकांच थकलेल वेतन येत्या दोन दिवसांत होणार आहेत. वेतनासाठी असलेली आर्थिक तरतूद संपल्यामुळे शिक्षकांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे पगार होऊ शकले नव्हते. आता शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले दोन हजार ३२३ कोटी रुपये काल अदा करण्यात आले आहेत. असं शिक्षण संचालक जरग यांनी लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांना सांगितलं. नियोजनाअतर्गंत नियुक्त शिक्षकांच्या वेतनासाठीही तातडीनं तरतूद करण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. या शिक्षकांचा नोव्हेंबरचा पगार नुकताच झाला असून डिसेंबर-जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पगारासाठी तरतूद नसल्याचंही त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुका वगळता, छाननीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६४० अर्ज वैध तर २१ अर्ज अवैध ठरले आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीसाठी ८९२ अर्ज वैध आणि ११ अर्ज अवैध ठरले आहेत. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ४९९ अर्ज वैध तर १६ अर्ज अवैध ठरले आहेत. पंचायत समितीसाठी ८०७ अर्ज वैध आणि २५ अर्ज अवैध ठरले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण वगळता अन्य आठ जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीचे एकूण  ४८ अर्ज अवैध ठरले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतल्या समाजकार्य अभ्यासक्रमाच्या तीन विद्यार्थीनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला कळंब न्यायालयानं दोन वर्षाच्या सश्रम कारावासासह पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात २४ जानेवारीला घडलेल्या या घटनेचा निकाल अवघ्या सात दिवसांत देण्यात आला आहे. मिझोरम इथल्या या तीन विद्यार्थींनी अभ्यासासाठी केज तालुक्यातल्या हासेगाव इथं आल्या असतांना आरोपीनं त्यांचा विनयभंग केला होता.

****

औरंगाबाद इथं आजपासून चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते आज सांयकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ३० हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. औरंगाबाद शहरातल्या प्रोझो  मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात सोमवारपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

****

माघ एकादशीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेनं बीदर- पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी येत्या सोमवार आणि मंगळवारी बीदरहून रात्री सव्वा नऊ वाजता निघेल आणि उदगीर, लातूर, उस्मानाबाद आणि कुर्डुवाडी मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी तसंच बुधवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी पावणे सहा वाजता बीदरला पोहोचेल.

****

नांदेडहून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आज निर्धारित वेळेवर सुटणार असून अमृतसरहून नांदेड कडे येणारी अमृतसर नांदेड ही गाडी रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची ३१ वी राज्यस्तरीय परिषद आजपासून नांदेड इथं सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी  राज्यभरातून सोळाशेहून अधिक स्त्री रोगतज्ञ डॉक्टर्स तसंच देश विदेशातील तज्ञ  मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता होईल.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'प्रयोगशाळेतली उपकरणे दुरुस्ती आणि देखभाल' या विषयावर येत्या सोमवारपासून पाच दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.

//*******//

No comments: